Sharad Pawar, Navneet Rana News Sarkarnama
विशेष

Amravati LokSabha News : अमरावतीच्या मैदानावर राणांचा गेम होणार ? पवार, ठाकरेंचा खेळाडू ठरला ?

NCP LokSabha Review Meeting : शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अमोल जायभाये

Sharad Pawar News : अमरावती मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार नवनीत राणांना (Navneet Rana) ताकद दिली होती. मात्र, त्यांना ताकद देऊन पक्षाने चूक केली, अशी कबुलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पवार अमरावतीच्या मैदानात कुणाला उतरवणार, त्यांच्या मनात असलेला चेहरा कोण आहे, याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दिंडोरी, नगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी आणि जालना लोकसभा मतदारसंघांचा आढावा पवारांनी घेतला. या वेळी आमरावती मतदारसंघाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद पवार यांच्यासमोर व्यक्त केली. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

अपक्ष खासदार नवनीत राणा यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव आढसूळ यांचा पराभव झाला. मात्र, राष्ट्रवादीचा पाठिंबा असतानाही राणा यांनी भाजपची री ओढली. भाजपचे समर्थन केले. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असताना राणा दाम्पत्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात राण उठवले होते. उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा म्हणण्याच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांना तुरुंगातही जावे लागले होते.

मात्र, आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी असतानाही त्यांनी सरकार विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देऊन चूक झाली, असे विधान पवार यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा संयुक्त उमेदवार असणार आहे. त्यामुळे पवार कुणाला मैदानात उतरवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी यंदा स्थानिक नेतृत्व आणि पक्षनिष्ठा असलेल्या व्यक्तीला पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसेच साहेब तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याला आम्ही निवडून आणू, असा शब्दही दिला.

पवारांच्या मनातील डायनामिक फेस कोण ?

नव्या दमाचा तरुण चेहारा पवार या वेळी अमरावतीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे. उच्चशिक्षित आणि पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे मांडणारा तसेच दिल्लीतही पक्षाला या उमेदवाराचा फायदा होईल, यादृष्टीने पवार विचार करत असल्याचे बोलले जात आहे. या उमेदवारामध्ये आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे तो चेहरा कोण असणार याची चर्चा सध्या अमरावतीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT