Dattatray Bharne replaces Manikrao Kokate as Agriculture Minister Sarkarnama
विशेष

Dattatray Bharne : माणिकराव कोकाटेंची चूक दत्तामामा भरणेंनी पहिल्याच फटक्यात सुधारली...

Dattatray Bharne gets Agriculture Minister : दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे. तर माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा व युवक कल्याण हे खाते देण्यात आले आहे.

Hrishikesh Nalagune

Dattatray Bharne News : सातत्याने वादग्रस्त विधाने, शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलपणे बोलणे यामुळे आधीच मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल नाराजी होती. त्यातच त्यांनी अपवाद वगळता पावसाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवली. पण या अपवादात्मक दिवसांतील एक दिवस त्यांचा विधानभवनात रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला अन् तिथेच उद्रेकाची ठिणगी पडली.

गुरुवारी रात्री कृषी मंत्रिपदावरून माणिकराव कोकाटे यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे. तर कोकाटेंकडे क्रीडा व युवक कल्याण हे खाते देण्यात आले आहे. भरणे यांनी मग आल्या आल्याच कोकाटे यांनी केलेली चूक सुधारत आपण शेतकऱ्यांप्रति किती संवेदनशीलपणे वागू, निर्णय घेऊ हे सांगितले आहे.

एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभार मानतो.

शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.

शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे ट्विट भरणे यांनी केले. यात त्यांनी आपण शेतकरी कुटुंबातून आलो आहोत, हे सांगितले. शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात हे सांगत संवेदनशील कृषी मंत्री होऊ असे आश्वासन दिले आहे.

खरंतर शेतकरी जसा चहूबाजूंनी संकटांनी घेरलेला, तसेच या खात्याचे मंत्रीही कायम संकटाच्या कोंढाळ्यात असतात. त्यामुळे शांतपणे आपल्या खात्याचे काम पाहणे, शक्य तितके कमीतकमी बोलणे आणि महत्वाचे म्हणजे या खात्याचा केंदबिंदू जो शेतकरी आहे त्यांच्याबद्दल सहानभूती व कळवळा, संवेदनशीलता बाळगणे हे भान कृषिमंत्र्यांनी बाळगायालाच हवे. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाच्या पहिल्या दिवसापासून हे उमजले नाही.

प्रत्येक महिना एक वाद असा त्यांचा स्कोर राहिला. कधी 'कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी आहे. ती अजितदादांनी मला दिली आहे.' अशा त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर त्यांनी पिकांच्या ढेकाळाचे पंचनामे करायचे का? असे विधानही केले होते. तर 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपया पीकविमा देतो,' असे वक्तव्य त्यांनी केले.

कर्जमाफीचे पैसे शेतकरी शेतासाठी न वापता त्या पैशात साखरपुडा आणि लग्न करतो, असे देखील कोकाटे यांनी एका शेतकऱ्याने कर्जमाफी विषयी विचारल्यानंतर म्हटले होते. तसेच नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांना दोषी ठरवते म्हटले होते की, चांगला भाव मिळाला की सगळेच शेतकरी कांद्याची लागवड करतो. त्यामुळे उत्पादन वाढते आणि भाव पडतो.

अगदी रमी खेळतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही कोकाटे शासन भिकारी आहे, असे विधान करून गेले. त्यामुळे कोकाटेंना हटवलं जाणार हे निश्चित झाले होते. आता नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवतील का? की त्यांचेही नाव वादग्रस्त म्हणून गणले जाणार हे येणारा काळच सांगेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT