Kolhapur Circuit bench Sarkarnama
विशेष

Kolhapur Circuit Bench : सर्किट बेंच अन् खंडपीठात नेमका फरक काय? कोल्हापुरात कसे होणार न्यायदान?

Difference Between Circuit Bench and Permanent Bench : कोल्हापुरात रविवारी सक्रिट बेंचचे उद्घाटन झाले आहे. महाराष्ट्रात सध्या मुंबई हायकोर्टाचे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरसह गोव्यात खंडपीठ आहे.

सरकारनामा ब्यूरो

लुमाकांत नलावडे

Kolhapur News : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते रविवारी कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाच्या सक्रिट बेंचचे उद्घाटन झाले. सोमवारपासून या सक्रिट बेंचचे कामकाज सुरू होणार आहे. या सक्रिट बेंचचा नेमका फायदा कसा होणार आहे, खंडपीठ आणि सक्रिट बेंचमध्ये फरक काय, त्याचे कामकाज कसे चालणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी याविषयी माहिती दिली आहे.

फरक काय?

सर्किट बेंच नेमण्याचे अधिकार राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींना तर खंडपीठ देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांद्वारे राष्ट्रपतींना असतो. सर्किट बेंचचे नोटिफिकेशन राज्यपाल तर खंडपीठाचे नोटिफिकेशन राष्ट्रपती प्रसिध्द करतात. तर खंडपीठ म्हणजेच कायमस्वरूपीचे बेंच असते. कोल्हापूरच्या सर्किट बेंच संदर्भात स्टेट री ऑर्गनायझेशन ऍक्टचे 1956 चे कलम 51(3 )प्रमाणे नोटिफिकेशन निघाले आहे. कायमस्वरूपी खंडपीठ कलम 51(2) व घटनेचे कलम कलम 214 प्रमाणे होते.

खंडपीठासाठी घटनात्मक प्रक्रिया

खंडपीठ देण्यासाठी घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करावी लागते, असे सांगून निवृत्त न्यायमूर्ती नलवडे म्हणाले,  राज्यातील हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती खंडपीठाचा प्रस्ताव तयार करतात आणि नंतर हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडे पाठवला जातो. प्रस्तावाला घटनात्मक मंजुरीनंतर राष्ट्रपती नोटिफिकेशन काढतात.

न्यायदान कसे?

न्यायदानाची प्रक्रिया सर्किट बेंच असो की खंडपीठ या दोन्ही ठिकाणी सारखीच असल्याचेही निवृत्त न्यायमूर्ती नलवडे यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच होत आहे. याठिकाणी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील न्यायमूर्तींची तात्पुरती नियुक्ती होऊ शकते. सर्किट बेंचचे रूपांतर खंडपीठामध्ये झाल्यानंतरच तिथे कायमस्वरूपी न्यायमूर्ती येऊ शकतात.

सहा जिल्ह्यांना फायदा

सर्किट बेंच मध्ये किती जिल्हे समाविष्ट आहेत, याचा उल्लेख नसला तरीही मागणी सहा जिल्ह्याची असल्याने ते सहा जिल्ह्यांसाठी असणार आहे. संबंधित सहा जिल्ह्यातील मुंबई हायकोर्टात असलेले खटले आता कोल्हापुरातील सर्किट बेंच मध्ये चालतील. तसचे नवे खटलेही दाखल होऊ शकतात.

कोणते खटले कोल्हापुरात?

कंपनी ॲक्ट, करासंबंधी खटले, तसेच एन. आय. ए. कोर्ट मुंबईतच असल्याने त्यासंबंधी कोर्टातील खटले प्रिन्सिपल सीट अर्थात मुख्य कोर्टासमोरच चालतील. इतर सर्व प्रकारचे खटले कोल्हापुरातील सर्किट बेंच समोर चालणार असल्याचे निवृत्त न्यायमुर्ती नलवडे यांनी सांगितले.

खंडपीठात रुपांतर?

काही कालावधीनंतर सर्किट बेंचचे रूपांतर खंडपीठात होऊ शकते. कोल्हापुरातही खंडपीठ होऊ शकते, असा विश्वासही निवृत्त न्यायमुर्ती नलवडे यांनी व्यक्त केला. सर्किट बेंच आणि खंडपीठाची स्थापना, न्यायमूर्तींची नियुक्ती याबाबत फरक असला न्यायदान किंवा कामकाजाची प्रक्रिया सारखीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT