Radhakrishna Vikhe-Patil
Radhakrishna Vikhe-Patil Sarkarnama
विशेष

पालकमंत्री विखे-पाटील पहिल्याच दौऱ्यात देणार सोलापूरला ‘गुड न्यूज’!

प्रमोद बोडके

सोलापूर : जिल्हा वार्षिक योजनेतून सोलापूरला (Solapur) मिळालेल्या ५२७ कोटी रुपयांच्या निधीला नव्या सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे. शिंदे सरकारमधील पालकमंत्री या निधीचा फेरआढावा घेणार आहेत. सोलापूरचे नवे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) मंगळवारी (ता. ४ ऑक्टोबर) प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मंगळवारी दुपारी सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असल्याने स्थगित केलेल्या ५२७ कोटींच्या निधीबाबत विखे-पाटील मार्ग काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Guardian Minister Radhakrishna Vikhe-Patil will give 'Good News' to Solapur in his first visit)

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ब्रेक लावला होता. नव्या सरकारमधील नव्या पालकमंत्र्यांनी आढावा घेतल्यानंतर हा निधी वापराचा मार्ग मोकळा होणार आहे. या योजनेतून सोलापूरला ५२७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी आषाढी एकादशीसाठी फक्त ८८ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे.

शिंदे सरकारने ४ जुलैला काढलेल्या परिपत्रकामुळे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करण्यास तब्बल तीन महिने (४ जुलै ते ४ ऑक्‍टोबर) विलंब लागला आहे. सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विखे-पाटील पहिल्यांदाच येत्या मंगळवारी (ता. ४ ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक व इतर बैठका घेणार आहेत. या बैठकीत पूर्वीच्या सरकारने वाटप केलेल्या निधीचा फेरआढावा घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतील ५२७ कोटी रुपयांच्या निधी वाटपाचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हाधिकारी स्तरावरील कामांसाठी २२८ कोटी, नागरी क्षेत्रातील योजनांसाठी १२४ कोटी तर जिल्हा परिषद स्तरावरील योजनांसाठी १७४ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

डीपीसीच्या बैठकीला केवळ आमदार, खासदारांचीच उपस्थिती?

जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकेवर प्रशासक असल्याने या संस्थांमधून जिल्हा नियोजन समितीवर येणाऱ्या सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. तत्कालिन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नियुक्त केलेल्या नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या जागा महाविकास आघाडीचे सरकार गेल्याने रिक्त झाल्या आहेत. पालकमंत्री विखे-पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, खासदार व अधिकारी एवढेच उपस्थित राहून निधी वाटपाचा फेरआढावा घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT