Eknath Khadse-Ram Shinde Sarkarnama
विशेष

मोठी घडामोड : मतदानाला काही तास उरले असतानाच राष्ट्रवादी अन्‌ भाजप नेत्यांची भेट!

हॉटेल ट्रायडेंटसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांची भेट

सरकारनामा ब्यूरो

मुंंबई : विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council election) मतदानाला काही तास उरले असताना मोठी घडामोडी घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांची मुंबईतील हॉटेल ट्रायडेंटच्या बाहेर भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या ‘ट्रायडेंट’मध्ये शिंदे हे गेले होते, तर खडसे हे बैठक संपवून येत होते. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भेटीचा तपशील मात्र मिळू शकलेला नाही. (Eknath Khadse and Ram Shinde meet in front of Hotel Tridents)

विधान परिषद निवडणुकीला काही तासच उरले असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सर्व आमदार हॉटेल ट्रायडेंटमध्ये ठेवले आहेत. त्या ठिकाणी पक्षाकडून विधान परिषद मतदानाची रणनीती आखली जात आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना मतदानाबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीनंतरच खडसे आणि राम शिंदे यांच्यामध्ये भेट झाल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ खडसे आणि राम शिंदे हे दोघेही विधान परिषदेच्या या निवडणुकीतील उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील चर्चेबाबत राज्यात प्रचंड कुतूहल आहे. एकनाथ शिंदे यांच्या पराभवासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यूहरचना केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची व्यूहरचना उलथवून लावत खडसेंना आमदार करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे डाव-प्रतिडाव खेळले जात आहेत.

राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर खडसे हे हॉटेमधून बाहेर येत होते, तर आमदार राम शिंदे हे हॉटेल ट्रायडेंटमध्ये येत हेाते. माजी मंत्री राम शिंदे हे याच हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याने ते हॉटेलमध्ये येत होते. त्यावेळी दोघांची हॉटेलबाहेरच भेट झाली. खडसे हे अगोदर भाजपमध्ये होते, त्यामुळे पूर्वाश्रमीच्या या दोन सहकाऱ्यामध्ये काय चर्चा झाली याची उत्सुकता राज्याला लागून राहिलेली आहे. त्यातच राज्यसभेतील धक्कादायक पराभवानंतर महाविकास आघाडी अधिक सावध झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपली स्ट्रॅटेजी स्वतंत्रपणे आखली आहे.

दरम्यान, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे आज बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेणार आहेत. ही भेट आज दुपारी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT