
Manikrao Kokate News : कृषिमंत्री माणिकराव हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या विधीमंडळात मोबाईलवर पत्ते खेळताना व्हिडिओ समोर आला आणि एकच खळबळ उडाली. कोकाटेंच्या कृतीवर विरोधपक्षांनी टीका केलीच पण सामान्य नागरिकांमध्ये देखील त्यांच्याविषयी राग दिसून येतोय.
कोकाटे हे काही पहिल्यांदाच वादात सापडलेले नाहीत. कृषिमंत्री असणाऱ्या कोकाटेंनी आपल्याकडे काहीच अधिकार नसल्याचे एका जाहीर कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली की त्या पैशात ते लग्न, साखरपुड्याचे कार्यक्रम करतात. तसेच शेतकऱ्यांची तुलना त्यांनी भिकाऱ्यांशी देखील केली होती. त्यांनी अनेकदा या वादग्रस्त विधानांच्यानंतर माफी मागितल्याचे देखील पाहाण्यास मिळाले.
एकामागून एक वादग्रस्त विधाने करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद आणि त्यातही कृषी खात्यासारखे महत्त्वाचे मंत्रिपद कसे मिळाले याचा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर त्यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यात दडलेले असल्याचे बोलले जाते. प्रचार सभेत त्यांनी, “माझा मतदारसंघ अजित पवार यांना सोपवतो आणि त्यांना निवडून आणतो,” असे विधान केले होते. हे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोकाटेंवरील विश्वास वाढला आणि त्यातूनच त्यांना मंत्रिपद मिळाले, अशी चर्चा आहे.
माणिकराव कोकाटे रोज नवी संकटे का ओढवून घेतात? वादग्रस्त वक्तव्य का टाळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपण मंत्री आहोत याचे भान अजुनही त्यांना आलेले दिसत नाही. कोकाटे यांच्या राजकारणाची मुख्य ओळख म्हणजे मतदारसंघातील विरोधकांना थेट, एकेरी आणि ग्रामीण शैलीत हिनवणे म्हणून आहे.
ग्रामीण भाषेत विरोधकांवर ज्या भाषेत टीका करतात आणि ज्या बिनधास्त प्रकारे विरोधकांना अंगावर घेतात त्यामुळे त्यांच्या भाषणांवेळी त्यांचे समर्थक जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद देतात. हाच त्यांचा राजकीय ब्रँड बनला आहे.
मात्र, मतदारसंघात बिनधास्त बोलणे आणि राज्याचा कृषिमंत्री म्हणून वक्तव्य करने यामध्ये मोठा फरक आहे. हेच कोकाटे विसरलेले दिसत आहेत. सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. मात्र, आता हा स्वभावच त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत आहे. मंगळवारी वादातून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पण काही तासांतच आणखी एका वादाला निमंत्रण दिले.
सिन्नर मतदारसंघातील राजकारण कै.तुकाराम दिघोळे, प्रकाश वाजे आणि खासदार राजाभाऊ वाजे हे कोकाटेंचे प्रमुख विरोधक राहिले आहेत. ग्रामपंचायत, सहकारी सोसायट्या, जिल्हा बँक किंवा विधानसभा निवडणुका असोत, प्रत्येक ठिकाणी कोकाटे यांनी आपल्या खास भाषाशैलीचा वापर करून प्रभाव निर्माण केला आहे.
पाच वेळा आमदार होण्यात कोकाटेंच्या 'बिनधास्त' कार्यशैलीचा मोठा वाटा आहे, तरीही नाशिक जिल्ह्यातील नेतृत्व त्यांना क्वचितच मिळाले. जिल्ह्यातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये किंवा नेतृत्वाच्या पदांवर त्यांचा सहभाग अपवादात्मक राहिला.
पदांसाठी धडपड करण्याऐवजी परिस्थितीनेच पदे त्यांच्या हाती आणून दिली. मात्र, आता ते फक्त सिन्नरचे नाहीत तर राज्याचे कृषिमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांवर राज्यभर प्रतिक्रिया उमटतात. कदाचित आपण आमदार नाही राज्याचे कृषिमंत्री आहोत हेच कोकाटे विसरत असावेत, अशी देखील चर्चा आहे.
कृषिमंत्री झाल्यानंतर कोकाटे यांनी अनेक चांगल्या निर्णयांची सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्यांमधील चुका आणि भाषेतील त्रुटी यावर विरोधक सतत बोट ठेवतात. त्यामुळे सकारात्मक कामगिरीवर पडदा पडून त्यांच्यावर वादग्रस्त छाप निर्माण होते. सध्या तरी विरोधक यशस्वी ठरत असून, कोकाटे अडचणीत सापडलेले दिसतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.