Women Polling booths Sarkarnama
विशेष

Women Polling Booth : महाराष्ट्रात '400 पार' मतदान केंद्रांचे नियंत्रण नारीशक्तीच्या हातात !

Gender Equality : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे. लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक विभागाने यंदा मोठी झेप घेतली.

Sachin Deshpande

Maharashtra Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महिलांची मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्या दृष्टीने राज्यातील जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय यंत्रणा कामाला लागली आहे. यासाठी वेगळे नियोजनच प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार आहे. मतदारांनादेखील प्रशासनातील, यंत्रणेतील महिला सशक्तीकरणाचा प्रत्यय येईल.

लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात या वेळी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी यासुद्धा महिलाच असतील, असे नियोजन करण्यात आले आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये 33, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये 30, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशीम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.

या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन नजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुक 2024 मध्ये जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये अहमदनगर 12, अकोला 6, अमरावती 8, औरंगाबाद 20, बीड 6, भंडारा 7, बुलढाणा 14, चंद्रपूर 6, धुळे 5, गोदिंया 4, हिंगोली 6, जालना 5, कोल्हापूर 10, लातूर 6, मुंबई शहर 10, नागपूर 12, नांदेड 20, नंदूरबार 4, उस्मानाबाद 16, पालघर 6, परभणी 4, पुणे 21, रायगड 7, सांगली 8, सातारा 16, सोलापूर 22, वर्धा 8 आणि यवतमाळ 7 असे असणार आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT