BJP, Congress Sarkarnama
विशेष

Bjp Attack on Congress : ...म्हणून विधानसभेसाठी काँग्रेसच्या बदनामीची भाजपची आहे रणनीती

Assembly Election 2024 : गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून काँग्रेसला भाजपने घेरले होते. आता पंतप्रधानांनी ‘महात्मा गांधी यांच्या काळातील ही काँग्रेस नाही’ असे सांगून पुन्हा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक आणून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : आताचा काँग्रेस पक्ष महात्मा गांधी यांच्या सत्य विचारांवर चालणारा नाही तर खोटा, धोकेबाज झाल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर वर्धा येथील सभेत केली. ‘तेव्हाचा काँग्रेस आणि आताची काँग्रेस पक्ष’ असा भेद करून काँग्रेसच्या चुका पुन्हा पुन्हा जनतेपुढे मांडून मतदारांना भाजपकडे वळविण्याचा हा रणनीतीचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवले.

आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसचे उमेदवार यांच्यात थेट लढत होणाऱ्या मतदारसंघाची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपची वाट खडतर आहे. काँग्रेसची बदनामी करून मतदारांना बांधून ठेवण्यासाठी भाजपची प्रचारयंत्रणा कार्यरत आहे.

भाजपने 2019 च्या निवडणुकीत 54 ठिकाणी काँग्रेसच्या (Congress) विरोधात विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ 17 ठिकाणी भाजपचा पराभव करता आला होता. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोध करण्याची मोहीम भाजपने हाती घेतली.

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून काँग्रेसला भाजपने घेरले होते. आता पंतप्रधानांनी ‘महात्मा गांधी यांच्या काळातील ही काँग्रेस नाही’ असे सांगून पुन्हा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक आणून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने राहिलेले असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. महायुतीमध्ये भाजप 150 ते 160 जागा, तर महाविकास आघाडीतून काँग्रेस सुमारे 125 जागांसाठी आग्रही आहे. हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष राज्यात सर्वाधिक जागा लढविणार असल्याने त्यांच्‍यातच एकमेकांविरोधात तुल्यबळ लढती होणार आहेत. यासाठीच भाजपकडून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याऐवजी काँग्रेसला लक्ष्य केले जात आहे.

‘मिशन विदर्भा’वर भर

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा सुरू ठेवून दुसरीकडे भाजपने संघटनात्मक पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांचे दौरे आयोजित करून बूथ यंत्रणा, शक्ती केंद्र मजबूत करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीतील चुका टाळण्यासाठी केंद्रीय पातळीवरील तसेच राज्यातील नेत्यांचे लोकसभानिहाय प्रवास सुरू झाले आहेत. .

विदर्भात भाजपने भर दिला असून, मध्यप्रदेशातील भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी नागपूरमध्ये दोन दिवस मुक्काम ठोकला होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूर शहरातील विधानसभेच्या बैठका घेतल्या, मोदी यांची सभा झाली, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही नागपुरात येऊन विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

2019 च्या निवडणुकीत विदर्भातील 62 जागांपैकी भाजपचे 29आमदार निवडून आले, तर काँग्रेसचे 15 आमदार निवडून आले होते. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मारलेल्या मुसंडीमुळे विधानसभेला त्यांना थोपविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे, त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.

गणेशोत्सवानंतर बैठका सुरू

भाजपने महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून विधानसभेतील कामाची माहिती प्रदेशाकडून संकलित केली जात आहे. राजस्थान, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश यासह अन्य राज्यातील पदाधिकारी निवडणुका होईपर्यंत महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत. त्यामुळे भाजपने एकापेक्षा जास्त यंत्रणेकडून माहिती एकत्रित करून रणनीती आखण्‍याचे काम सुरू केले आहे.

राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, अनेक पदाधिकारी त्यात व्यग्र होते, त्यामुळे हे काम काहीसे संथ झाले होते. पण आता गणेशोत्सव संपल्यानंतर पुन्हा विधानसभा, लोकसभा मतदारसंघनिहाय, तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, मुंबई-कोकण असे विभागनिहाय बैठका नियोजन सुरू होणार आहे.

अस्वस्थ निष्ठावंत

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून त्यांच्या मदतीने भाजपने सत्ता मिळवली खरी. पण या सत्तेचा फायदा भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेला नाही. गेल्या दोन वर्षांत राज्यातील विविध महामंडळे, समित्यांवर काम करण्याची संधी पक्षाकडून मिळेल यासाठी पदाधिकारी प्रयत्न करत राहिले. आता विधानसभेची मुदत संपण्यासाठी अवघे काही आठवडे शिल्लक राहिले तरीही त्यावर निर्णय नाही.

याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना ‘म्हाडा’चे अध्यक्षपद बहाल केले. तर मागील चार वर्षांपासून ‘सिडको’ महामंडळाचे अध्यक्षपद रिक्त होते. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आमदार संजय शिरसाट त्यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदी निवड केली. पण भाजपकडून महामंडळावर पदाधिकाऱ्यांची निवड न करता ठेंगा दाखविण्यात आला.

गेल्या काही वर्षात भाजपमध्ये बाहेरच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात ‘इन कमिंग’ झाले, त्यातील काही आमदार, मंत्री देखील झाले. पण वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या डावलले जात आहे. अशांना महामंडळावर काम करण्याची संधी द्यावी याकडे भाजपने दुर्लक्ष केले.

तसेच एकाला संधी दिली तर दुसरा नाराज होतो, त्यामुळे पक्षातील नाराजांची संख्या वाढत जाते, त्यामुळे कोणालाच नियुक्ती द्यायची नाही, असा निर्णय असल्याचा विचित्र दावाही भाजपचे पदाधिकारी करत आहेत. पण यातून ठराविक लोकांच्या हाती पक्षाची सत्ता केंद्रित राहाते. अन्य अनुभवी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केवळ केंद्रीय व प्रदेश कार्यकारिणीकडून आलेल्या आदेशाचे निमूटपणे पालन करावे अशी स्थिती पक्षात आहे. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता आहे.

विभागनिहाय आमदार

विभाग - भाजप - काँग्रेस

पश्‍चिम महाराष्ट्र - 20-12

विदर्भ - 29-15

मराठवाडा - 16-08

ठाणे-कोकण - 11-02

मुंबई - 16-02

उत्तर महाराष्ट्र 13-04

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT