कोल्हापूर : मी ‘मातोश्री’शी कालही प्रामाणिक होतो, आजही आहे आणि उद्याही असेन. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आदेश शिरोधार्ह मानून आम्ही काम करत असतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी होताना जो निर्णय झाला आहे आणि पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल, त्यांच्या मनात जे असेल त्याप्रमाणे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काम करण्यात येईल, असे सांगून राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी गेली दोन दिवसांपासून निर्माण केलेला सस्पेन्स अखेर संपवला. (We will work order of Chief Minister Uddhav Thackeray : Rajesh Kshirsagar)
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे गेली दाेन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली होती. गेली दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले क्षीरसागर आज सायंकाळी कोल्हापुरात परतले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थासमोर मोठी गर्दी केली हेाती. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली.
क्षीरसागर म्हणाले की, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मी जर निवडून आलाे असतो तर मी पालकमंत्री होणार आणि जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानांवर शिवसेनेचे वर्चस्व मिळविणार, या भीतीने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपने माझा खोट्या पद्धतीने पराभव केला. मागील निवडणुकीत माझा जरी पराभव झाला असला तरी ही पक्षप्रमुखांनी मला नियोजन आयोगाचे कार्याध्यक्षपद दिले. हे मी त्यांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला. त्याच्या जोरावर मला मोठ्या मताधिक्क्याने कोल्हापूर उत्तरमधून निवडून आण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला होता. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत व्हायला हवी होती, त्यानंतर काँग्रेसला शहरातील शिवसेनेची ताकद कळाली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षाने ही पोटनिवडणूक लढवण्याचे ठरविले होते. महाविकास आघाडी करत असताना तीनही पक्षांनी एकत्र राहण्याचे ठरले होती. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीने कोल्हापूर जिल्हा बॅंकच्या निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी केली. त्याचे उत्तर त्यांनी शिवसेनेला देण्याची गरज आहे. त्याचवेळी संपर्क प्रमुख आणि संपर्क नेत्यांनी कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी पक्षप्रमुखांना पटवून द्यायला हवे होते. पण तसे घडले नाही, हे माझे दुर्दैव आहे, अशी खंतही राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलून दाखवली.
काँग्रेस-राष्ट्रवादीला सोयीने आघाडी हवीय
गोकुळमध्ये गरज होती, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी आघाडी केली. शिवसेनेमुळेच गोकुळमध्ये सत्ता आली. पण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत त्यांना आमच्याशी आघाडी नको आहे. त्यामुळे शिवसैनिकांना न्याय कधी मिळणार, असा माझा सवाल आहे. विधानसभेच्या २०१४ निवडणुकीनंतर मला मंत्री केले असते तर २०१९ मध्ये मी सहा आमदारांचे आठ आमदार करून दाखवले असते, असेही सलही त्यांनी बोलून दाखवली.
२०२४ मध्ये शिवसेनाच लढणार
सध्या परिस्थिती बदलली आहे. पक्षसंघटना वाढविण्यास आपण कमी पडत आहेात, असे सत्य आहे. गेली दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून व्यक्त होणाऱ्या भावनांची मुख्यमंत्री आणि मलाही जाणीव आहे. शिवसैनिक अणि पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांना समजावून सांगण्यात येईल. त्यासाठी थोडा वेळ लागेल. काँग्रेसला ही जागा सोडली असली तरी २०२४ मध्ये ही जागा शिवसेना लढणार आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षबांधणीसाठी जिल्ह्यात जोमाने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना या वेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.