सोलापूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) युतीच्या सरकारच्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसचे (Congress) तब्बल ११ आमदार अनुपस्थित होते. याची गंभीर दखल घेत काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांची झाडाझडती घेतली आहे. पक्षाने संबंधित आमदारांकडे याबाबतचा खुलासाही मागितला आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी कारवाईची मागणी केली आहे. मात्र, यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, धीरज देशमुख, विजय वडेट्टीवार यांसारख्या बड्या नेत्यांवर तोळामासाची काँग्रेस कारवाईचे धाडस दाखवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. (Will Congress show courage to take action against Ashok Chavan, Praniti Shinde and Dheeraj Deshmukh?)
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने शिवसेनेने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, अडीच वर्षातच शिवसेनेतील ३९ आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटला आणि त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर सरकार अल्पमतात आल्याचे पाहून मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा दिला.
या सर्व घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले. त्यात पाहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना मतदानासाठी व्हीप बजावला होता. विशेषतः विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी हजर राहणे अपेक्षित होते. पण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी, माधवराव जवळगावकर हे त्यावेळी गैरहजर राहिले. पक्षाने त्यांना नोटीस देऊन खुलासा मागविला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रकरणी अनुपस्थित आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, राज्यात तोळामासाची ताकद असणारी काँग्रेस या बड्या नेत्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? हा कळीचा मुद्दा आहे. कारण यामध्ये अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. प्रणिती शिंदे या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. धीरज देशमुख हे (स्व.) विलासराव देशमुखांचे चिरंजीव आहेत. वडेट्टीवार हे ओबीसी समाजातील मोठे नेते आहेत. कुणाल पाटील हे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे या बड्या नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता तशी कमीच आहे.
सोलापूरची काँग्रेस अडचणीत
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत स्थितीत होती. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढपूर-मंगळवेढा, शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते. सोलापूर लोकसभाही काँग्रेसच्या ताब्यात होती. पण, दोनवेळा खासदारकीला पराभव झाल्यानंतर शिंदे यांनी आता प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम करावे, असे आवाहन करत आपण राजकारणापासून अलिप्त होत असल्याचे म्हटलेले आहे. अशावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्षाने आमदार प्रणिती शिंदेंना मंत्रिपद देऊन पक्षाला पुन्हा मजबुतीकडे नेण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना कार्याध्यक्ष करून जिल्ह्याऐवजी राज्यात लक्ष देण्यास भाग पाडले. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे संघटन विस्कळीत झाले असून नेत्यांअभावी कार्यकर्ते सैरभर झाल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.