Suresh kalmadi Sarkarnama
विशेष

बिअर बारमुळे हुकले होते कलमाडींचे युवक काँग्रेसचे अध्यक्षपद...

काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना याबाबतची आठवण सांगितली आहे.

ऋषीकेश नळगुणे

पुणे : काँग्रेसच्या सदस्यत्वासाठीच्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या नियमावलीचीही आठवण येईल असा प्रसंग पुण्यातही घडला होता. या नव्या नियमावलीनुसार आता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासाठी उमेदवारांना दहा वचने द्यावी लागतील आणि काटेकोरपणे पालन करावे लागेल. यातील एक वचन दारू व अंमली पदार्थ (ड्रग्स) या पदार्थांपासून आणि व्यसनांपासून लांब राहणे, असे आहे. मात्र ज्यांचा दारूचा बार किंवा दुकान आहे, त्यांचे काय? याच उत्तर नव्या नियमावलीत नसले तरी याची मालकी असलेल्या नेत्यांना कधी काळी हा नियम दाखविण्यात आला होता.

या नेत्यांमध्ये एक नाव काँग्रेसचे नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचे घ्यावे लागते. काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas Pawar) यांनी याबाबतची एक आठवण 'सरकारनामा'शी बोलताना सांगितली आहे. यंदा दिवाळी निम्मित्त 'राजकीय फटाके' अंतर्गत उल्हास पवार यांची विषेश मुलाखत आयोजित करण्यात आली होती यात ते बोलत होते. पवार यांची ही सविस्तर मुलाखत प्रसिद्ध झाली असून ती आपण 'सरकारनामा'च्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलवर पाहू शकता.

उल्हास पवार सांगतात, मी काँग्रेस सेवा दलात काम करत होतो, पुढे विद्यार्थी चळवळ, युवक चळवळ यातुन जास्त सक्रिय होत गेलो. त्यावेळी प्रियरंजन दास मुन्शी हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर अंबिका सोनी. पुढे अध्यक्षपद नाही, पण नेतृत्व संजय गांधी यांच्याकडे आले. हे सगळे टप्पे मी पाहिले. या तिन्ही टप्प्यात देशात सगळीकडे बदल होत गेला, पण महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष मीच होते. १९७०-७१ ते १९७८ असा जवळपास साडेसात वर्ष मोठा कालखंड मिळाला मला मिळाला होता. माझ्या काळात राज्यभरात मोठ्या संख्येंने चिंतन शिबीरं, नेतृत्व प्रशिक्षण शिबीर, मोठ-मोठ्या वक्त्यांची वैचारिक भाषणे अशी होत असायची.

पवार पुढे सांगतात, मी अध्यक्ष होतो तेव्हा देशात जम्मु-काश्मिरचे सरचिटणीस गुलाब नबी आझाद होते. तर पी. चिदंबरम हे तमिळनाडू युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर जनार्दन गेहलोत हे राजस्थान युथचे अध्यक्ष होते. तर इकडे महाराष्ट्रात त्यावेळी पुणे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते रामकृष्ण मोरे, तर १९७७ साली पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते सुरेश कलमाडी. मात्र त्याआधी १.५ वर्षांपुर्वीच कलमाडींना अध्यक्ष करायला नकार देण्यात आला. त्यानंतर १९७७ साली पुन्हा त्यांना दारुचे दुकान असल्यामुळे दूसऱ्यांदा नकार दिला असल्याचेही पवार मुलाखतीत सांगतात.

त्याचे झालेलं असं की, १९७५-७६ मध्येच सुरेश कलमाडींना पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष करावे म्हणून शरद पवारांनी उल्हास पवारांकडे शब्द टाकला होता. पण त्यांनी त्यावेळी त्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला. कारण त्यांचे मत होते की कलमाडींनी आधी कमीत कमी दिड वर्षे तरी संघटनेचे काम करायला हवे. पुढे कलमाडींनी काम केलेही. पुन्हा दिड वर्षांनी त्यांना अध्यक्ष बनवण्याचा बनवण्याचा प्रसंग आला तेव्हा उल्हास पवारांनी तत्वज्ञान पाळले.

ते सांगतात, माझा एकही पदाधिकारी हा बिअर बारवाला किंवा दारु दुकानदार नव्हता. पण कलमाडींचा मात्र पुना कॉफी हाऊसमध्ये बिअर बार होता. त्यामुळे त्यांनी कलमाडींसमोर अट ठेवली कि अध्यक्ष व्हायचे असल्यास हा बिअर बार बंद करावा लागेल. त्यानुसार कलमाडींनी तो बार बंद केला. त्यानंतरच मी कलमाडींची पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लावली. पुढे १९७८ साली स्वतः कलमाडी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मात्र त्यानंतर कलमाडींनीही पुन्हा आपला बिअर बार सुरु केला असल्याची खंतही पवार व्यक्त करतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT