Keshartai Pawar-Balasaheb Dhamdhere
Keshartai Pawar-Balasaheb Dhamdhere  Sarkarnama
विशेष

उमेदवारी नाकारल्याने ३० वर्षे संचालक असलेल्या ढमढेरेंचा राष्ट्रवादीविरोधातच शड्डू!

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी Katraj Dairy) तब्बल दोन वर्षांच्या वाढीव प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिरूर तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) अंतर्गत कलह सुरू झाला आहे. तब्बल तीस वर्षे संचालकपद भूषविणाऱ्या बाळासाहेब जयवंत ढमढेरे यांना डावलून पक्षाने दूध संघाचे जिल्हा पातळीवर प्रतिनिधित्व करणाऱ्या संचालिका केशरताई सदाशिव पवार यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत कधी नव्हे ती मोठी चुरस निर्माण झाली आहे. (Katraj Dudh Sangh Election : Rebellion in NCP in Shirur taluka)

येत्या वीस मार्चला होणाऱ्या या निवडणुकीसाठी उद्यापासून (ता. १४ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. आठ मार्चला अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले; तरी शिरूर तालुक्‍यात तुल्यबळ दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत शिरूर तालुक्‍यातील ‘अ’ वर्ग मतदार संघातून सर्वाधिक १६८ मतदार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शिरूरच्या लढतीकडे लागले आहे.

विद्यमान संचालक बाळासाहेब ढमढेरे यांचा ‘अ’ गटातील (दूध उत्पादक सोसायटी मतदार संघ) पत्ता कट करून पक्षाने केशरताई पवार यांची उमेदवारी जाहीर केल्याने ढमढेरे संतप्त झाले आहेत. पक्षश्रेष्ठींनी आज (ता. १३ फेब्रुवारी) त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवारी कापल्याची सल जिव्हारी लागलेल्या ढमढेरे यांनी पुन्हा सर्व शक्तीनिशी मैदानात उतरून शड्डू ठोकला आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा त्यांचा पवित्रा असून त्यांची उमेदवारी कायम राहिल्यास शिरूर तालुक्‍यात या निवडणुकीत घमासान राजकीय युद्ध अटळ आहे.

ढमढेरे हे सलग सहावेळा दूध संघावर निवडून आले असून, गेली तीस वर्षे ते दूध संघावर शिरूर तालुक्‍याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. केशरताई पवार या देखील सलग तीन वेळा संघावर महिला राखीव गटातून निवडून गेल्या आहेत. यंदा चौकार ठोकण्यासाठी त्यांनीही चोख ‘फिल्डींग’ लावली आहे. सुरवातीचे दोन टर्म त्यांना बिनविरोध संधी मिळाली होती. गतवेळी नंदिनी देशमुख यांच्या विरोधात त्या मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आल्या होत्या.

सहा निवडणुकांमध्ये एकहाती विजय संपादन करणाऱ्या ढमढेरे यांच्यासमोर गतवेळी मात्र मंगलदास बांदल यांनी मोठे आव्हान उभे केले होते. पत्नी रेखाताई यांना मैदानात उतरवणाऱ्या बांदल यांच्या बेमालूम डावपेचांनाही त्यावेळी सहकारातील मुरब्बी समजले जाणारे ढमढेरे हे पुरून उरले होते. सहावेळा संचालक म्हणून निवडून येऊनही जिल्हा दूध संघाच्या ‘चेअरमन’ पदाने हुलकावणी दिल्याची सल त्यांच्या मनात आहे. यंदाच्या निवडणुकीनंतर ‘चेअरमन’ पदाची स्वप्नपूर्ती करण्याच्या उद्देशाने त्यांनी या वेळी सर्व शक्तीनिशी निवडणुकीचे नियोजन केले होते. तथापि, पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या गोटात मोठी नाराजी आहे. या तीव्र नाराजीचा सामना पक्षाच्या अधिकृत उमेदवार पवार यांना मोठ्या नेटाने करावा लागणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT