Nawab Malik
Nawab Malik  Sarkarnama
विशेष

पवारांचा फोन आला नसता तर मी आज काँग्रेसमध्ये दिसलो असतो : मलिकांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ‘‘समाजवादी पक्षात मतभेद निर्माण झाल्यानंतर मी काँग्रेसमध्ये (Congress) जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार मी निघालोही होतो. मात्र, त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा (sharad Pawar) फोन आला आणि मी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आलो. राष्ट्रवादीत आल्यानंतर मला पक्षाने सर्वकाही दिले. आज मी जो काही आहे, तो केवळ शरद पवार यांच्यामुळेच आहे,’’ अशा शब्दांत राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी आपल्या काँग्रेस प्रवेशाबाबत गौप्यस्फोट केला. (I had decided to join the Congress party : Nawab Malik)

शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या काँग्रेस प्रवेशाबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, त्यावेळी मी समाजवादी पक्षात होतो. पक्षात माझे मतभेद निर्माण झाले होते, त्यामुळे मी समाजवादी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी काँग्रेसमध्ये जाणार होतो. मंत्रालयातून माझी गाडी निघाली, ती बीकेसीमध्ये पोचली आणि अचानक एक फोन आला. पलिकडून आवाज आला...‘मी शरद पवार बोलतोय...’ मी गर्भगळीत झालो. पवारांचा फोन मला का आला असावा, असा विचार डोक्यात आला. तेवढ्यात पलीकडून पवारांनी प्रश्न केला की, ‘तुम्ही काँग्रेसमध्ये जात आहात का.’ मी उत्तर दिले, ‘होय, मी काँग्रेस पक्षात जाऊ इच्छितो.’ तेव्हा पवार मला म्हणाले, ‘तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहात.’ त्यावेळी त्यांनी मला दिलीप वळसे पाटील यांना भेटायला सांगितले. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर पवारांनी मला माझ्या क्षमतेप्रमाणे भरपूर काही देण्याचे काम केले आहे, त्यामुळे पवार हे कार्यकर्त्यांना ओळखणारे नेते आहेत. आज माझी जी काही ओळख निर्माण झाली आहे, ती फक्त शरद पवारांमुळेच,असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

मलिक म्हणाले की, आमच्या नेत्याने सुख, दुःखाच्या प्रसंंगात आमची कायम काळजी घेतली आहे. जो नेता आपल्या कार्यकर्त्यांचे दुःख वाटून घेतो, त्याच्यापेक्षा मोठा नेता असू शकत नाही. संपूर्ण देश आज परिर्वनासाठी पवारांकडे पाहत आहे. देशात वेगवेगळ्या मुद्यांवर वैचारिक मतभेद निर्माण करण्याचे काम करत आहे. पण, काहीजण कन्युफ्यूज करण्याचे काम करतात. कन्युफ्यूजन असेल तर अपघात होणार, त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या नेत्यांचे विचार जाणून निडर बनून भाजपविरोधात लढण्याची गरज आहे.

सरकारी यंत्रणांच्या कारवाईबाबत नवाब मलिक यांनी सांगितले की, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भाजपविरोधात बोलल्यावर पाहुणे घरी येतात. पण, आपण त्यांचं स्वागत करायला तयार असाल, तर पाहुणे येतील आणि जातील. त्याची काळजी करण्याचे कारण नाही. ते आपल्याकडील काहीही घेऊन जाणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT