eaknath shinde manoj jarange Sarakarnama
विशेष

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्यात'च जरांगे पाटलांनी सरकारला घेरले

Sachin Waghmare

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. जागोजागी प्रचार, आंदोलन सुरूच आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन वेळा उपोषण करीत लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रभर दौरा करत ठिकठिकाणी भेटी देत आहेत. जनतेशी संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवरच मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. येत्या काळात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल होत राहिले, तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविरोधात रोष वाढत राहील, असा इशाराही जरांगेंनी ठाण्याच्या सभेत दिला. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगेंची मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा झाली. सभेआधी ठाण्यात जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आले. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून मोठे विधान केले असून, आमच्या नोंदी मिळत आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणापासून कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारकडून खिंडीत पकडायचं काम सुरू

मराठा समाजाला आरक्षण दिले जात नसल्याने समाजातील तरुणांमध्ये राज्य सरकारबाबत तीव्र रोष होता, पण आमच्या सभांमुळेच काही प्रमाणात रोष कमी करण्यास मदत झाली आहे. सरकारचंच काम आम्ही करत आहोत. या उलट सरकारला सभा घेण्यात कसल्याही अडचणी सरकारने तयार केल्या नाही पाहिजेत, पण आम्हालाच जर का खिंडीत पकडायचं काम सरकारकडून होत असेल तर पुढे बघूच, असा थेट इशारा जरांगेंनी यांनी ठाण्यातील सभेत विचारत सरकारला चांगलेच कोंडीत पकडले.

सभा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने आयोजकांवर गुन्हा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या काही सभांवेळी नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती पुढे आली होती. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पोलिसांकडून धाराशिव आणि साताऱ्यात मनोज जरांगे यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिवमधील वाशीत जरांगे पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भुजबळांच्या मागणीनंतर गुन्हा दाखल झाल्याची भावना आहे.

रोष वाढण्यापूर्वीच सरकारने दखल घ्यावी

एकीकडे आक्रमक झालेल्या मराठा समाजाला शांत करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. मात्र, राज्य सरकारकडून आयोजकांवर गुन्हे दाखल केले जात असल्याने समाजात नाराजी वाढत आहे. त्यामुळे या प्रकरणात रोष वाढण्यापूर्वीच राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घालून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत समाजाला न्याय द्यावा, असे साकडे या वेळी जरांगे पाटलांनी घातले.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT