Sangli, 02 June : दुष्काळ हटविणे हे जयंत पाटील यांचे कामच नाही. ते फक्त इस्लामपूरपुरतं, एका डबक्यात पोहणारा मासा आहेत. ते समुद्रात पोहणारा मासा नाहीत, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केली.
आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) हे जतच्या पूर्व भागाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी जतच्या दुष्काळवरून जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कारखान्यावर जतचे कामगार लागतात, त्यांना फक्त मोठेपणा करायची सवय लागली आहे. ते अडीच वर्षे जलसंपदा मंत्री आणि अनेक वर्षे अर्थमंत्री होते. तरीही त्यांना सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी योजनांसाठी पैसे देता आले नाहीत. पन्नास कोटी, शंभर कोटींच्या वर त्यांनी कुठल्याच योजनांना निधी दिलेला नाही. पण, महायुतीने (Mahayuti) हजार कोटी, दोन हजार कोटी आणि पाच हजार कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मी संपूर्ण राज्यभर फिरतो. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी जतचा दौरा करतोय, असं काही नाही. मी दर पंधरा दिवसांनी जतचा दौरा करतो. आज मी काय पहिल्यांदा आलो नाही. संपूर्ण सांगली जिल्हावर माझे लक्ष असते. जिथं कुठं अडचण असेल, लोकांना जिथं माझी आवश्यकता असेल, त्या सर्व ठिकाणी मी जाणार आहे, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांच्याकडून आम्हाला अपेक्षाही नाहीत. महायुती सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत, आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करून जत तालुक्याचा दुष्काळ संपवू. आटपाडीत पूर्वी आम्ही टॅंकरच्या पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी आंदोलन करायचो. पण, आता आम्हाला ऊसतोड द्या; म्हणून कारखनदारांच्या मागं लागावं लागतं.
आता जतच्या पूर्व भागातही हीच परिस्थिती होणार आहे. जतमधील एकही मायमाऊली आता ऊस तोडायला जाणार नाही. तिच्या हातातील कोयता घालवण्याचे पुण्याचं काम हे महायुतीचं सरकार करणार आहे, असा विश्वासही गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार असताना जत तालुक्यातील दुष्काळ टप्प्यात सर्वांत जास्त काम या सरकारने केले आहे. या सरकारने जतमधील कामांसाठी एकाच वेळी दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे, असेही पडळकर यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.