Sangram Thopete, Vijay Wadettiwar, Yashomati Thakur, Sunil Kedar News Sarkarnama
विशेष

Congress News : काँग्रेसवाल्यांनो कुठे नेऊन ठेवलाय तुमचा विरोधी पक्षनेता?

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole News : सत्ता आली काय अन् ती गेली काय, पक्ष वाढतोय की तो संपतोय याचे फारसे सोयरसुतक नसलेल्या कॉंग्रेसमधील लाथाळ्याचे राजकारण संपत नाही. ते संपविण्याचे नावही कोणी नेता घेत नाही. अर्थात, कॉंग्रेस अजूनही नव्या, बदललेल्या स्थितीत राजकीय 'शाहणी' होत नसल्याचेच दिसत आहे. भाजपला विरोधाची भाषा बोलून दाखविणाऱ्या कॉंग्रेसने २५ दिवसानंतरही विधानसभेतील विरोधी नेता निवडता आलेला नाही. राज्यातील नेत्यांमधील राजकारण, गटतटांतच 'विरोधी' नेत्यांचे नाव फसल्याचे स्पष्ट आहे. कोणाला नाराज करायचे नाही, पुढे येईल त्याला गोंजणाऱ्या दिल्लीतील नेतृत्वानेही बघ्याचीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विरोधी नेता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली. यामुळे महाविकास आघाडीमध्येही आणि विरोधी पक्षातही काँग्रेस मोठा पक्ष झाला आहे. काँग्रेसने विरोधी पक्षपदावर दावा सांगितला. मात्र, अर्धे अधिवेशन संपत आले तरीही विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचे हे ठरलेच नाही. यामुळे विरोधी पक्षनेतेपद अजुनही रिक्त आहे.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तरीही काँग्रेसला (Congress) विधानसभेचा अध्यक्ष निवडता आला नव्हता. अध्यक्ष कोण होणार यावरुन पक्षात मतभेद होते. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक अधिवेशने झाली. त्यामध्ये उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीच काम पाहिले. आघाडीने वेळेत अध्यक्ष निवडला असता तर भाजप आणि शिंदे यांना ऑपरेशन कमळ सोपे गेले नसते, असा आरोपही झाला होता. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपने पहिले अध्यक्षपदावर राहुल नार्वेकर यांची निवड केली. राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचा पुढील मार्ग सुखर झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरुन जोरदार रस्सिखेच सुरु आहे. या पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामध्ये आमदार संग्राम थोपटे, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार ही नावे पुढे येत आहेत. यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. मात्र, अजुनही या पदावर तोडगा निघालेला नाही. अधिवेशन संपेपर्यंत तरी काँग्रेस विरोधी पक्षनेता ठरवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT