Ajit Pawar-Yashomati Thakur Sarkarnama
विशेष

Assembly Session : यशोमतीताई, भावाच्या नात्याने ओवाळणी देतो; पण सावत्र भावाप्रमाणे मला बघू नका; अजितदादांचा टोमणा

Ajit Pawar To Yashomati Thakur: महाविद्यालय देताना आम्ही बाळासाहेब थोरात यांनाही दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची परवानगी घेऊन थोरात यांना महाविद्यालय देण्यात आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : यशोमतीताई, भावाच्या नात्याने ओवाळणी देतो, काही काळजी करू नका. तुम्ही चष्मा बदला, सावत्र भावाच्या हिशेबाने तुम्ही मला बघू नका. मी सावत्र बहिणीच्या हिशेबाने बघत नाही. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची काहीही मतं असली तरी आम्ही कोणताही भेदभाव केलेला नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी काही मतं मांडली आहेत, त्याबद्दल सरकार सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने मांडलेल्या पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेस व इतर नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना चिमटा काढला.

अजित पवार म्हणाले की, काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरातांनी आरोप केले की सत्ताधारी पक्षालाच निधी दिला जातो, विरोधी पक्षाला निधी दिला जात नाही. पण, २०१९, २०२०, २०२१ मध्ये जे सूत्र होते, ते पुढे चालू ठेवले आहे, त्यात कोणताही बदल केलेला नाही. (त्याचवेळी विरोधी बाकावरून जोरदार विरोध करण्यात आला) यशोमतीताई आणि वर्षाताई माझ्या बहिणीसारख्या आहेत, तुम्ही माझं ऐकून घ्या. आपल्याला विचारायचा अधिकार आहे. महाविद्यालय देताना आम्ही बाळासाहेब थोरात यांनाही दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची परवानगी घेऊन थोरात यांना महाविद्यालय देण्यात आले आहे.

राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांसाठी मार्जिन मनी लोनसाठी ५४९ कोटी रुपये दाखविण्यात आलेले आहेत. काही जणांचे कारखाने आहेत, त्यांच्यासाठी तरतूद केलेली आहे. शेतकरीहित डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. तसेच, बिनव्याजी कर्जासाठी ७९८ कोटींची तरतूद केली आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

अर्थमंत्री पवार म्हणाले की, आमचे सरकार शहरी-ग्रामीण असा भेदभाव करणार नाही. सर्वांना समान न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. अंगणवाडी सेविका यांच्या वाढीव मानधनाची रक्कम या पुरवणी मागण्यांमध्ये दाखविण्यात आलेल्या आहेत. तसेच, कांदा उत्पादकांसाठी साडेतीनशे रुपये क्विंटलप्रमाणे ५५० कोटी रुपये पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT