कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress) सोडल्याचे शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhay Thackeray) यांनी शुक्रवारी रात्री जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून २४ तास उलटत नाहीत तोच शिवसेनेतील (shivsena) नाराजी चव्हाट्यावर आली आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. क्षीरसागर यांनी ही पोटनिवडणूक लढवण्याची जय्यत तयारी केली होती. पण, हा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याने त्यांची निराशा झाली आहे. (Kolhapur North by-election : Shiv Sena's Rajesh Kshirsagar 'not reachable')
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीकडून काँग्रेस लढणार असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले होते. त्यानंतर शिवसेनेतील नाराजी प्रकर्षाने पुढे आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने स्थानिक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शिवसैनिकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तसेच, या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले राजेश क्षीरसागर हे शुक्रवारी रात्रीपासूनच नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिवसेना-भाजपची युती असताना शिवसेना लढवत होती. याच मतदारसंघातून क्षीरसागर आमदार होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत जाधवांकडून त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेचा परंपरागत असलेला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा, अशी मागणी कोल्हापूर शिवसेनेकडून होती. कारण नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली हा मतदारसंघ सेनेने काँग्रेससाठी सोडला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत आता शिवसेनेला संधी मिळावी, असा सूर होता.
काँग्रेसने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवागनी द्यावी, अशी मागणी खुद्द राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष क्षीरसागर यांनी केली होती. मात्र, पक्षाध्यक्षांकडून त्यांची ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे कोल्हापूरमधील शिवसेनेत नाराजी आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्या पत्नीचे नाव आघाडीवर आहे. तसेच, मालोजीराजे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीकडे कोल्हापूरचे लक्ष आहे.
भारतीय जनता पक्षाने सत्यजित कदम, महेश जाधव यांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. मात्र, भाजपकडून अजून कोणाचेही नाव अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. त्यातच क्षीरसागर नॉट रिचेबल झाल्याने उमेदवारीचे गूढ वाढले आहे. कारण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये पंढरपूर पॅटर्न राबविण्याबाबत सूतोवाच केले होते. पंढरपूरमध्ये समाधान आवताडे यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली होती, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. तीच गोष्ट देगलूरमध्ये झाली होती. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीकडेही सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.