Sushilkumar Shinde &Congress-Ncp Leader
Sushilkumar Shinde &Congress-Ncp Leader Sarkarnama
विशेष

Solapur Politic's : सोलापुरातील काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वाद मिटला : शिंदेंच्या निवासस्थानी ऐकीच्या आणाभाका

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील (Solapur) काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांमधील आपापसातील वाद विसरून यापुढे भाजपविरूद्ध (BJP) एकीने लढू, असा निर्धार आज (ता. १३ फेब्रुवारी) करीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांचे हातात हात घेतले. ‘जनवात्सल्य’ निवासस्थानी जाऊन त्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil kumar Shinde) यांची भेट घेतली. (Congress-ncp's decision to forget the controversy and form a front in Solapur)

सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे द्यावी, असा कार्यकर्त्यांचा कल असल्याचे वक्तव्य केल्यानंतर आमदार रोहित पवार यांचा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. त्यानंतर प्रणितीताई या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, त्यांना मला बोलण्याचा अधिकार आहे, असे ट्विट करीत आमदार पवारांनी त्या वादावर पडदा टाकला. तसेच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही वाद न वाढविण्याची सूचना केली.

तत्पूर्वी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिल्यास बारामती आम्हाला देणार का, असा सवाल केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी आमदार रोहित पवारांची बाजू घेत काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर अंबादास करगुळे, विनोद भोसले, गणेश डोंगरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर शाब्दिक हल्ले सुरु केले होते. पण, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना आघाडीतील पक्षांमधील वाद भाजपला फायद्याचा ठरू शकतो, असा विचार पुढे आला. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दोनवेळा बैठका घेतल्या आणि त्या वादावर पडदा टाकत भाजपविरूद्ध जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १३ फेब्रुवारी) हॉटेल लोटस येथे पदाधिकाऱ्यांसमवेत एकत्रित बैठक पार पडली. या वेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, माजी महापौर आरिफ शेख, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, राष्ट्रवादीचे नेते शंकर पाटील, शफी इनामदार, जनार्दन कारमपुरी, तौफीक शेख, प्रमोद गायकवाड, जुबेर बागवान, ॲड. केशव इंगळे, शकील मौलवी, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, श्रीकांत वाडेकर, शरद गुमटे, सुनील सारंगी आदी उपस्थित होते.

सोलापुरातून सुशीलकुमार शिंदेच उमेदवार

आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहील. भाजपच्या दोन्ही खासदारांनी सोलापूर शहर-जिल्ह्यात विकासाचे एकही ठोस काम केलेले नाही. केवळ केंद्रातील मोदी सरकारचेच गुणगान गायले. सोलापूरचा पाणीप्रश्न अजून सुटलेला नाही. जनतेत भाजप खासदारांबद्दल प्रचंड रोष आहे. या पार्श्वभूमीवर पुढची निवडणूक तुम्हीच लढवा, असा आग्रह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केला आहे. त्यांच्या ‘जनवात्सल्य’ या निवास स्थानी त्याबद्दल दोन्ही काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT