Jayant Patil-Shambhuraj Desai
Jayant Patil-Shambhuraj Desai sarkarnama
विशेष

जयंत पाटील हे कौतुक करतायत की टोमणे मारतायात, हेच शंभूराज देसाईंना कळेना!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : प्रत्येक नेत्याची भाषणाची, संवाद साधण्याची शैली ठरलेली असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सडेतोड आणि शाब्दिक वार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे रोखठोक बोलण्यासाठी तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुद्देसूद मांडणीसाठी ओळखले जातात. जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचीही बोलण्याची वेगळी शैली आहे. ते आवाज वाढवत नाहीत. पण सौम्यपणे चिमटा काढतात. त्यांच्या बोलण्यात पुणेरी टोमणे असतात आणि त्या टोमण्याचा आनंद घेत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर अनेकदा दिसून येत असते.

मुंबईत सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जयंत पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची लाॅबीत गाठ पडली. ``गृहराज्यमंत्री असावा तर तुमच्यासारखा कणखर आणि सडेतोड, सभागृहात मग ती विधानसभेत असो वा विधानपरीषदेत गृह विभागाची बाजू अगदी कणखरपणे आणि भक्कमपणे मांडता. विरोधकांना सडेतोड उत्तरे देवून गप्पगार करता,`` असे कौतुकाचे शब्द जयंतरावांनी काढले. शंभूराज यांना या बोलण्याचे कोडे उलगडेना. ते पण बुचकळ्यात पडले. तरीही पाटलांचे कौतुकाचे शब्द थांबेनात. ``गृहराज्यमंत्री असावा तर तुमच्यासारखा!,`` या पाटलांच्या वाक्यावर देसाई यांनी अदबीने विचारले, ``का हो पाटील साहेब, माझे काही चुकले का? तुम्ही असे का बोलत आहात?``

त्यावर मंत्री पाटील म्हणाले, ``अहो कणखर आणि सडेतोड असणारे तुम्ही गृहराज्यमंत्री आहात म्हणून मी तुम्हाला गृहराज्यमंत्री असावा तर तुमच्यासारखा असे म्हणालो. सभागृहात मग ती विधानसभेत असो वा विधानपरीषदेत गृह विभागाची बाजू अगदी कणखरपणे आणि भक्कमपणे मांडता. मीही राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. राज्यमंत्री म्हणून पहिल्याच टर्ममध्ये एवढे चांगले काम आहे तर कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही उत्कृष्ट काम करु शकता.`` पाटील यांनी असे थेट प्रमाणपत्र दिल्याने देसाई यांचाही उत्साह वाढला. खुद्द देसाई यांनीच आपल्या ब्लाॅगमध्ये हा अनुभव लिहिला आहे.

आता पाटील यांची ही साखरपेरणी मनापासून होती की त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनुसार होती, याचे उत्तर आगामी काळात मिळेलच. साताऱ्यातून पाटणमध्ये शिवसेनेचा एकाकी किल्ला देसाई लढवत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 100 प्लस आमदार निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या या समीकरणात पाटील यांना शंभूराज देसाईंना बसवायचे तर नसेल ना, याचे उत्तर आगामी काळात मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT