
Thane News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. दुसरीकडे महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून महायुतीचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. राज्यातील सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना व भाजपमध्ये या-ना त्या कारणाने कुरघोडीचे राजकारण नेहमीच पहावयास मिळत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातील बालेकिल्ल्यावर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मंगळवारी पार पडलेल्या कार्यक्रमात सीएम फडणवीस यांनी या ठिकाणच्या आमदाराला बळ देण्यासाठी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे.
गेल्या काही दिवसापासून भाजपने ठाण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात भाजपने (BJP) आक्रमक राजकारण सुरु केले आहे. याचा थेट फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसणार आहे. ठाणे शिंदेंचा बालेकिल्ला आहे. त्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हा भाजपनं ठाण्यातून येणाऱ्या रविंद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली. शिंदेंना ठाण्यात शह देण्यासाठी चव्हाण यांना तगडं मंत्रालय देण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर चव्हाण यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे. नवी मुंबईवर वर्चस्व असणाऱ्या गणेश नाईकांना मंत्रिपद देत भाजपने त्यांच्या मागे ताकद उभी केली आहे. त्यांनी ठाण्यात जनता दरबार घेत शिंदे यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या नवी मुंबईतील 27 माजी नगरसेवकांने पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेशी दोन हात करण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. नाईक यांना वनमंत्रिपद देत त्यांच्यामागे ताकद उभ्या करणाऱ्या भाजपने आमदार किसन कथोरे यांनाही सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला (Shivsena) घेरण्याची तयारी भाजपने आखल्याचं दिसत आहे.
ठाणे आणि पालघर एक जिल्हा असताना गणेश नाईक 10 वर्षांहून अधिक काळ पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांना या भागाची चांगली माहिती आहे. आगरी समाजाची पार्श्वभूमी असलेल्या नाईक यांना मानणारा मोठा वर्ग ठाणे, पालघरमध्ये आहे. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना नवी मुंबईत ठाण्यावरुन होणाऱ्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल नाईक जाहीरपणे बोलले होते. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासूनच नाईक यांनी सत्ता राखली आहे. मात्र, सध्या प्रशासकीय राजवट असल्यानं नाईक नाराज आहेत.
भाजपने येत्या काळात ठाण्याच्या शहरी भागात गणेश नाईक यांच्या माध्यमातून आक्रमकपणे राजकारण सुरु केले आहे. तर ग्रामीण भागात आमदार किसन कथोरेंच्या माध्यमातून शिवसेनेला टक्कर देण्याची रणनीती आखली आहे. कुळगाव-बदलापूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता आणू, अशी घोषणा कथोरेंनी केली. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी बदलापुरात केलेले विधान कथोरेंची ताकद वाढवणारे आहे. तुम्ही मंत्री नसलात, तरीही तुमच्या मागे मुख्यमंत्री उभा आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे कथोरेंचं बळ वाढलं आहे.
शिंदे आणि नाईक यांच्यातील संघर्ष सर्वश्रृत आहे. त्याचप्रमाणे कथोरे आणि शिवसेनेचं जमत नाही. भाजपने अशाच नेत्यांकडे आता महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. नवी मुंबईत नाईक यांच्याविरोधात विधानसभेला शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांनी बंडखोरी केली.
अपक्ष लढणाऱ्या चौगुले यांना आता शिंदेंनी उपनेतेपद दिले आहे. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपमधून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २७ माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले होते. त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देत भाजपने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजपकडून करण्यात येत असलेल्या वाढीव राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.