Chandrakant Bhingare-Kalidas Gopalghare Sarkarnama
विशेष

भाच्याकडून मामाची ४२ वर्षांची सत्ता खालसा : राष्ट्रवादीने मुळशीला दिले दोन संचालक!

कात्रज दूध डेअरी : कालिदास गोपालघरे यांचा विजय; राष्ट्रवादीकडून मुळशीला दोन संचालक

बंडू दातीर

पौड (जि. पुणे) : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) पंचवार्षिक निवडणुकीत मुळशी तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कालिदास गोपालघरे विजयी झाले आहेत. मतदानाच्या आदल्या रात्री गोपालघरे यांचे मामा, ज्येष्ठ संचालक रामचंद्र ठोंबरे यांनी माघार घेतली होती. मात्र, त्यांच्यासह सहा जणांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. त्यानंतरही तालुक्यातील नऊपैकी नऊ मते घेऊन गोपालघरे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीत विजय मिळवत गोपालघरे यांनी आपले सख्खे मामा ठोंबरे यांची दूध संघातील ४२ वर्षांची सत्ता मोडीत काढली आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून चंद्रकांत भिंगारे हे यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे मुळशीला यंदा कात्रज डेअरीत दोन संचालक मिळाले आहेत. (Katraj Dairy election: Kalidas Gopalghare wins; Two directors from the NCP to Mulshi)

जिल्हा दूध संघावर मुळशी तालुक्यातून रामचंद्र ठोंबरे तब्बल 42 वर्षे संचालक म्हणून प्रतिनिधीत्व करीत होते. संघाचे अध्यक्ष म्हणून काही काळ त्यांनी धुरा सांभाळली होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये ठोंबरे यांची भाचेसून वैशाली कालिदास गोपालघरे या महिला वर्गातून निवडून आल्या होत्या. गेली पाच वर्षांपासून त्या संघाच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.

दरम्यान ठोंबरे आणि गोपालघरे या मामा-भाच्यांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकीची रणनीती आखली होती. मामा विरूद्ध भाचा या लढतीची चर्चा गेली अनेक महिन्यांपासून सुरू होती, त्यामुळे दोघांनीही मर्जीतल्या मतदारांना पर्यटनासाठी नेले होते, तर राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी दोघांनीही पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेठी घेतल्या. दोघांनीही अर्ज भरले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी मामा-भाच्यांनी एकत्र बसून एकच नाव द्यावे, असा प्रस्ताव दोघांसमोर ठेवला होता. पण, दोघांनाही विजयची खात्री असल्याने कुणीच माघार घेतली नाही. त्यात गारटकर यांनी गोपालघरे यांना राष्ट्रवादीच्या पॅनलकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केली.

मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत तालुक्यातील बंद पडलेल्या दूध संस्था वाढवून मतदारांची संख्या वाढविणे तसेच मतदानाचा हक्क असलेले मतदार बाद करणे याबाबत न्यायालयीन कुरघोडी सुरू होत्या, त्यामुळे विजयासाठी दोघांचाही चौफेर आटापिटा चालू होता. राष्ट्रवादीचे तालुक्यातील पदाधिकारी पक्षाच्या आदेशानुसार गोपालघरे यांच्या विजयासाठी गोळाबेरीज करीत होते. मात्र, शनिवारी ( ता. १९ मार्च) रात्री उशीरा ठोंबरे यांनी गोपालघरे यांना पाठींबा दिल्याचे  पत्र काढले. मात्र त्यावर तारखेचा उल्लेख नव्हता. गोपालघरे यांच्यासमवेत नऊ मतदारांनी रविवारी (ता. २० मार्च) मतदानाचा हक्क बजावला. पण, ठोंबरे यांच्यासह सहा जणांनी मतदान केले नव्हते,  त्यामुळे गोपालघरे यांच्या विजयाबाबत केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. सोमवारी (ता. २१ मार्च) झालेल्या मतमोजणीत पहिलाच निकाल मुळशीचा जाहीर झाला.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून चंद्रकांत भिंगारे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींपुढे धरला होता. कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने तालुक्यात पक्षाची ताकद वाढत असल्याने श्रेष्ठींनीही त्यांची मागणी मान्य करीत भिंगारे यांना उमेदवारी दिली होती. तेही बिनविरोध निवडून गेले, त्यामुळे तालुक्यात आता कालिदास गोपालघरे आणि चंद्रकांत भिंगारे हे संचालक मिळाले आहेत.

ठोंबरेंनी राष्ट्रवादीचेच मतदान बुडविले : कोंढरे

रामचंद्र ठोंबरे ४२ वर्षापासून दूध संघाचे संचालक आहेत. काळाची पावले ओळखून त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना पाठिंब्याचे बिनतारखेचे पत्र दिले. परंतू मतदानाचे कर्तव्य मात्र बजावले नाही. मतदानाला न येवून त्यांनी  जिल्ह्यातील इतर प्रवार्गातील राष्ट्रवादीचेच मतदान बुडविले. पाठिंबा देवून मतदान बुडविणे याला कसली पक्षनिष्ठा म्हणायची? तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे संत तुकाराम साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पीएमआरडीए, पीडीसीसी बॅंकेनंतर आता दूध संघातही राष्ट्रवादीने सत्ता मिळविली आहे, असे राष्ट्रवादीचे मुळशी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी सांगितले.

मला खूप संघर्ष करावा लागला : गोपालघरे

राष्ट्रवादीने मला अधिकृत उमेदवारी दिली होती. त्यामुळे ज्यांना ४२ वर्षे पक्षाने मोठमोठी पदे दिली, ते माघार घेतील असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मला खूप संघर्ष करावा लागला. सगळे प्रयत्न संपल्यानंतर पराभव समोर दिसू लागल्याने मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री पक्षाला पाठिंब्याचे पत्र दिले. पण, समर्थकांसह स्वतःही मतदानाला आले नाही. याला पाठिंबा कसा म्हणायचा? माझ्या विजयात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे कालिदास गोपालघरे यांनी विजयानंतर सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT