Sanjay Gandhi, Ulhas Pawar  Sarkarnama
विशेष

Ulhas Pawar: संजय गांधींनी माझ्या गळ्यात 100 रुपयांच्या नोटांचा हार घातला, अन् म्हणाले '...आपको कोई मदत नही करता!'

सरकारनामा ब्यूरो

उल्हास पवार

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी (Sanjay Gandhi)मोठे उमदे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यात उर्जेचा अखंड स्रोत होता. सर्वत्र फिरायची त्यांना आवड होती. पक्ष संघटनेच्या बैठकीसाठी त्यांचा देशभर वावर होता.

दिल्लीत त्यांचा वावर सर्वाधिक असला तरी, महाराष्ट्रातही त्यांचा संपर्क चांगला होता. अशा उमद्या नेत्याचा अकाली मृत्यू झाल्यामुळे केवळ गांधी कुटुंबाचेच नाही तर, देशाचेही नुकसान झाल्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे.

पक्ष संघटनेची त्यांना सखोल माहिती होती. काहीवेळा उघड बोलून नेत्यांना दुखावता येत नव्हते. परंतु, कृतीतून संदेश देण्याची लकब त्यांनी आई इंदिरा गांधी यांच्याकडून उचलली होती. त्या बाबतचा एक किस्सा अजूनही डोळ्यासमोर आहे.

संजयजी १९७५-७६ च्या दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा युवक काँग्रेसचा मी अध्यक्ष होतो. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे कार्यक्रम होते. त्यावेळी संजय गांधी यांनी त्यांचा पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. त्याच्या अंमबजावणीसाठी ते कमालीचे आग्रही होते. तर, विरोधी पक्षांची त्या कार्यक्रमावर टीका सुरू होती. तो कार्यक्रम काय होता, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.

१) वृक्ष लागवड करा: झाडांची संख्या वाढवा आणि त्यांचे संवर्धन करा, त्यासाठी जनचळवळ उभारा.

२) कुटुंब नियोजन करा: या मुद्द्यावर संजय गांधी यांच्याबद्दल विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. परंतु, लोकसंख्या नियंत्रित केली तर, विकास झपाट्याने होईल, अशी त्यांची भावना होती. आश्चर्य म्हणजे रुकसाना सुलताना या सामाजिक कार्यकर्त्याही या प्रबोधनाच्या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.

३) हुंडा बंदी आणि आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन: हुंड्यामुळे युवतींचा छळ होतो, त्यामुळे ही प्रथाच बंद करू, असा त्यांचा मनोदय होता. आंतरजातीय लग्नांसाठी १०० जणांना सांगू. दहा तरी लग्ने होतील, अशी त्यांची धारणा होती. ज्या ठिकाणी दहापेक्षा जास्त होतील, तेथे मी प्रत्यक्ष येऊन लोकांशी संवाद साधेल, असेही त्यांनी जाहीर केले होते.

४)अस्पृश्यता निवारण: देशातील कुप्रथा बंद झाली तर, सगळ्यांचा आर्थिक विकास होईल आणि देश प्रगती पथावर पोचेल, असे त्यांचे म्हणणे होते.

५)साक्षरता प्रसार आणि श्रमदान शिबिरे:सगळ्या वर्गांतील लोकांनी शिकले पाहिजे, श्रमदान करून ग्रामविकास केला पाहिजे, अशी भावना होती.

हा पाच कलमी कार्यक्रम आम्हा युवकांना भावला होता. कोणत्याही जात, धर्माविरुद्ध तो नव्हता. त्यामुळे पाच कलमी कार्यक्रमाची आम्ही धडाक्यात अंमलबजावणी सुरू केली होती.

माझे घर दोन खोल्यांचे अगदीच लहान..

साध्या राहणीचाही त्यांचा आग्रह होता. ते स्वतःही तसेच राहत. अंगावर खादीचे कपडे असत, सर्वांनी खादी वापरावी, असेही ते आवर्जून सांगत. पायात कोल्हापुरी चप्पल असे. सभेच्या ठिकाणी येताना ते स्वतः मोटार चालवत. कोणताही बडेजाव त्यांना आवडत नव्हता. तळातील कार्यकर्त्याला नेता हा आपला वाटला पाहिजे, असे ते सांगत.

अंबिका सोनी या युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस होत्या. त्या देखील प्रवास भरपूर करीत. माझी त्यांच्याशी वारंवार भेट होत. तेव्हा एकदा मी त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांच्या दौऱ्यादरम्यान त्या पुण्यात नाना पेठेतील माझ्या घरी आल्या. त्यावेळी माझे घर दोन खोल्यांचे अगदीच लहान होते. त्यात फर्निचर काहीच नव्हते.

एवढ्या मोठ्या नेत्या घरी आल्यामुळे मी सतरंजी, चादर अंथरून त्यांच्यासाठी बैठक तयार केली. त्यावर त्या बसल्या. त्यावेळी माझ्यासह बरोबरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत, त्यांनी घराचे, परिस्थितीचे निरीक्षण केले. नंतर ही बाब संजय गांधी यांच्यापर्यंत पोचल्याचे त्यांच्याबरोबरील कार्यकर्त्यांकडून मला समजले.

सगळा खर्च पदरमोड करून करावा लागे...

युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मला महाराष्ट्रभर प्रवास करावा लागत. त्यावेळी मोटारी सर्वांकडे नव्हत्या. माझ्याकडे तर नव्हतीच. त्यामुळे माझा प्रवास रेल्वे, एसटी बसने सर्वत्र होत. एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोचल्यावर तेथील कार्यकर्ते मला घेण्यासाठी एसटी स्थानक किंवा रेल्वे स्थानकावर येत. तेथून पुढे दुचाकी, बैलगाडी किंवा उपलब्ध असलेल्या वाहनातून प्रवास होत असे.

प्रवासाचा सगळा खर्च पदरमोड करून करावा लागे. स्टेशनरीसाठी तुटपुंजी मदत मिळते. तेव्हाही पोस्ट कार्डवरून निरोप, संपर्क साधला जात. युवक काँग्रेसमध्ये तेव्हा साध्या घरांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा मोठा होता. सगळ्यांची परिस्थिती सारखीच होती.

मुख्यमंत्री चव्हाण शेजारीच होते...

संजय गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा ते पहिल्यांदा मुंबईत आले. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत झाले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. स्वागतादरम्यान, त्यांनी संजय गांधी यांच्या गळ्यात १०० रुपयांच्या नोटांचा हार घातला.

त्यावेळी मी तेथेच होतो. ते खूष झाले. त्यांनी लगेचच गळ्यातील हार काढला आणि माझ्या गळ्यात घातला आणि म्हणाले, ‘‘उल्हासजी, ये लो. मुझे मालूम है, आपको कोई मदत नही करता !.’’ त्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष सावंत त्यांच्या शेजारीच होते. संजय गांधी यांच्या वाक्यांचा आणि कृतीचा अर्थ त्यांना नेमका समजला. संजय गांधी यांच्या त्या कृतीने उपस्थित नेत्यांना चपराक बसली आणि संजय गांधी यांच्या सारख्या उच्चपदस्थ नेत्यापर्यंत आपली कैफीयत पोचली, याचा आनंद युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झाला आणि त्यांचे चेहरेही खुलले!

(लेखक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार आहेत)

(शब्दांकन : मंगेश कोळपकर)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT