Mumbai News : शिवसेना फुटल्यापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमधून विस्तवही जात नाही. तसेच शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही शिवसेना एकमेकांवर अत्यंत टोकाचे आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. पण ज्या महाविकास आघाडीचं नवं समीकरण जुळून आणण्यात मोठा वाटा असलेल्या शरद पवारांनी थेट ठाकरेंचं सरकार पाडण्यास कारणीभूत ठरलेल्या एकनाथ शिंदेंचा दिल्लीत सत्कार केला. यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना संतापली. संजय राऊतांनी तर पवारांवर टीकेची झोड उठवली. या टीकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना आक्रमक झाल्यानंतर पुन्हा सारवासारव करण्याची वेळ आली. आता परत एकदा संजय राऊतांनी (Sanjay Raut) शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊतांनी बुधवारी (ता.19) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवारांमुळेच 2019 ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत, असा गौप्यस्फोट केला आहे.यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राऊतांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा शरद पवार आले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. यावेळी एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचे (Sharad Pawar) आभार मानले होते. तसेच तसंच पवारांनी इतरांवर राजकीय गुगली टाकली.पण माझ्यावर कधी अशी गुगली टाकली नाही आणि भविष्यातही ते टाकणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला होता.
तर याच कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी देखील एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं. मात्र,शरद पवारांनी शिंदेंचं कौतुक करतानाच ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केल्याचं वक्तव्य केलं होतं. तेच ठाकरेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळालं होतं.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवर टीका करतानाच राजकारण आम्हाला देखील कळतं, पण राजकारणात काही गोष्टी टाळायच्या असतात.ज्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) महाराष्ट्रातील सरकार पाडलं.बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं. ही आमची भूमिका आहे.आम्ही राज्यातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर आणि वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.
शिवाय आपण जेष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी शिवसेना अमित शहांच्या सहकार्याने तोडली आणि राज्य कमजोर केलं अशांना आपण सन्मानित करता.अशामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील.तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं, पवारसाहेब काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात, असं राऊत म्हणाले होते.
त्यानंतर संजय राऊतांच्या संतप्त प्रतिक्रियेवरुन एकनाथ शिंदेंची शिवसेना,अजित पवारांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे पुन्हा राऊतांवर सारवासारव करण्याची वेळ आली. ते म्हणाले,माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहिती नाही. शरद पवारसाहेब आम्हाला वडिलांसमान आहेत.पण मी माझ्या पक्षाची एक भूमिका मांडली. मी त्यांच्यावर टीका केली नाही तर माझ्या पक्षाची भूमिका मांडली असल्याचंही स्पष्टीकरण राऊतांनी यावेळी दिलं होतं.
पण आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.ते म्हणाले, भाजपने जर आमचा शब्द पाळला असता तर तेव्हा शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना विधिमंडळ पक्षाचे नेते केलं तिथेच त्यांनी शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचा संकेत दिला होता असे राऊत म्हणाले. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंचा सत्कार केला पण त्याच शरद पवार आणि अजित पवारांनी शिंदेंना महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री होऊ दिलं नाही,असाही दावा संजय राऊतांनी केला आहे.
राऊत म्हणाले, भाजपाबरोबर सत्तास्थापन करण्यावेळी शिंदेंनाच विधिमंडळाचे नेतेपदही दिलं होतं. पण तेव्हा सरकार स्थापन होऊ शकलं नाही.मात्र, आज ते ज्यांच्याबरोबर बसले आहेत असे अजित पवार, ज्यांनी त्यांचा दिल्लीत सत्कार केला असे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत,अशी भूमिका घेतली होती. ते फारच ज्युनिअर आहे,आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, अशी भूमिका मांडली होती”, असा गौप्यस्फोटही संजय राऊतांनी यावेळी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.