Eknath Shinde-Abdul Sattar
Eknath Shinde-Abdul Sattar Sarkarnama
विशेष

एकनाथ शिंदेंकडून अवघ्या आठच दिवसांत अब्दुल सत्तारांना बंडखोरीचे 'रिटर्न गिफ्ट!'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेविरोधात (Shivsena) केलेल्या बंडखोरीमध्ये साथ देणारे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना अवघ्या आठच दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठे रिटर्न गिफ्ट दिले आहे. सत्तार यांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमधील ८० कोटी ९० लाख रुपये किमतीच्या सूत गिरणीचा आराखडा अवघ्या दोन मिनिटांतच मजूर करून दिला आहे. ‘ही काही मामुली गोष्ट नाही, त्या कामासाठी १५ कोटींचा निधीही वितरीत केला आहे. एवढं मोठं मन ठेवणारा मुख्यमंंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला आहे,’ असे माजी राज्यमंत्री तथा आमदार सत्तार यांनी सांगितले. (Eknath Shinde approves Rs 81 crore yarn mill arena in Abdul Sattar's Sillod constituency)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही सूती गिरणी मंजूर केली आहे. त्या सूत गिरणीच्या कार्यक्रमाला यावे; म्हणून त्यांची तारीख घेण्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पहिला कार्यक्रम हा मराठवाड्यात सिल्लोडला होणार आहे.

गेल्या दीड ते दोन वर्षांत आमची जी कामे रखडली होती, ती सर्व कामे मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीनच दिवसांत मार्गी लावली आहेत. माझ्या एकट्याचीच नव्हे तर सर्वच आमदारांची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझ्या मतदारसंघातील विकासाच्या काही बाबी थांबल्या होत्या, त्यांनाही शिंदे यांनी न्याय दिला आहे, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाबाबत बोलण्याएवढा मोठा नाही. मी एक साधा कार्यकर्ता आहे. अडीच वर्षांपूर्वी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत आलो आहे, त्यामुळे मी त्यावर बोलणे योग्य होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच यावर बोलतील, असे मला वाटते. शिंदे यांच्याकडून कामे होत होती, ती न करण्याची चूक उद्धव ठाकरे यांच्याकडून होत होती का, यावरही ते म्हणाले की त्यावेळची परिस्थिती, कोरोनाचे संकट, त्यामुळे दोन वर्षे कशी गेली, हे आम्हालाही कळलं नाही. पण दोन वर्षांची थांबलेली कामे शिंदे यांनी मार्गी लावली, याचा आनंद मोठा आहे. देश स्वातंत्र झाल्यापासून इतके पैसे कधीही मिळाले नाहीत, तेवढा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडला दिलेला आहे.

शिवसेनेच्या चिन्हाबाबत कायदेतज्ज्ञ, नियम यांवर मी बोलू शकत नाही. आमचा संपूर्ण ५० आमदारांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. ते जो कोणताही निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असणार आहे. तसेच, किरीट सोमय्यांनी आपले शब्द परत घ्यावेत. मागील सरकारनेही कोविडच्या काळातही आपल्या पद्धतीने काम केले आहे. अशा पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी बोलू नये, असे मला वाटते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजप नेत्यांना याबाबत सांगतील, असेही सत्तार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT