Tanaji Sawant, Anandrao Devkate, Sushilkumar Shinde
Tanaji Sawant, Anandrao Devkate, Sushilkumar Shinde Sarkarnama
विशेष

सोलापुरातून पेटली तिसऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात असंतोषाची ठिगणी!

अभय दिवाणजी

सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल असंतोषाची ठिणगी पडून त्यांच्यावर नामुष्कीची वेळ येण्यासाठी ‘सोलापूर' (solapur) कारणीभूत ठरण्याचा हा तसा तिसरा (हॅटट्रीक) प्रसंग ठरू शकतो. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास संबंधितांना वेळ लागला. पण, त्याची सुरुवात मात्र स्वपक्षीयांनी अन्‌ तेही सोलापूरकरांनी केल्याची नोंद इतिहासात होत आहे. (Dissatisfaction was first expressed from Solapur about work of Chief Minister Thackeray)

काँग्रेसच्या (Congress) कारकिर्दीत तत्कालीन आमदार सुशीलकुमार शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) बॅ. बाबासाहेब भोसले यांच्याविरुद्ध संघर्षाची ठिणगी पेटविली होती. त्यानंतर (कै.) आमदार आनंदराव देवकते यांनी पुकारलेल्या बंडातून तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक असंतोषाचे बळी ठरले होते. शिवसेनेचे (Shivsena) आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी मार्च २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेतील सुप्त संघर्षाला मोकळी वाट करून देत असंतोषाची ठिणगी पेटविली. त्यांचा राग जरी राष्ट्रवादीवर असला तरीही संघर्षाची ठिणगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कारभारावर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वपक्षीय आमदारांच्या रोषाचे बळी होण्याची वेळ आली आहे. शिवसेनेचे एकनिष्ठ व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली तब्बल तीन डझनावर आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेतील मंत्री, आमदारांची कामे होत नाहीत. जनतेच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. राष्ट्रवादीकडून सेनेच्या नेते व कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा याबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही बंडाळी माजली आहे. या संदर्भातील असंतोषाची सुरुवात सोलापुरातून झाली.

युवा सेनेचे सचिव वरुण देसाई यांच्या उपस्थितीत सोलापुरात २८ मार्च २०२२ रोजी संकल्प मेळावा होता. या मेळाव्यात मूळचे वाकावचे (ता. माढा, सोलापूर) व भूम-परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांनी सत्तेत भागीदार असतानाही पक्ष नेत्यांची व कार्यकर्त्यांची कशी अडचण होते आहे, याबाबत सडेतोड भाष्य केले होते. मोठमोठ्या कंत्राटाची कामे राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला, तर शिवभोजन थाळीचे काम शिवसैनिकाला देण्यात येत आहे. यातून कोणाची किती कमाई होते, यावरही जोरदार कटाक्ष टाकला होता. अशा विविध प्रकरणातून शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याची खंत व्यक्त केली होती. जिल्ह्यातील कोणत्याही सत्तेत सहभागी होता येत नसल्याने सामान्य शिवसैनिकाची कुचंबणा कशी होते, याचे उदाहरणासह चित्र रंगविले होते. शिवसेना पक्षप्रमुख मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर हातमिळवणी करत असल्याचे चित्र त्यांनी सखेदाश्‍चर्य व्यक्त केले होते. त्यांच्याकडून असंतोषाची पहिली ठिणगी पडल्याने शिंदे यांच्यासोबत बंडाच्या मोहिमेत ते आघाडीवर आहेत.

तत्कालिन मुख्यमंत्री (कै.) बॅ. भोसले यांनी १९८२ मध्ये नागपूर अधिवेशनावेळी सभागृहात काँग्रेसचे आमदार षंड, पुंड व गुंड असल्याचे जहरी भाष्य केले होते. त्यातून तत्कालिन आमदार सुशीलकुमार शिंदे (सोलापूर) यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकारात हक्कभंग दाखल केला. यावरुन अधिवेशनात खूप गदारोळ झाला होता. याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतल्याने बॅ. भोसले यांना असंतोषाला सामोरे जावे लागले. बॅ. भोसले यांच्याविरोधातील ही पहिली ठिणगी पडण्याला सोलापूर कारणीभूत ठरले होते.

सोलापूर जिल्ह्यातील कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील कालव्याच्या उद्‍घाटन समारंभाला १९९२ मध्ये तत्कालिन उद्योग मंत्री (कै.) विलासराव देशमुख आले होते. या कार्यक्रमापूर्वी सोलापूरच्या विश्रामगृहावर काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत तत्कालिन मुख्यमंत्री (कै.) सुधाकरराव नाईक यांच्या कार्यशैलीवरुन गदारोळ झाला होता. (कै.) नाईक हे सोलापूरकरांकडे दुर्लक्ष करतात. सोलापूरची कामे अडवतात. त्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे सोलापूरला विकास निधी मिळत नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी बंड पुकारण्याचे ठरविले होते. याच दरम्यान कंदलगाव येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमात दक्षिण सोलापूरचे तत्कालिन आमदार (कै.) देवकते यांनी त्यांच्या भाषणात (कै.) नाईक यांच्यावर तोंडसुख घेत (कै.) विलासराव देशमुख यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास सुचविले होते. या कार्यक्रमातील त्यांचे सडेतोड बोलणे, मुख्यमंत्र्याविरुद्ध जाहीरपणे व्यक्त केलेली नाराजी यामुळे सोलापूरचा कार्यक्रम राज्यभर गाजला होता. (कै.) नाईक हे त्यानंतर पदावरुन पायउतार झाले. त्याची वेगळी कारणे होती. परंतु (कै.) नाईक यांच्या विरोधातील बंडाळीच्या असंतोषाला सोलापुरातून सुरवात झाली होती, हे मात्र वास्तव आहे.

विलासरावांनी अशी केली परतफेड...

ज्या (कै.) आनंदराव देवकते यांनी तत्कालिन मुख्यमंत्री (कै.) सुधाकरराव नाईक यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा आरंभ करून (कै.) विलासराव देशमुख यांनी राज्याचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. त्या देवकते यांना विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रीमंडळात घेऊन लातूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT