Amit Shah | Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

CM Devendra Fadnavis: 'दिल्लीश्वरां'चं धक्कातंत्र नाही चाललं, राजस्थान, मध्यप्रदेश 'पॅटर्न'ही फेल; कारण महाराष्ट्रात फडणवीस नाम ही काफी है..!

Maharashtra CM Oath Ceremony : दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर सध्यातरी महाराष्ट्रातलं महायुती सरकार सक्षमपणे हाताळणारा देवेंद्र फडणवीसांखेरीज दुसरा नेता दिसून येत नाही. तसेच शिंदे, अजितदादा यांना सोबत घेऊन कारभार हाताळण्याचं कौशल्य असलेला फडणवीसांसारखा अनुभवी नेताच मुख्यमंत्रिपदासाठी निवडणं गरजेचं होतं.

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आपला करिष्मा दाखवत महायुतीची (Mahayuti) सत्ता विक्रमी जागांसह खेचून आणली आहे. त्यात भाजपने ते कमाल म्हणजे लढवलेल्या १४९ जागांपैकी तब्बल १३२ जागा निवडून आणल्या. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ८१ पैकी ५७ जागा लढवल्या. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने ५१ पैकी ४१ जागा जिंकल्या. या विजयानंतर महायुतीत मुख्यमंत्री पद आणि मंत्रिपदावरून धुसफूस सुरू झाली.

एकीकडे महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. त्याचवेळी दिल्लीतून महाराष्ट्रातही यंदा धक्कातंत्र वापरलं जाणारं असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी इतका वेळ घेतल्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, ओडिशा या राज्यातलं धक्कातंत्र पुन्हा आता महाराष्ट्रातही वापरलं जाणार या चर्चांनी राजकारण ढवळून टाकलं.

महाराष्ट्रातही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी वेळ गेल्यानं भाजप (BJP) प्रबळ दावेदार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कट करून वेगळाच चर्चा पुढं करणार अशी शक्यता होती. पण अखेर भाजप नेतृत्वाला ही फडणवीसांचं कर्तृत्वाचा सन्मान करावा लागला. त्यामुळे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडली.

राजस्थानमध्ये बहुमतात सत्ता मिळवलेल्या भाजपनं वसुंधरा राजे, किरोडी लाल मीना, यांच्या सारख्या प्रस्थापित v बलाढ्य नेत्यांना धक्का देत भजनलाल शर्मा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढं आणलं. तसेच मध्य प्रदेशातही शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या नंतर तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी आशा होती. पण तिथेही अचानक मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

छत्तीसगड मध्येही रमण सिंह,अरुण साव यांचं नाव आघाडीवर असताना भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी विष्णुदेव साय यांचं नाव मुख्यमंत्री साठी जाहीर केलं.तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या ओडिशा च्या निवडणुकीत पहिल्यांदाच बहुमत मिळाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान, मनमोहन सांबल यांच्या नावांवर फुली मारत मोहन मांझी यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली.

उत्तर प्रदेशमध्येही २०१७ च्या विजयानंतर योगी आदित्यनाथ यांचं नाव पुढं करण्यात आलं. तिथंही त्यावेळी केशव प्रसाद मौर्य, मनोज सिन्हा यांसारख्या बड्या नेत्यांचा पत्ता भाजप कडून कापण्यात आला होता. या प्रत्येक राज्यात भाजपनं मुख्यमंत्री ठरवण्यासाठी कमीत कमी ७ आणि जास्तीत जास्त दहा दिवसांचा अवधी घेतला होता.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत राज्यातील जनतेनं तब्बल 105 जागांवर भाजपला कौल दिला होता. त्यामुळे 2014 नंतर दुसर्‍यांदा भाजपला शतकीपार करुन देत फडणवीसांनी आपली योग्यता सिध्द केली होती. पण उद्धव ठाकरेंनी युती तोडत थेट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत नवा घरोबा करत महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणलं.पण त्याआधी उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी आपला निर्णय बदलल्याने संतापलेल्या फडणवीसांनी थेट अजित पवारांना सोबत घेत सरकार स्थापनेचा दावा ठोकला.

तसेच त्यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली.ही शपथ चांगलीच गाजली होती. पण हे सरकार अल्पावधी म्हणजे 72 तासांचंच ठरलं.त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. आणि सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातही देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका कणखरपणे निभावतानाच तत्कालीन नवखे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला सळो की पळो करुन सोडले.आणि संधी मिळताच शिंदेंच्या सहाय्याने महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचत पुन्हा महाराष्ट्रात अनपेक्षितपणे सत्तापरिवर्तन घडवून आणलं. हा महाविकास आघाडीचे प्रमुख शिल्पकार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलेला सर्वात मोठा झटका होता.

पण याच सत्तापरिवर्तनामुळे फडणवीसांचं राजकीय वजन महाराष्ट्र पुरतं सीमित न राहता राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला. केंद्रीय राजकारणातील भविष्यातला तगडा प्रतिस्पर्धी म्हणून दिल्लीतही फडणवीसांविरोधात लॉबिंग सुरू असल्याची कुजबुज नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात कानावर कायमच पडत आली आहे.

फडणवीसांंनी मात्र, याविषयी कोणतंही अडचणीत आणणारं स्टेटमेंट न करता दिवसागणिक आपली योग्यता अधिकाधिक सिध्द करण्यावर भर दिला. याच गोष्टीमुळे ते सर्व आव्हानं मोडीत काढून, तसेच इतर राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या पॅटर्न फेल ठरवत दिल्लीश्वरांचं धक्कातंत्र मोडीत काढण्यात यशस्वी ठरले.

पक्षश्रेष्ठींसमोरही फडणवीसांइतका सक्षम दुसरा पर्याय कुठंय..?

दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर सध्यातरी महाराष्ट्रातलं महायुती सरकार सक्षमपणे हाताळणारा दुसरा नेता दिसून येत नाही. तसेच आगामी काळातील नव्या महायुती सरकारची आव्हानं पेलण्याची ताकद, विकासाची दूरदृष्टी, महाराष्ट्रासारख्या राज्याचा आवाका माहिती असलेला नेता, शिंदे, अजितदादा यांना सोबत घेऊन कारभार हाताळण्याचं कौशल्य, या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीसांसारखा अनुभवी नेताच मुख्यमंत्रिपदासाठी निवडणं गरजेचं होतं.

पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा फडणवीसांसाठी 'हे' ठरले प्लसपॉईंट...

१. राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते.

२. उत्तम नेतृत्व, तळगळापर्यंत पोहचलेलं नाव, दांडगा जनसंपर्क असलेला नेता म्हणून फडणवीस ओळखले जातात.

३. पक्षबांधणी,शिस्तप्रियता, दूरदृष्टी, समजूतदारपणा,अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित.

४. महाराष्ट्र राज्य जिथे कुणाही मुख्यमंत्र्याला आपला ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही. तिथे फडणवीस अपवाद ठरले.

५. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती.

६. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या विरोधी पक्षातील मुत्सद्दी नेत्यांसमोर भिडण्याची क्षमता.

७. महायुतीतही अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मातब्बर आणि अनुभवी नेत्यांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचं अनुभव.

८. मंत्रिमंडळ आणि प्रशासनावर वचक...

९. कोणतंही आव्हान पेलण्याची ताकद.

१०. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, आमदार या नात्याने विधानसभा, विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचा अनुभव.

११. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा.

१२. इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांसाठी विश्वसनीय चेहरा.

१३. सत्ता असताना आणि नसताना आमदार, पक्ष तितक्याच समर्थपणे सांभाळण्याचं कौशल्य.

१४. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासातलं नाव म्हणून ओळख.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT