M. Karunanidhi Political Life, Anti-Hindi Movement, Parasakthi Film Sarkarnama
विशेष

M Karunanidhi: काळा चष्मा अन् खांद्यावर पिवळी शाल! प्रगत तमिळनाडूची पायाभरणी; पटकथालेखक झाले 5 वेळा मुख्यमंत्री

Interesting Life Story-OF M Karunanidhi: तमिळनाडूला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून पुढे आणण्यात करुणानिधी यांनी अमूल्य योगदान दिलं. पहिल्या निवडणुकीत 1957 मध्ये ते कुथुलथाई विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी 13 वेळेस निवडणूक जिंकली.

अय्यूब कादरी

एक चित्रपट आणि पटकथा लेखक काय करू शकतो? हे समजून घ्यायचं असेल तर 1952 पर्यंत मागं जावं लागेल. तमिळ चित्रपटसृष्टीत त्या चित्रपटामुळं खळबळ माजली होती. या चित्रपटाच्या पटकथेनं राजकारणाला, चित्रपटसृष्टीला एक वेगळा विचार दिला होता.

चित्रपटातून रूढी, परंपरांवर प्रहार करण्यात आला होता. अर्थातच, त्या चित्रपटाला त्या काळातही विरोध झालाच होता. काही काळ प्रदर्शन लांबलं होतं. अखेर 1952 च्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित झाला, 'पराशक्ती' असं या तमिळ चित्रपटाचं नाव. या चित्रपटाचे पटकथा, संवाद लेखक पुढे तमिळनाडूचे पाचवेळा मुख्यमंत्री बनले.

एम. करुणानिधी, अर्थात मुथुवेल करुणानिधी यांनी 'पराशक्ती' या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. ते पटकथा-संवाद लेखक, साहित्यिकही होते. त्यामुळं तमिळनाडूत त्यांना 'कलाइनर' असंही म्हटलं जातं. कलायनर म्हणजे कलेच्या क्षेत्रातील विद्वान. पराशक्ती चित्रपटातून समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांवर प्रहार करण्यात आला होता.

या चित्रपटानं द्रविड मुनेत्र कळघम म्हणजेच डीएमके या पक्षाला राजकारणात एक महत्वाचा विचार दिला, महत्त्वाची भूमिका मिळवून दिली होती. तमिळ भाषा, तमिळ संस्कृतीला या चित्रपटात महत्व देण्यात आलं होतं. सामाजिक न्यायासायाठी एकत्र येऊन लढण्याची प्रेरणा लोकांना दिली होती. शिवाजी गणेशन यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

करुणानिधी यांचा जन्म 3 जून 1924 रोजी नागपट्टिनम जिल्ह्यातील थिरुकुवल्लाई या गावात झाला. मुथुवेल हे त्यांचे वडिल तर अंजुगम या मातुःश्री. करुणानिधी यांनी माध्यमिक शिक्षणही पूर्ण केलं नाही, मात्र तमिळ भाषेवर त्यांच प्रभुत्व होतं. शिक्षणाऐवजी त्यांचा ओढा लेखनाकडे अधिक होता. पटकथा लेखनातून त्यांनी लौकिक प्राप्त केला. पुस्तके लिहून त्यांनी तमिळ साहित्यातही महत्वाचं योगदान दिलं आहे.

त्यांनी तीन विवाह केले. पहिल्या पत्नी पद्मावती यांचं कमी वयात निधन झालं. त्यानंतर करुणानिधी यांनी दयालू अम्माल यांच्याशी विवाह केला. पद्मावती यांच्यापासून त्यांना ए. के. मुथु हे पुत्र झाले. एम. के. स्टॅलिन, एम. के. अलागिरी, एम. के. तमिलरसू आणि कन्या सेल्वी हे करुणानिधी आणि दयालू अम्माल यांची अपत्यं. रजती अम्माल यांच्याशी त्यांनी तिसरा विवाह केला. कनिमोळी या रजती अम्माल यांच्यापासून झालेल्या कन्या.

यशस्वी पटकथा लेखक ते पाचवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री, असा करुणानिधी यांचा थक्क करणारा प्रवास आहे. वयाच्या 14 व्या वर्षीच करुणानिधी राजकारणाशी जोडले गेले. कमी वयात त्यांनी राजकीय, सामाजिक आंदोलनांत भाग घेतला. हिंदी हटाओ आंदोलनानं याची सुरुवात झाली. तमिळनाडूत शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती.

दक्षिणेत या निर्णयाला प्रखर विरोध सुरू झाला. करुणानिधी यांचाही हिंदीला विरोध होता. त्यांनी मोहीमच उघडली होती. हिंदी नको, यासाठी त्यांनी तमिळ भाषेतून आपल्या लेखनीचा वापर केला. आंदोलनकर्त्यांसोबत तेही रेल्वे रूळांवर झोपले.

हिंदीविरोधी आंदोलनानंतर त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षापासून तमिळ चित्रपटांसाठी पटकथा लेखक म्हणून काम सुरू केलं. राजकुमारी हा त्यांचा पहिलाच चित्रपट लोकप्रिय झाला. त्यांनी पटकथा लिहिलेले 75 पेक्षा अधिक चित्रपटांनी मोठं यश मिळवलं. त्यांनी नाटकांच्या पटकथाही लिहिल्या.

ते सुधारणावादी विचारांचे होते. रूढी, परंपरांच्या विरोधात असलेल्या त्यांच्या काही चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. नंतर ती मागे घेण्यात आली. चित्रपटांवर बंदी आल्यामुळं करुणानिधी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. करुणानिधी यांनी विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, जमीनदारीचे निर्मूलन आदी विषय हाताळले. अशा सामाजिक संदेश देणाऱ्या त्यांच्या चित्रपटांना सेन्सॉरचा सामना करावा लागला.

करुणानिधी हे कोयंबतूर येथे राहत असत. तेथूनच त्यांनी व्यावसायिक नाटकं आणि चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या. त्याचदरम्यान पेरियार ई. व्ही. रामास्वामी आणि सी. एन. अण्णादुराई यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं.

प्रभावी लेखनशैलीसह करुणानिधी हे उत्कृष्ट वक्तृत्वशैलीचेही धनी होते. त्यामुळे पेरियार आणि अण्णादुराई यांनी त्यांना 'कुदियारासू' या त्यांच्या द्रविडार कळघम या पक्षाच्या मुखपत्राचं संपादक बनवलं. पुढे 1947 मध्ये पेरियार आणि अण्णादुराई यांच्यात मतभेद झाले. त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्यानंतर अण्णादुराई यांनी 1949 मध्ये 'डीएमके'ची स्थापना केली. करुणानिधी अण्णादुराई यांच्यासोबत राहिले, तरीही त्यांच्यावर पेरियार यांचा प्रभाव कायम राहिला.

पक्षाचा प्रसार आणि निधी गोळा करण्याची जबाबदारी अण्णादुराई यांनी करुणानिधी यांच्यावर सोपवली होती. यादरम्यान करुणानिधी हे तमिळ चित्रपटसृष्टीतही कार्यरत होते. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या त्यांना अत्यंत प्रभावीपणे निभावता आल्या.

पराशक्ती चित्रपटाची पटकथा त्यांनी त्याच काळात लिहिली होती. सुरुवातीला बंदीचा समाना करावा लागल्यानंतर 1952 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. पक्षाचा विचार पुढे नेण्यासाठी या चित्रपटाचा मोठा फायदा झाला. वाईट चालिरीतींवर प्रहार आणि द्रविड अस्मितेबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम या चित्रपटानं केलं होतं. करुणानिधी यांनी लिहिलेल्या बहुतांश पटकथा अशाच होत्या.

डीएमकेच्या समोर परीक्षा होती ती 1957 च्या विधानसभा निवडणुकीची. पक्षाची ही पहिलीच निवडणूक होती. डीएमकेला केवळ 13 जागा मिळाल्या. पहिल्याच निवडणुकीत करुणानिधीही विजयी झाले. यश फार मोठं नव्हतं, मात्र त्यामुळं यशाचा मार्ग गवसला होता. पुढील केवळ 10 वर्षांत या पक्षानं तमिळनाडूत उलटफेर केला.

1967 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेला स्पष्ट बहुमत मिळालं. अण्णादुराई हे मुख्यमंत्री बनले. ते पहिलेच बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री ठरले. मुख्यमंत्री बनल्यानंतर दोन वर्षांनी 1969 मध्ये अण्णादुराई यांचं निधन झालं. त्यानंतर पक्षाचं आणि सरकारचं नेतृत्व करुणानिधी यांच्या हाती आलं. 1969 मध्ये करुणानिधी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले.

यादरम्यान प्रसिद्ध चित्रपट कलाकार एम. जी. रामचंद्रन यांच्याशी त्यांची जवळीक वाढली होती. मात्र ती फार काळ टिकली नाही. पक्षात आपल्याला मान मिळत नाही, या भावनेतून एम. जी. रामचंद्रन बाजूला झाले आणि 1972 मध्ये त्यांनी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना केली. याच पक्षातून पुढं जयललिता यांचा उदय झाला. पुढे 1977 च्या निवडणुकीत करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पराभवाचा सामना करावा लागला. एआयएडीमकेला स्पष्ट बहुमत मिळालं.

तमिळनाडूत 1977 नंतर शह-काटशहाचं, सूडाचं राजकारण सुरू झालं. त्यातूनच विरोधी पक्षनेत्या असलेल्या जयललिता यांना सभागृहात केस धरून फरफटत नेण्यात आलं होतं. पुढे जयलिलता मुख्यमंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून करुणानिधी यांना मध्यरात्री त्यांच्या घरातून अटक केली होती.

पोलिसांनी करुणानिधी यांना अक्षरशः उचलून नेलं होतं. तमिळनाडूच्या राजकारणात सूडाचे असे प्रकार सातत्यानं घडत राहिले. आपल्या 60 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या राजकीय कारकीर्दीत करुणानिधी हे 13 वेळा विजयी झाले. संयुक्त मोर्चा, एनडीए आणि यूपीए या तिन्ही आघाड्यांच्या केंद्र सरकारमध्ये डीएमके सहभागी झाला होता.

तमिळनाडूला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून पुढे आणण्यात करुणानिधी यांनी अमूल्य योगदान दिलं. पहिल्या निवडणुकीत 1957 मध्ये ते कुथुलथाई विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी 13 वेळेस निवडणूक जिंकली. एकाही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नाही.

शेवटची निवडणूक त्यांनी थिरूवारूर मतदारसंघातून लढवली होती. त्यांच मूळ गाव थिरुकिवल्लाई याच मतदारसंघात आहे. 1967 मध्ये अण्णादुराई मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात करुणानिधी हे सार्वजनिक बांधकाम आणि परिवहन मंत्री होते. तमिळनाडूतील खासगी बसगाड्यांचे राष्ट्रीयीकरण करून त्यांनी प्रत्येक गाव बससेवेशी जोडलं. करुणानिधी यांच हे मोठं यश समजलं जातं.

अण्णादुराई यांच्या निधनानंतर करुणानिधी मुख्यमंत्री बनले आणि तमिळनाडूत एक नव्या राजकीय युगाची सुरुवात झाली. मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्याच कार्यकाळात त्यांनी कमाल जमीनधारणा कायद्यात बदल केला. 15 एकरांपेक्षा अधिक जमिनीची मालकी कोणाकडेही राहणार नाही, असा तो कायदा होता.

मागासवर्गीयांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणाची मर्यादा त्यांनी 25 टक्क्यांवरून वाढवून 31 टक्के केली. सर्व जातींच्या लोकांना मंदिरात पुजारी बनता येईल, असा कायदा केला. शासकीय कार्यक्रम आणि शाळांमधील कार्यक्रमांची सुरुवात धार्मिक गीतांनी होत असे. त्यात बदल करून कार्यक्रमांची सुरुवात धार्मिक गीताऐवजी तमिळ राज्यगीताने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तमिळ नाटककार आणि कवी मनोनमानियम सुंदरानार यांची कविता तमिळ राज्यगीत बनली. करुणानिधी यांनी कायदा करून मुलींना वडिलांच्या संपत्तीत बरोबरीचा वाटा दिला. राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण देण्यात आलं.

शेतकऱ्यांच्या पंपासांठी वीजपुरवठा मोफत करण्यात आला. अतिमागासवर्गाची निर्मिती करून त्या प्रवर्गातील नागरिकांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र असं २० टक्के आरक्षण दिलं. करुणानिधी यांच्या सरकारने चेन्नईत मेट्रोसेवा सुरू केली. गरजू नागरिकांना रेशन दुकानांतून केवळं एक रुपया प्रतिकिलो दरानं तांदूळ उपलब्ध करून दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं.

नागरिकांसाठी मोफत आरोग्य विम्याची सोय उपलब्ध केली. हातानं ओढल्या जाणाऱ्या रिक्षांवर त्यांनी बंदी घातली, दलित समाजातील नागरिकांना मोफत घरं दिली. करुणानिधी हे 19 वर्षे तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. 'सामाथुवापुरम' ही करुणानिधी यांनी राबवलेली अत्यंत महत्वाकांक्षी, सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारी योजना ठरली.

या गृहप्रकल्प योजनेअंतर्गत दलित समाजातील नागरिक आणि उच्चवर्णीय हिंदूंना मोफत घरं देण्यात आली, पण त्यासाठी महत्वाची अट होती ती म्हणजे जातीची बंधनं तोडून या नागरिकांनी मिळून राहायचं. या योजनेतील वसाहतींमध्ये दलित आणि सवर्ण हिंदूंची घरे एकमेकांच्या शेजारीच होती.

करुणानिधी यांचे असे निर्णय हे प्रगत राज्य म्हणून तमिळनाडूच्या वाटचालीत मैलाचे दगड ठरले. हे निर्णय एका अर्थानं क्रांतिकारी होते. त्यामुळे करुणानिधी यांना सामाजिक न्यायाचे प्रणेते असंही म्हटलं जातं.

मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात करुणानिधींनी भूमिका बजावली. डीएमकेमध्ये दोनवेळा फूट पडली, त्याचे धक्केही बसले, मात्र त्यातून ते सावरले. पहिल्यांदा एम. जी. रामचंद्रन यांच्यामुळे फूट पडली. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत पक्षाची सत्ता गेली होती. वायको यांच्यामुळे 1993 मध्ये डीएमकेत मोठी फूट पडली होती. वायको यांनी एमडीएमके पक्षाची स्थापना केली. वायको यांच्यासोबत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला होता. करुणानिधी यांनी पुन्हा पक्षाची बांधणी केली.

पक्षसंघटना, सरकारमध्ये करुणानिधी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना महत्वाची भूमिका मिळाली. त्यामुळं त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप झाले. आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत करुणानिधी यांनी राज्यांच्या स्वायत्ततेसाठी लढा दिला. 2011 मध्ये त्यांनी शेवटची पटकथा लिहिली.

डीएमकेचं मुखपत्र असलेल्या मुरासोली या वृत्तपत्रात ते टोपणनावानं लिहित असत. बहुचर्चित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात त्यांच्या पक्षाचे तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा आणि राज्यसभा सदस्य कनिमोळी यांची नावं आली होती. ए. राजा मुख्य आरोपी होते. त्यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. कनिमोळी या करुणानिधी यांच्या कन्या. या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.

7 ऑगस्ट 2018 रोजी करुणानिधी यांचं चेन्नईत निधन झालं. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर आक्रोश केला होता. नेहमीच काळा चष्मा आणि खांद्यावर पिवळी शाल घेणाऱ्या करुणानिधी यांच्या राजकारणाचं मूळ द्रविड चळवळीत होतं. हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेला विरोधाच्या पायावर त्यांचा पक्ष उभा होता.

करुणानिधी यांनी नास्तिक राहत पेरियार यांची परंपरा पुढे चालवली. प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाबाबतही त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. ते स्वतःला नास्तिक म्हणवत असले तरी त्यांचं घर कृष्ण मंदिराच्या जवळ होतं. मी नास्तिक असलो तरी माझे विचार इतरांवर थोपत नाही, असे ते एकदा म्हणाले होते.

करुणानिधी यांचं वाचन अफाट होतं. वाचलेल्या सर्व पुस्तकांची नावं त्यांच्या लक्षात होती. त्यांनी कादंबऱ्या, निबंध, चरित्रे लिहिली. यात त्यांच्या आत्मचरित्राचाही समावेश आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या 100 पेक्षा अधिक असल्यांच सांगितलं जातं. त्यांच्या घरात एक ग्रंथालय आहे. त्यात 10 हजारांपेक्षा अधिक पुस्तकं आहेत. करुणानिधी यांनी त्यांच राहतं घर 2010 मध्येच दान केलं होतं. त्यांच्या इच्छेनुसार या घरात गरजूंसाठी रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT