Amol Kolhe
Amol Kolhe Sarkarnama
विशेष

कसली नाराजी..? मी राष्ट्रवादीत नाराज नाही : त्या चर्चेवर अमोल कोल्हेंनी टाकला पडदा

रवींद्र पाटे

नारायणगाव (जि. पुणे) : कसली नाराजी, मी नाराज वगैरे काही नाही. प्रकृतीच्या कारणास्तव शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित राहता आले नाही. या बाबतची माहिती मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना दिली होती, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिली. (I am not upset in NCP : Amol Kolhe)

प्रभावी वक्तृत्वामुळे शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शिवप्रताप गरुड झेप चित्रपटाच्या प्रमोशन प्रसंगी त्यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. चार नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनास खासदार डॉ. कोल्हे यांची अनुउपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

दरम्यानच्या काळात पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, चाकण येथे होणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेतली होती. या मुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाली. मात्र या चर्चेकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी दुर्लक्ष करून कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. खासदार डॉ. कोल्हे हे नुकतेच जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी डॉ. कोल्हे यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले.

डॉ. कोल्हे म्हणाले की, पक्षीय राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित असावे. निवडणुकीनंतर पक्षीय राजकारण, भेदाभेद बाजूला ठेवून आपल्या माणसांच्या सर्वंकष विकासाचा विचार करून सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकासाचे स्वप्न साकारता येईल. देशातील पहिला ब्रॉडगेज रेल्वे असलेला पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प शिरूर लोकसभा मतदार संघाची भाग्यरेषा बदलणारा आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मी पाठपुरावा केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागा उपलब्ध करून दिलेला चाकण येथे होणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प अस्तित्वात येणार आहे. या बाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेतली. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला असून हिरवा कंदील दाखवला आहे.

दंत उपचार सुरू असल्याने मला शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित राहता आले नाही. या बाबतची माहिती मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली होती. या मुळे मी नाराज असण्याचे कारण नाही. सध्या माझ्याबाबत सुरू असलेली चर्चा निराधार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT