Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
विशेष

Sudhir Mungantiwar : ‘यह कहाॅं आ गया मैं...’ ; एक्झिट पोलनंतर सुधीर मुनगंटीवारांचा डोक्याला हात!

Vijaykumar Dudhale

Mumbai, 02 June : लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा संपताच मतदानोत्तर कल चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले. त्यात देशात पुन्हा एनडीएचे सरकार येईल, असा अंदाज वर्तवला खरा. पण, महाराष्ट्रात भाजपला झटका बसण्याची शक्यताही त्यात दाखवण्यात आली आहे. राज्यात कॅबिनेट मंत्री असलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार हे पिछाडीवर असल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर मात्र सुधीरभाऊंनी ‘आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारच नव्हतो, पण हायकमांडच्या आदेशामुळे लोकसभा लढवली, असा राग हायकमांड आळवला. मतदानोत्तर कल चाचण्यांच्या अंदाजानंतर मुनगंटीवार यांची अवस्था ‘यह कहाॅं आ गया मैं....’ अशीच झाली असणार!

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Constituency) भाजपने माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्याऐवजी राज्यातील भाजपचे बडे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना तिकिट देण्यात आले. मागील निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी अहिर यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपने मुनगंटीवार यांना लोकसभेचा आखाड्यात उतरवले होते. त्यांच्यासमोर बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान होते. मागील निवडणुकीत महाराष्ट्रातून बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले होते. त्यामुळे मुनगंटीवार यांच्यापुढे प्रतिभा धानोरकर यांचे कडवे चॅलेंज होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वास्तविक, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही सुधीरभाऊंनी एक विधान केले होते. ‘माझे तिकिट रद्द झाले, तर बरं होईल,’ अशा आशयाचे ते विधान होते. त्यामुळे लोकसभा लढविण्यासाठी मुनगंटीवार फारसे इच्छूक नव्हतेच. मात्र, राजकारणातील डाव दिसतात, तसे सरळ नसतात. आपल्या मार्गातील अडसर दूर करण्याचा प्रयत्नही अशा निवडणुकीच्या माध्यमातून होत असतो. त्यातूनच कदाचित सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ घातली गेली असावी, अशी चर्चा आहे.

इच्छा नसताना केवळ हायकमांडचा आदेश आल्यामुळे मुनगंटीवर यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. पण, प्रचारादरम्यानही त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आणि जनतेचा रोष पत्करून घेतला. पुढे निवडणुका झाल्या आणि शनिवारी (ता. १ जून) मतदानोत्तर कल चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले. त्यात चंद्रपूरमधून भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली. सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असल्याचे टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राटच्या कलचाचणी अंदाजात दाखवण्यात आले. चंद्रपूरमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ह्या आघाडीवर असल्याची शक्यता त्यात वर्तविण्यात आली.

कल चाचण्यांचा अंदाजानंतर माध्यमांशी बोलताना सुधीरभाऊंनी पुन्हा एकदा आपण चंद्रपूरमधून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी तयार नव्हतो. पण, हायकमांडचा आदेश आल्यानंतर मी लोकसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि अर्णी हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. त्या दोन विधानसभा मतदारसंघाशी माझा तसा काही संपर्क आला नव्हता. पण कार्यकर्ते अतिशय उत्साहाने काम करणारे होते, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यातून मुनगंटीवार यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून मागे राहू हेही अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT