CM Eknath Shinde Sarkarnama
विशेष

Eknath Shinde : पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची कसोटी!

Eknath Shinde and Vidhan Sabha Election: एकनाथ शिंदेंना पन्नासपेक्षा अधिक आमदार निवडून आणावे लागतील. तसे झाले नाही तर...

प्रकाश पाटील - Prakash Patil

Shivsena Politics: शिवसेना पुढच्या वर्षी साठ वर्षे पूर्ण करीत आहे. विधानसभेची ही पहिली निवडणूक असेल की, ठाकरेंशिवाय शिवसेना धनुष्यबाण घेऊन लढत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना पन्नासपेक्षा अधिक आमदार निवडून आणावे लागतील. तसे झाले नाही तर उद्धव यांचे पारडे जड झालेले दिसेल. सध्या शिंदे हे आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जात आहेत. त्याचा लाभ त्यांना मिळेल, असे दिसते.

बदलापूर घटनेनंतर महायुती सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर गेले होते. ही घटना ठाणे जिल्ह्यात घडल्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी लक्ष्य करणे स्वाभाविक होते. परंतु कोणत्याही मुद्याचे विरोधकांना श्रेय जाऊ नये, याची दक्षता सत्ताधारी महायुती सरकार घेत आहे. तर महाविकास आघाडीही सरकारला कात्रीत पकडण्याची संधीही सोडत नाही.

बदलापूर घटनेनंतर आरोपीला अटक झाली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. त्याला फाशीच व्हायला हवी अशी मागणी राज्यातून धोर धरत असताना अचानक चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला अशी बातमी येऊन धडकली. या बातमीचाही धुरळा उडाला तो अद्याप खाली बसलेला नाही. आता प्रश्‍न उपस्थित केला जात आहे की खरेच ही चकमक होती का ? न्यायालयाने काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

पुढे काय होईल ते न्यायालयात सिद्ध होईल. पण, या घटनेनंतर महायुती सरकारच्या जिवात जीव आला. आगामी निवडणुकीत पुतळाप्रकरणाबरोबर बदलापूर मुद्दाही गाजणार आहे. आजच्या घडीला मात्र शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून फलक झळकले.

‘एकनाथ एक न्याय’ तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कार्यकर्ते तरी कशी मागे राहातील त्यांनी थेट फडणवीसांच्या हातात बंदूकच दाखविणारे पोस्टर झळकवले. ते काही तासात महापालिकेने काढूनही टाकले.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे महायुतीतही श्रेयवादाची लढाई सुरू आहे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना पुढे आहे. या लढाईचा परिणाम निवडणूक काळात अधिक गडद होतो. त्यामुळे आत्ताच काळजी घेण्याची गरज आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर बारीक लक्ष -

आज महाविकास आघाडी जोरात असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनावर आणि विरोधीपक्षातील विशेषत: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर बारीक लक्ष्य ठेवले आहे. त्यांना हालचाल करून द्यायची नाही. जो कोणी नेता तिकडे जाईल किंवा जाण्याचा प्रयत्न करेल त्याला कुठे रोखायचे यासाठी यंत्रणा काम करीत आहे.

एकत्र शिवसेनेचे ६३ आमदार होते त्यापैकी ५० आमदार शिंदे यांच्याबरोबर आहेत. या प्रत्येक मतदारसंघात विद्यमान आमदारांना शिंदेनी इतकी ताकद लावली आहे की विरोधी उमेदवाराची कशी डाळ शिजणार नाही, याची काळजी घेत आहेत. शिवाय आज जेथे शिवसेनेचे आमदार आहेत त्या प्रत्येक मतदारसंघात नव्या चेहऱ्यांनाही निवडून आणण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

राज्यातील जनतेमध्ये एक संदेश गेला आहे की मुख्यमंत्री म्हणून शिंदे भारी आहेत. ते मदत करतात. महत्त्वाचा मुद्दा आता उरतो तो की शिंदेच्या शिवसेनेला महायुतीत किती जागा मिळतील? महायुतीचा विचार केला तर भाजपचे ११० उमेदवार निवडून आले आहेत.

म्हणजेच भाजप किमान १६० जागा लढवू शकते. शिवसेना ७५ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ६५ जागा लढवू शकते असे वाटते. काही झाले तरी भाजप (BJP) सर्वाधिक जागा लढवून जिंकलेल्या जागा पुन्हा राखण्याचा प्रयत्न करणार हे आलेच. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना यावेळीही स्ट्राइक रेट वाढविण्यासोबतच अधिक जागा मिळणे गरजेचे आहे.

खरी कसोटी विधानसभेला -

यावेळची निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. यावेळी शिंदे शिवसेनेबरोबर भाजप आहे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. पण, शिवसेना दुभंगलेली आहे. आता नेतृत्व खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आले आहे. पक्षाचे ते ही प्रमुख बनले आहेत.

त्यामुळे जे काही यशापयश येईल त्याची जबाबदारी त्यांनाच स्वीकारावी लागणार आहे. लोकसभेला चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्र्वास आला आहे. लोकसभेपेक्षा खरी कसोटी विधानसभेला लागणार आहे. शिंदे यांचे वाढचे प्रस्थ हे भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्याचा परिणाम जागावाटपात दिसू शकतो.

एकनाथभाऊ नंतर देवाभाऊ -

पंधरावीस दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. हे पंधरा दिवसही सत्ताधारी महायुतीसाठीही महत्त्वाचे आहेत. या पंधरा दिवसात सरकार राज्यातील जनतेसाठी दिवाळीची भेट म्हणून काय देते. आणखी कोणत्या योजना जाहीर करते. बहीण, भाऊ, तीर्थयात्रांसह लोकप्रिय योजनांचा पाऊस पडला आहे.

या योजनांबरोबर एकनाथभाऊ दिलदार असल्याचे संदेश राज्यात गेला आहे. एकनाथभाऊ नंतर देवाभाऊचेही फ्लेक्स आता झळकत आहेत. एकंदरच दोन भाऊ आणि एक दादा राज्यात पुन्हा सरकार आणतील का? जनता त्यांच्यावर किती विश्र्वास टाकते हे पाहावे लागेल.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : ९८८१५९८८१५

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT