Raju Shetti-K. Chandrasekhar Rao Sarkarnama
विशेष

Maharashtra Politics : 'तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा' : ‘केसीआर’ची राजू शेट्टींना ऑफर

केसीआर यांचा निकटवर्तीय नेता शेट्टी यांना नुकताच भेटून गेला आहे. भारत राष्ट्र समितीच्या एका पदाधिकाऱ्याकडून या गोष्टीला दुजाेराही मिळालेला आहे.

- मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पाय रोवू पाहणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या मनात वेगळाच डाव शिजत आहे. भारत राष्ट्र समितीला महाराष्ट्रात चेहरा मिळावा म्हणून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना हाक दिली आहे. आपल्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद शेट्टी यांनी स्वीकारावे, अशी विनंती त्यांनी शेट्टींना केली आहे. याशिवाय ते राजू शेट्टी यांना महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्रीपदावरही (Chief Minister) बसवू इच्छित आहेत, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी प्राण पणाला लावू, अशी साद घालत त्यांनी आता शेतकरी नेत्यांशीही संपर्क साधला आहे. (KCR offers Raju Shetti the post of Chief Minister of Maharashtra)

के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये विराट सभा घेऊन महाराष्ट्रात दमदारपणे पाऊल टाकण्याचे संकेत दिले आहेत. आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी ‘अबकी बार-शेतकरी सरकार’ अशी घोषणा दिलेली आहे. दरवर्षी प्रतिएकर दहा हजार रुपये, वयोवर्षे २० ते ६० या दरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाला, पाच लाखांचा आयुर्विमा, तसेच, शेतीसाठी मोफत वीज पाणी देण्याची घोषणाही चंद्रशेखर राव यांनी नांदेडच्या सभेत केली आहे. विशेष म्हणजे या योजनांची अंमलबजावणी ते आपल्या तेलगंणा राज्यात करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात हातपाय पसरायचे तर चर्चेतील चेहरा हवा, या नियमाप्रमाणे केसीआर यांनी नवा डाव टाकला आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात वलय राखून असलेले राजू शेट्टी यांना आपल्या पक्षात ओढण्याची नवी रणनीती त्यांनी आखली आहे. शेट्टी पक्षाचे प्रमुख होण्यास तयार झाले तर एक लोकमान्य चेहरा मिळेल, असे केसीआर यांना वाटते. राव यांचा निकटवर्तीय नेता शेट्टी यांना नुकताच भेटून गेला आहे. भारत राष्ट्र समितीच्या एका पदाधिकाऱ्याकडून या गोष्टीला दुजाेराही मिळालेला आहे. शेट्टी यांच्या निर्णयाची आम्हाला प्रतिक्षा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची संख्या पाहता केसीआर यांना महाराष्ट्र महत्वाचा वाटत आहे. तेलगंणामधील काम पाहण्याची विनंती केसीअर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेत्यांना घातली आहे.

महाराष्ट्रात सभा घेण्यापूर्वी केसीआर यांनी गृहपाठही जोरात केल्याचे दिसून येते. कारण महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी तेलंगणाजवळील महाराष्ट्रातील जिल्ह्याची त्यांनी निवड केल्याचे दिसून येते. विशेषतः तेलगू भाषिकांचे प्राबल्य असलेल्या भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठीच त्यांनी नांदेडची निवड केली आहे. नांदेडनंतर ते आपला मोर्चा लातूर, चंद्रपूरकडे वळविणार आहेत. तेलगंणामधून आलेली नेतेमंडळी गेली चार महिने या भागाची रेकी करत आहेत. राज्यभर चालेल असा चेहरा सध्या त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे सध्या ७ ते ८ मराठी नेते असून एक-दोन माजी आमदार वगळता त्यात कुणी फारसे दखल घेण्यासारखे नाहीत, त्यामुळे शेट्टी यांच्यापुढे त्यांनी मैत्रीचा हात केला आहे.

कॉंग्रेस आमदाराच्या भावाची ‘केसीआर’ला मदत

केसीआर यांना महाराष्ट्रात सध्या कॉंग्रेस आमदाराचा भाऊ मदत करत असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असताना काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावून केसीआर यांनी काय साध्य केले, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आपलेच गड उद्ववस्त करण्याच्य केसीआर यांच्या प्रयत्नामुळे काँग्रेसमध्ये मात्र नाराजी असल्याचे समजते. याशिवाय केसीआर यांनी काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची भेट घेतली होती. एकत्र येण्याची शपथ घेतली होती, त्यामुळे आता महाराष्ट्रात हातपास परविण्यामागे कारण काय, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काही निर्धारीत मते निवडणुकीत घ्यावी लागतात, त्यामुळे केसीआर यांचा आटापिटा असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT