Devendra Fadnavis-Eknath Shinde  Sarkarnama
विशेष

‘MSRDC खात्याचा राजीनामा देण्यासाठी मी फडणवीसांकडे गेलो होतो’

समृद्धी महामार्ग प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : ‘एमएसआरडीसी’ (MSRDC) खातं तुम्ही मला दिलं आहे, त्यावर साडेसहा हजार कोटी रुपये कर्ज आहे. मला या खात्यातून मुक्त करा. काहीच काम नाही झालं तर मी लोकांना काय सांगणार? असे सांगून ‘एमएसआरडीसी’ मंत्रीपद मी सोडणार होतो. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, शिंदे तुम्ही काळजी करू नका. हे एमएसआरडीसी खातं घ्यायला लोकांची चढाओढ लागेल. त्यांनी मला खूप प्रकल्प दिले, त्यात समृद्धी महामार्गाची जबाबदारी एमएसआरडीसीकडे दिले. तो प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. (I went to Fadnavis to resign from MSRDC Department : Eknath Shinde)

ठाणे येथे १७५ संस्थांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एमएसआरडीसी खात्याबाबत सांगितले. ते म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात मला एमएसआरडीसी खातं देण्यात आलं होतं. खरं तर मला दुसऱ्या खात्याची अपेक्षा होती. मात्र, मी आदेश मानणारा कार्यकर्ता असल्यामुळे ते खाते घेतले. त्यानंतर मंत्री, मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या काही लोकांनी मला फोन केले. हे खाते घेऊ नका, बदनाम व्हाल. त्यावर मी त्यांना सांगितले की, बघतो चालतं काय ते.

निवडणुकीत शिवसेना-भाजप युती म्हणून जनतेकडे मते मागितली होती. त्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०६ आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. बहुमतापेक्षा जादा आमदार युतीचे निवडून आले होते. त्यामुळे युतीचे सरकार येईल, असेच जनतेला वाटले होते. मात्र, त्या बंद दाराआड चर्चा, बैठका घडल्या. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याने आम्ही नेतृत्वाच्या आदेशाचे पालन केले. त्यावेळी मी अनेक आमदारांना समजावून सांगितले. अनेक आमदारांचा महाविकास आघाडीला विरोध होता. महाआघाडीत शिवसेनेला अपेक्षित कामं झाली नाहीत. विरोधातील पराभूत उमेदवारांना अधिक निधी मिळू लागला. अनेक शिवसैनिकांवर तडीपारीसारखे गुन्हा दाखल झाले. शेवटी कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, त्यातूनच आम्ही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांना दुरुस्ती करण्याबाबत बोललो होतो. पण, त्यात मला यश आले नाही, अशी कबुलीही एकनाथ शिंदे यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी जुळवणार घेणार का, या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेचा मार्ग स्वीकारलेला आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपले शत्रू आहेत. त्यांना आपल्याला कधीही जवळ करता येणार नाही. तशी वेळ आली तर मी माझे दुकानच (शिवसेनेचे काम बंद करेन) बंद करेन. मग आम्ही काय चुकीचे केले. आम्ही बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे नेतो आहोत. भाजपबरोबरच आम्ही युती केली आहे, त्यात आमचं काय चुकलं आहे, असा सवालही त्यांनी केला.

शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याबरेाबर मी पाच वर्षे काम केले आहे. त्यांचा अभ्यास, विषय समजून घेणे, आकडेवारीसह बोलणे या सर्व गोष्टी तसेच मुख्यमंत्री असताना अनेक मोठे प्रकल्प त्यांनी सुरू केले. रात्रभर त्यांचे काम सुरू असायाचं. मला आणि फडणवीस यांना मुख्यमंत्री कोण होणार, हे माहितं होतं. अवघ्या महाराष्ट्राला ते शॉकिंग होतं. पण, फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्याने मलाही त्यांच्या चेहऱ्यावर तणावर दिसत होता. पण, ज्या पक्षामुळे सर्वोच्च पदावर बसलो, त्याच पक्षाचा आदेश मला शिरसावंद्य आहे, त्यामुळे मी हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT