yashvantrao chavhan  Sarkarnama
विशेष

Maharshtra Political News : विधानसभेत ऐतिहासिक दोन तृतीयांश बहुमत मिळवणारे पहिले मुख्यमंत्री कोण माहिती ?

Sachin Waghmare

Vidhnnsbha Election : महाराष्ट्र विधानसभेची चौदावी निवडणूक येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे. 1960 पासून आजपर्यंतचा इतिहास पहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणाने खरे पाहिले तर अनेक चढउतार पाहिले आहेत. विशेषतः 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि दोनच वर्षांमध्ये विधिमंडळाची निवडणूक घेतली गेली.

या निवडणुकीत काँग्रेसने विधानसभेत ऐतिहासिक दोन तृतीयांश बहुमत मिळवले. विशेषतः ही विधानसभेची पहिली निवडणूक यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यामध्ये काँग्रेसने दोन तृतीयांश बहुमत मिळवल्याने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. या काळात यशवंतरावांनी राज्यभरात कृषी, औद्योगिक, उद्योग, शिक्षण, सहकार, सिंचन या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांची २५ नोव्हेंबरला ३९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त...

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ ला सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यासोबतच भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते, तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्रीसुद्धा होते. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिकांनी महागुजरात चळवळीतून ही मागणी लावून धरली आणि अखेर 1 मे 1960 रोजी या राज्याची विभागणी झाली.

गुजराती भाषिकांचे गुजरात व मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे राज्य त्यानंतर तयार झाले. 1946 ते 1952 या कालावधीत मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर होते, तर त्यानंतर मोरारजी देसाई यांनी चार वर्षांसाठी हे पद सांभाळले.1956 ते 1960 या चार वर्षांमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबईचे मुख्यमंत्री होते आणि 1960 मध्ये नव्या आणि आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले.

215 जागा जिंकून विधानसभेत मिळवले होते बहुमत

महाराष्ट्र विधानसभेच्या 264 मतदारसंघांसाठी 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. ही निवडणूक यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेसचा असलेला प्रभाव नव्या राज्याच्या निवडणुकांमध्येही दिसून येत होता. या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) सर्व 264 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये 215 जागा जिंकून विधानसभेत एकतर्फी बहुमत मिळवले.

शेतकरी कामगार पक्ष झाला होता विरोधी पक्ष

पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला 15 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला 9, कम्युनिस्ट पक्षाला 6, रिपब्लिकन पार्टीला 3 आणि समाजवादी पक्षाला एक जागा मिळाली होती. या विधानसभेत 15 अपक्षही निवडून आले होते. या विधानसभेच्या सभापतिपदी बाळासाहेब भारदे यांची पहिल्यांदा निवड झाली. 1962 मध्ये संरक्षणमंत्रिपदी निवड झाल्यामुळे यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र सोडून केंद्रात जावे लागलं. त्यानंतर मारोतराव कन्नमवार यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

पहिल्या विधानसभेत हे होते सदस्य

विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीनंतर विधानसभेत बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavhan) सदस्य होते. या दोघेही कालांतराने मुख्यमंत्री झाले. याबरोबरच रत्नाप्पाणा कुंभार, विदर्भाचे सिंह म्हणून ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे, सहकारमहर्षी केशवराव सोनवणे, मुंबईचं वानखेडे स्टेडियम ज्यांच्या नावे आहे ते शेषराव वानखेडे असे अनेक नामवंत सदस्य या विधानसभेत होते. ख्यातनाम लेखक, नाटककार आणि 'मराठा'कार आचार्य अत्रे दादर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. लेखिका सरोजिनी बाबर यासुद्धा या विधानसभेच्या सदस्या होत्या. गणपतराव देशमुख सर्वात पहिल्यांदा या विधानसभेमध्ये सदस्य निवडून गेले. शेकापच्या तिकिटावर कृष्णराव धुळपसुद्धा या विधानसभेत निवडून गेले होते. धुळप यांनी दहा वर्षे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सांभाळले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या मार्मिक साप्ताहिकाचे केले होते प्रकाशन

1960 मध्ये महाराष्ट्र नावाचं स्वतंत्र भाषावार प्रांतरचनेनुसार राज्य स्थापन झालं असले तरी मुंबईत आणि महाराष्ट्रात आपलीच म्हणजे मराठी लोकांचीच पीछेहाट होत असल्याने याच भावनेला ओळखून आणि त्याला वाट निर्माण करून देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर तीन महिन्यांमध्येच त्यांनी मार्मिक या साप्ताहिकाची स्थापन केली. या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन थेट मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीच केलं होतं. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. त्याआधी काही दिवस आधीच मार्मिकमधून शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या नोंदणीसाठी जाहिरात प्रसिद्ध होत होती. शिवसेनेच्या रुपाने नव्या महाराष्ट्रात एका नव्या प्रादेशिक पक्षाने जन्म घेतला होता. त्यानंतर पुढील दोन वर्षांमध्ये शिवसेनेनं वेगानं शाखाविस्तार केला आणि मुंबईभर शिवसेना पसरू लागली. यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेचा राज्यभर विस्तार झाला.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT