Solapur, 08 December : ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठविणारे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला आज (ता. 08 डिसेंबर) ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली. त्या भेटीदरम्यान जयंत पाटलांनी मागील 2019 च्या निवडणुकीतील पोस्टल मतांचा ट्रेंड आणि राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा, तर 2024 च्या निवडणुकीतील पोस्टल मतांचा ट्रेंड आणि जिंकलेले मतदारसंघ यातील तफावत दाखवत महायुतीच्या विजयाची पोलखोल केली आहे.
जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तब्बल चार वेळा आपली आकडेवारी दुरुस्त केली आणि काही लाख मतं मतपेटीत वाढल्याचे आपल्या सर्वांच्या निर्दशनास आले. महाराष्ट्रात काय वातावरण होतं, हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही.
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या सभांना राज्यात फार मोठा प्रतिसाद मिळत होता. मी फार खोलात जात नाही. आता निकाल झालेला आहे. मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो. पोस्टाने आलेली मतं, साधारणपणे त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतात की, आता हे इथं असं होणार आहे, जयंतरावांनी नमूद केले.
मागील 2019 च्या निवडणुकीत काय झालं? (जयंत पाटलांनी भाषणात नमूद केलं)
मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 101 मतदारसंघात पोस्टल मतदानात आघाडी होती, त्यावेळी भाजपचे 105 आमदार निवडून आले होते.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एकत्रित शिवसेनेला पोस्टल मतदानात 56 मतदारसंघात आघाडी होती, त्यांचे 56 आमदार निवडून आले होते.
काँग्रेस पक्षाला पोस्टल मतदानात 45 मतदारसंघात आघाडीत होती, त्यांचे 44 आमदार निवडून आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 60 मतदारसंघात आघाडी होती, आमचे मागील निवडणुकीत 54 आमदार निवडून आले होते.
पोस्टल मतदानातील आकडेवारीनुसार एखादं दुसरा मतदारसंघ कमी जास्त झाला. पण, पोस्टल मतदानाचा ट्रेंड कायम राहिला होता.
विधासभेच्या 2024 च्या निवडणुकीत काय झालं?
पोस्टल मतदानात भारतीय जनता पक्षाला 84 मतदारसंघात आघाडी होती. पण त्यांचे तब्बल 132 आमदार निवडून आले
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 मतदारसंघात आघाडी होती, पण त्यांचे 57 आमदार निवडून आलेत
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पोस्टल मतदानात 24 मतदारसंघात आघाडी होती, पण त्यांच्या तब्बल 41 जागा निवडून आल्या.
म्हणजे या निवडणुकीत पोस्टल मताधिक्यापेक्षा जास्त आमदार निवडून येतात, हा ट्रेंड दिसून आला. महायुतीतील या तीन पक्षांच्या बाबतीत हा ट्रेंड दिसून येत आहे. उरलेल्या तीन पक्षांचे काय झाले ते पाहा.
काँग्रेसला पोस्टल मतदानात 56 मतदारसंघात आघाडी होती. पण, काँग्रेसचे केवळ सोळाच आमदार निवडून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 40 मतदारसंघात पोस्टलमध्ये आघाडी होती, प्रत्यक्षात आमच्या दहाच जागा निवडून आल्या
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 37 मतदारसंघात आघाडी होती, प्रत्यक्षात वीसच मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आले.
म्हणजे काय तर पोस्टल मतदानाचा ट्रेंड त्यांच्यासाठी चढा आणि बरोबर ठरला. पण, पोस्टलमध्ये आम्हाला ज्यांनी मत देऊन लीड दिला त्यांची मते चुकीची ठरली. गावांतून ‘ईव्हीएम’मधून कमी मतं मिळाली. हा मोठा विरोधाभास या निवडणुकीत दिसून आला, असे जयंत पाटील यांनी सांगितले
सर्वच पार्ट्या माझं काम करतात; तरीही मी मायनसमध्ये
जयंत पाटील म्हणाले, सगळ्या मतदारसंघात सर्वच पार्ट्या माझंच काम करतात. एकही माणूस विरोधात फिरत नाही. दोन्ही गट माझंच काम करतात. पण, दोन हजार मतांचं लीड देणारे गाव सातशे मतांनी मायनस दिसून आलं. मारकडवाडीने जे सांगितलं आहे, ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोललं जात आहे. म्हणून लोक ईव्हीएमवर संशय घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.