Rajesh Kshirsagar-Satej Patil
Rajesh Kshirsagar-Satej Patil Sarkarnama
विशेष

राजेश क्षीरसागरांनी वाढवले सतेज पाटलांचे टेन्शन : फोनही घेतला नाही

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा माझ्या पाठीमागे रेटा आहे. या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करूनच मा माझी निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे, असे शिवसेनेचे माजी आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी शनिवारी रात्री स्पष्ट केले. माझी भेट घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) हे सकाळपासूनच मला फोन करत होते. मात्र त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही. जयश्री जाधव यांच्यासह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी माझ्या घरी येऊन माझी पत्नी वैशाली क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पाठिंबा देण्याची विनंती केल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली. (Kolhapur North : I will explain my role by discussing with activists : Rajesh Kshirsagar)

राजेश क्षीरसागर हे शिवसेनेकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीमुळे ही जागा कॉंग्रेसला सोडावी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा शुक्रवारी रात्री केली आहे. या मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले क्षीरसागर त्या घोषणेपासून नॉट रिचेबल होते. त्यानंतर क्षीरसागर यांच्याशी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

क्षीरसागर म्हणाले की, काँग्रेसला जागा सोडण्याचा निर्णयानंतर अनेक कार्यकर्ते माझी प्रतीक्षा करत आहेत. कोल्हापूरमध्ये मी उद्या (ता. २० मार्च) येणार आहे. प्रथम मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. त्यानंतरच पोटनिवडणुकीबाबत माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे मला भेटण्यासाठी आज दिवसभर फोन करीत होते. मात्र, त्यांच्याशी माझा कोणताही संवाद झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, (स्व.) चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी शनिवारी (ता. १९ मार्च) सायंकाळी भेटीसाठी माझ्या घरी गेले होते. त्यांनी माझ्या पत्नीची भेट घेत पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. मात्र, माझी पत्नी वैशाली क्षीरसागर यांनी कोणताही शब्द त्यांना दिलेला नाही. महाविकास आघाडीचा उद्या (ता. २०) मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या मेळाव्याला मी उपस्थित राहणार नसल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT