Dhananjay Munde, Manikaro Kokate Sarakrnama
विशेष

Controversial Agriculture Ministers : धनंजय मुंडेंनी पाया रचला, माणिकराव कोकाटेंनी कळस चढवला...

Controversial Agriculture Ministers : धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी जेमतेम अडीच वर्षांच्या काळात कृषी मंत्रि‍पदाला वादग्रस्त ग्लॅमर मिळवून दिले आहे.

Hrishikesh Nalagune

Agriculture Minister : एरवी कुणाच्या खिजगणतीत नसणारे राज्याचे कृषिमंत्री पद गेल्या काही वर्षांपासून भलतेच फॉर्मात आले आहे. धनंजय मुंडे यांनी या बदलाची मुहूर्तमेढ रोवली आणि माणिकरावांनी त्यावर कळस चढवला आहे. मुंडे यांची दीड वर्षे आणि कोकाटे यांचे 8 महिने या जेमतेम अडीच वर्षांच्या काळात कृषी मंत्रि‍पदाला या दोन्ही नेत्यांनी वादग्रस्त ग्लॅमर मिळवून दिले आहे.

मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या काळातील कथित भ्रष्टाचाराच्या सुरस कथा आजही ऐकायला मिळतात. यात पिक विम्याचा बीड पॅटर्न असो, बाजार भावापेक्षा जास्त दराने शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी खरेदी केलेले साहित्य असो. याशिवाय भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी खात्यातील बदलांचे जाहीर केलेले रेट कार्ड आजही चर्चेत असते.

माणिकराव कोकाटे आणि वाद हेही नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत. महायुती सरकारला आणि कोकाटे यांच्या मंत्रिपदाला जेमतेम आठच महिने झाले आहेत. त्यातही दर महिन्याला एक वाद असा त्यांचा स्कोअर आहे. दर चार-दोन आठवड्यांनी चर्चेचा धुरळा उडवून देत त्यांनी या पदाला ग्लॅमर मिळवून दिले आहे.

याआधी सर्वप्रथम कोकाटे अडचणीत आले ते 1995 मधील शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणात. यात नाशिकच्या न्यायालयाने त्यांना 2 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे आमदारकी अडचणीत आली. मात्र कोकाटे यांनी याविरोधात सत्र न्यायालयात अपील केलं आणि त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली. त्यामुळे कोकाटे अगदी थोडक्यात वाचले.

त्यानंतर कोकाटे अडचणीत आले ते त्यांच्या शेतकऱ्यांविषयी नित्यनियमाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. कृषीमंत्री असूनही कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी नको ती वक्तव्य केली. भिकारी सुद्दा एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देतो. या वक्तव्यामुळे वाद उफाळला होता. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

त्यानंतर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करायला गेलेल्या कोकाटे यांना कर्जमाफीचा प्रश्न विचारला. त्यावर शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, कर्जमाफी, पिक विम्याच्या पैशातून घरातील लग्न, साखरपुडे करतात. हे विधान कोकाटे यांना प्रचंड अंगलट आलं. विरोधक, माध्यमे तुटून पडली. अखेर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

नुकसानग्रस्त कांदा पिकाच्या पंचनाम्यासंदर्भात बोलताना शेतात जे कांदे आहेत, त्याचे पंचनामे होतील, कापणी झाल्यानंतर काय ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल कोकाटे यांनी केला होता. कोकाटेंकडून वारंवार होणाऱ्या या विधानांना अजित पवारही चांगलेच वैतागले. त्यांनी कोकाटे यांना तंबी दिली. त्यानंतर कोकाटे यांनी काहीसा सावध पवित्रा घेतला.

कोकाटे जे बोलले त्यातील बहुतांश गोष्टी खऱ्याही असतील. पण मंत्र्याने त्यातही कृषी खात्याच्या मंत्र्याने इतके परखड बोलायचे नसते हे भान त्यांना राहिले नाही. आतापर्यंत मोजकेच मंत्री ही खाती सांभाळूनही निष्कलंक राहू शकले आहेत. त्यांनी शांतपणे आपल्या खात्याचे काम पाहिले. कमीतकमी बोलले आणि महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती, कळवळा, संवेदनशीलता बाळगली.

मंत्रिपदाच्या पहिल्या दिवसापासून कोकाटे यांनी हेच भान ठेवले नाही. त्यामुळे 8 महिन्यांत असंवेदनशील कृषिमंत्री असा ठपका त्यांच्यावर पडला. या सगळ्यावर कळस चढला तो रमी खेळण्याच्या व्हिडीओमुळे. आधीच अपवाद वगळता त्यांनी पावसाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवली होती. त्यात आलेल्या या व्हिडीओने त्यांची पुरती कोंडी केली.

आता या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अजित पवार यांनी राजीनाम्याऐवजी वेगळाच उपाय शोधल्याची चर्चा आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खाते साताऱ्याच्या मकरंद पाटील यांच्याकडे जाणार अशा बातम्या आहेत. तर पाटील यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खाते कोकाटेंकडे जाईल. असे झाले तर मदतीबाबत तरी कोकाटे यांनी संवेदनशीलता दाखवावी अशी नक्कीच अपेक्षा असणार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT