manoj jarange patil chhagan bhujbal sharad pawar sarkarnama
विशेष

Chhagan Bhujbal : पवारसाहेबांना सोडलं, जरांगेंना अंगावर घेतलं; भुजबळांचं बळ घटलं?

Chhagan Bhujbal : गेली 20 वर्षे भुजबळ याच घड्याळाच्या जोरावर नाशिकच्या येवल्यातून सलग 04 वेळा आमदार राहिले आहेत.

Sandeep Chavan

छगन भुजबळ वय वर्षे 76... त्यातली 51 वर्षे महापालिका ते मंत्रालय असा राजकीय प्रवास! मूळच्या शिवसेनेत 25 वर्षे आणि मूळच्या राष्ट्रवादीत 24 वर्षे! बाळासाहेबांनी नगरसेवक, महापौर, आमदार बनवलं तर शरद पवारांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनवलं! मुंबईच्या माझगावमधून दोनदा तर नाशिकच्या येवल्यातून चारदा आमदार... पण आजची परिस्थिती काय? आज ना मूळच्या शिवसेनेत ना मूळच्या राष्ट्रवादीत; आधी बाळासाहेबांना सोडलं, नंतर शरद पवारांना सोडलं. त्यामुळे भुजबळांचं बळ घटलं का? हे जाणून घेणार आहोत.

हाती घड्याळ पण आरोपांनी घायाळ!

छगन भुजबळ... महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव. भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) शिवसेना गाजवली आणि राष्ट्रवादी वाढवली हे मान्य पण त्यांचा राजकीय इतिहास पाहता ज्या शिवसेनेनं त्यांना बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख दिली, त्या शिवसेनेलाही त्यांनी सोडलं आणि ज्या राष्ट्रवादीनं त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातली विविध पदं उपभोगायला दिली त्या राष्ट्रवादीलाही त्यांनी सोडलं.

मंडल आयोगाला बाळासाहेबांनी केलेला विरोध आणि त्यावरून त्यांच्याशी झालेले टोकाचे मतभेद या कारणावरून ओबीसींचा नेता या नात्यानं त्यांनी शिवसेना का सोडली हे एकवेळ समजू शकतो. पण, अजितदादांच्या ( Ajit Pawar ) नेतृत्वात राष्ट्रवादीनं मांडलेल्या वेगळ्या चुलीत भुजबळांनी जाळ घालायला का जावं, हे काही उमगू शकलं नाही. 'ईडी'ची 'ईडापिडा' टाळण्यासाठी की सत्तेसाठी भुजबळांनी साहेबांची साथ सोडली या आरोपांना उत्तर देता देता त्यांची पुरती दमछाक झाली आहे. याच घड्याळात पाहून महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं अचूक टायमिंग साधणाऱ्या भुजबळांच्या हाती आजही ते घड्याळ आहेच. पण, त्यांच्या हाती घड्याळ बांधणारा त्या घड्याळाचा मूळ मालक मात्र आज त्यांच्या सोबत नाही.

येवल्यात सलग 04 वेळा राष्ट्रवादीची सत्ता

गेली 20 वर्षे भुजबळ याच घड्याळाच्या जोरावर नाशिकच्या येवल्यातून सलग 04 वेळा आमदार राहिले आहेत. एकेकाळी येवला तसा शिवसेनेचा गड राहिलाय. कल्याणराव पाटलांनी 1995 आणि 1999 असा सलग दोन वेळा येवल्यात भगवा फडकवला. मात्र, 2004 मध्ये येवल्यात भुजबळांची 'एन्ट्री' झाली आणि तेव्हापासून आजअखेर येवल्यात भुजबळांचं बळ दिसून आलं. त्यांनी 2004 मध्ये कल्याणराव पाटलांना पाडलं आणि येवल्यात राष्ट्रवादीचं खातं उघडलं. त्यानंतर भुजबळांनी प्रत्येक वेळेस म्हणजे 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला.

पुन्हा उभे राहाणार भुजबळ पण साहेबांचं नाही पाठबळ!

पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आता हातात घड्याळ आहे पण साहेबांची साथ नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंकडून वारंवार होत असलेली टीका, परिणामी मराठा समाजाचा पत्करलेला रोष, कांदा प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पसरलेली नाराजी आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा विरोध या सर्व आव्हानांना त्यांना एकट्यानं तोंड द्यावं लागणार आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांचं मार्गदर्शन घेण्याचा मार्ग त्यांनी स्वतःच स्वतःच्या हातांनी बंद करून टाकलाय.

2009 मध्ये पराभूत झालेले शिवसेनेचे माणिकराव शिंदे-पाटील पुन्हा एकदा भुजबळांविरोधात दंड थोपटून लढण्याच्या तयारीला लागले आहेत. ते यंदा शरद पवार गटाकडून लढण्यास इच्छुक आहेत. तिकडं ठाकरे गटाकडून कुणाल दराडे देखील इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत.

एकूणच काय तर भुजबळांची सध्याची स्थिती बसाहेबांना सोडलं, मनोज जरांगेंना ( Manoj Jarange Patil ) अंगावर घेतलं अशी आहे. या अशा कात्रीत सापडलेल्या भुजबळांना यंदाची येवल्याची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक ठरणार हे नक्की!

1995 ते 2019 या कालावधीतील येवल्याचे आमदार

येवला मतदारसंघ आमदार पक्ष

1995 - कल्याणराव पाटील - शिवसेना

1999 - कल्याणराव पाटील - शिवसेना

2004 - छगन भुजबळ - राष्ट्रवादी

2009 - छगन भुजबळ - राष्ट्रवादी

2014 छगन भुजबळ राष्ट्रवादी

2019 - छगन भुजबळ - राष्ट्रवादी

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT