eknath shinde| devendra fadnavis |ajit pawar Sarkarnama
विशेष

Mahayuti News : राज्यपाल नियुक्त आमदारांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली; घटक पक्षातही नाराजी

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी निवडणूक आयोगाने केली. त्यामुळे आता येत्या काळात राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीची भूमिका घेणाऱ्या आमदारांना रोखण्यासाठी महायुतीमधील तीन घटक पक्षाने 12 पैकी 5 जागा रिक्त ठेवल्या आहेत. मात्र, या रिक्त ठेवलेल्या जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्याने महायुतीसमोरील डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळात राज्यातील राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त होत्या. सुरवातीला या रिक्त जागा भरण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे यादी पाठवली होती. मात्र, ती यादी मंजूर न झाल्याने महायुती सरकारने ती यादी परत घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेल्याने त्यावर बऱ्याच दिवसापासून निर्णय होत नव्हता.

काही दिवसापूर्वी महायुती सरकारने पुन्हा एकदा या रिक्त असलेल्या 12 जागा भरण्यासाठी नव्याने यादी तयार ठेवली होती. या रिक्त असलेल्या 12 जागा भरण्यासाठी भाजप , शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटात फॉर्म्युला ठरला होता. मात्र, ऐनवेळी पुन्हा एकदा या प्रकरणी काही जणांनी कोर्टात धाव घेतल्याने सुनावणी झाली व कोर्टाने निकाल राखीव ठेवला होता.

ऐन निवडणूक घोषणेच्या काही तासापूर्वी महायुती सरकारने पुन्हा एकदा ही यादी राज्यपालाना पाठवली. त्यानी या प्रकरणी तातडीने कारवाई करीत 12 पैकी 7 जणांना मंगळवारी सकाळी शपथ घेण्यासाठी बोलवले. या सात जणांच्या नावात आश्वासन दिलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आश्वासन दिलेल्या अनेक जणांची नावे नसल्याने नाराजी पसरली आहे.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते दीपक मानकर यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यासोबतच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या रासप, रिपाइं या पक्षातील नेत्यांचा समावेश करण्यात न आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

अनेक जणांचा होणार अपेक्षाभंग

महायुती सरकारने अडीच वर्षाच्या काळात राज्य मंत्रीमंडळातील अनेक पदे रिक्त ठेऊन वेळोवेळी भरण्याचे आश्वासन देत तीन पक्षांतील नाराज मंडळींची मनधरणी केली होती. दुसरीकडे आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनाही राज्यपाल नियुक्त आमदारकीचे आश्वासन दिले होते. आता येत्या काळात विधानसभेला बंडखोरी टाळण्यासाठी या तीन पक्षाकडून रिक्त असलेल्या पाच जागांवर वर्णी लावण्याचे आश्वासन दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक जणांचा अपेक्षाभंग होणार आहे.

या सात आमदारांनी घेतली शपथ

दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 रिक्त जागांपैकी 7 जणांची नावे निश्चित करत, या आमदारांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना, तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT