Devendra Fadnavis- Abdul Sattar
Devendra Fadnavis- Abdul Sattar Sarkarnama
विशेष

देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत तुम्हाला झापलं का? अब्दुल सत्तार म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना झापले, असे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. त्याबाबत कृषिमंत्री सत्तार यांनी ‘असा कोणताही प्रकार त्या बैठकीत झाला नाही. सरकारचा कोणताही धोरणात्मक निर्णय थेट माध्यमांजवळ जाहीर करू नये,’ असे फडणवीस यांनी मला हसत हसत सांगितले, या शब्दांत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे त्या मंत्रिमंडळ बैठकीची चर्चा पुन्हा एकदा होताना दिसत आहे. (Did Devendra Fadnavis scolded you in the cabinet meeting? Abdul Sattar said...)

सरकारचे धोरणात्मक निर्णय जाहीर करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या गुरुवारी (ता. १३ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी झापल्याची चर्चा रंगली होती. शेतकरी कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशी योजना राबवायची की केंद्र सरकारच्या योजनेत राज्याचा वाटा मिसळून ती मदत शेतकऱ्यांना द्यायची, याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे अधिकारी आणि सचिवांशी बोलणी करत आहेत. त्या योजनेला मूर्तरुप येण्याच्या अगोदरच ती बातमी फुटली आणि प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर झाली. त्यामुळे फडणवीस नाराज झाले होते. त्यावरून फडणवीस यांनी कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली, असा जाब विचारल्याची चर्चा होती. त्यावर बोलताना सत्तार यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.

सत्तार म्हणाले की, शेतकरी कृषी सन्मान योजनेबाबतचा धोरणात्मक निर्णयाची मी त्यावेळी घोषणा केलेली नव्हती. माध्यमांशी बोलताना मी फक्त माझ्या मनातील विचार व्यक्त केला हेाता. मात्र, प्रसार माध्यमांतून तो सरकारी निर्णय म्हणून बातमी आली. त्यामुळे सर्वत्र चुकीचा संदेश गेला. आम्ही काहीही सांगितले तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहीशिवाय कोणताही निर्णय होत नसतो, हेही तेवढेच सत्य आहे. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही खडाजंगी झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोणताही धोरणात्मक निर्णय माध्यमांमध्ये जाहीर करू नका,’ असे हसत हसत मला सांगितले. त्यावेळी मीही माझी बाजू त्यांच्यासमोर मांडली. सरकारचा धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करावी, अशी सूचना केली. फडणवीस हे उच्चविद्याविभूषित आहेत. वकील आहेत. त्यामुळे ते चपखल अगदी चौकटीत बसणारंच बोलतात. त्याउलट माझ बोलणं एकदम रफ आणि टफ आहे, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT