Nitin Raut
Nitin Raut Sarkarnama
विशेष

महावितरणला कर्ज देऊ नका; मोदी सरकारचे बॅंकांना पत्र : राऊतांचा खळबळजनक आरोप

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी राज्यातील भारनियमनप्रकरणी केंद्रातील मोदी सरकारकडे (Modi government) बोट दाखवले. केंद्र सरकारने बँकांना पत्र लिहून महावितरणला (महाडिस्कॉम) कर्ज देऊ नका, असे कळविले आहे, असा आरोप ऊर्जामंत्री राऊतांनी केला आहे. आम्ही सर्व पर्यायांवर आम्ही लढतो आहे. पण, बँका आम्हाला कर्ज द्यायला तयार नाहीत, म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. (Do not lend to MSEDCL; Letter to banks given by Modi government : Allegation of Nitin Raut)

राज्यातील भारनियमनाच्या विषयावर ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते. ते म्हणाले की, कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी देशातल्या सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते. पण, त्यांच्या गैरव्यवस्थापनामुळेच सध्याची समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात ही परिस्थिती आहे. जर ही देशात परिस्थिती नाही, तर केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी सर्व राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांसोबत चर्चा का केली, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तुम्हाला कोळसा खरेदी करायचा असेल, तर कोळसा इम्पोर्टड करावा, असंही त्यांनी सांगितलं. याचा अर्थ देशात आणि राज्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनानंतर विजेची मागणी वाढली आहे. राज्य सरकारने योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले आहे. आमचे अधिकारी दररोज परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. बैठका घेत आहेत. अशी वेळ देशात दुसऱ्यांदा आलेला आहे. राज्यामध्ये विजेचे जे संकट निर्माण झाले आहे, ते कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेले नाही. आम्ही त्या समस्येवर काम करतो आहे. मात्र, काही लोकांना इच्छा असेल तर त्यांनी खुशाल मला बदनाम करावे. गेल्या दोन वर्षांत आम्ही व्यवस्थित वीज पुरवठा करू शकलो. आम्हाला आता कोळसा वापरून पावसाळ्यासाठीसुद्धा साठा करून ठेवायचा आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

ग्रामविकास विभागाने थकवले आठ हजार कोटी

ऊर्जामंत्री म्हणाले की, ग्रामविकास खात्याने ८ हजार कोटी रुपये दिले नाहीत, त्यामुळेही आमची थोडी कुचंबणा झाली आहे. त्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून तक्रार नोंदविली आहे. आम्हाला जर हे पैसे मिळाले, तर वीज घेणे शक्य होईल. येत्या १९ तारखेपर्यंत मी नियोजन केलेलं आहे, सर्व परिस्थिती सुरळीत होईल. सर्व पर्यायांवर आम्ही लढतो आहे; पण, बँका आम्हाला कर्ज द्यायला तयार नाही, त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

दानवेंनी आरोप करण्यापेक्षा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करावी

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आमच्यावर आरोप करताना चार बोट त्यांच्याकडेही आहेत, हे विसरू नये. आरोप करणे खूप सोपे आहे. राज्य आमचं असेल तरी ते विरोधकांचंही आहे. त्यामुळे त्यांनी सकारात्मक पद्धतीने विचार करावा आणि हा प्रश्न कसा सुटेल, यासाठी प्रयत्न करावा. जे वीजचोरी करतात, वीजबिल भरत नाहीत, त्यांचं काय करायचं. वीज फुकटात मिळत नाही, त्यासाठी पैसा लागतो, त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी वीजबिल प्रामाणिकपणे भरावे, त्यांचे उपकार सरकार विसरणार नाही, अशी विनंतीही राऊत यांनी या वेळी बोलताना केली.

सरकारी निमसरकारी खात्यात जे नियम, जे निकष आहेत, तेच राज्यातील जनतेला आहेत. तेच नियम तेच निकष सर्व खात्यांना लागू आहेत. दानवे यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आम्हाला सहकार्य करावं. त्यांच्याकडे रेल्वे खाते आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःला तपासून घ्यावे, असे आवाहनही नितीन राऊत यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT