Jayalalithaa Political Journey: मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत पाय ठेवणार नाही! 'अम्मां'नी करुन दाखवलं...

Jayalalithaa Journey From Actress To Iron Lady: जयललिता यांच्या मातुश्रींनी नंतर तमिळ चित्रपटांत काम सुरू केलं. यासाठी त्यांनी संध्या हे नाव धारण केलं. जयललिता यांचं प्राथमिक शिक्षण बेंगळुरू आणि नंतर चेन्नई येथे झालं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी शिष्यवृत्तीच्या रकमेवर पूर्ण केलं.
Jayalalithaa Journey From Actress To Iron Lady
Jayalalithaa Journey From Actress To Iron LadySarkarnama
Published on
Updated on

Jayalalithaa: From Silver Screen to Political Power:विधानसभेत मोठा गदारोळ सुरू झाला होता. त्या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार होता. त्यापूर्वीच काँग्रेसच्या एका नेत्यानं विरोधी पक्षनेत्यावर पोलिसांकडून बेकायदेशीर कारवाई केली गेल्याचा आरोप केला. असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आणि सभागृहातील वातावरण तापलं. विरोधी पक्षनेत्यांनी आपला फोन टॅप झाल्याचा आरोप करत सरकारवर प्रहार केला. माझ्यावर चुकीच्या पद्धतीनं पोलिस कारवाई करण्यात आली. त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

परिस्थिती हाताबाहेर गेली. सभागृहात धक्काबुक्की सुरू झाली. माईक हवेत उडू लागले होते. धक्का लागल्यामुळं मुख्यमंत्री पडले. त्यामुळे वाचावरण अधिकच तापले. सत्ताधारी सदस्यांचा पारा चढला. मग त्यांनी विरोधी पक्षनेत्याची साडी ओढली. काहीजणांनी केस धरून त्यांना फरफटत नेलं. विरोधकांनी कशीबशी त्यांची सुटका केली, विखुरलेले केस आणि साडी.. अशा अवस्थेत त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. तेथेच त्यांनी एक प्रतिज्ञा केली, माझ्यासोबत आज जे झालं आहे, त्याचे उत्तर मी अवश्य देणार आहे. पुढच्या वेळी मी या सभागृहात पाय ठेवीन तर मुख्यमंत्री म्हणूनच!, मी जयललिता, अशी शपथ घेते.

स्थळ होतं, अर्थातच तमिळनाडूची विधानसभा आणि दिवस होता 25 मार्च 1989. या दिवशी जयलिलता यांनी घेतलेली शपथ पुढील दोन वर्षांतच खरी ठरली. 1991 मध्ये त्या मुख्यमंत्री बनल्या. 1991 ते 2016 दरम्यान तब्बल 5238 दिवस म्हणजे 14 वर्षांपेक्षा अधिक काळ त्या मुख्यमंत्रिपदावर राहिल्या. उच्च शिक्षणात रस असलेल्या मात्र अभिनय क्षेत्राकडे वळलेल्या जयललिता यांनी राजकारणात जम बसवला होता. अम्मा या नावाने त्या परिचित होत्या. त्या मुख्यमंत्री तर बनल्याच, शिवाय ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम अर्थात एआयएडीएमके या पक्षाच्या सर्वेसर्वाही बनल्या होत्या. तमिळ, तेलुगुसह कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केलं.

Jayalalithaa Journey From Actress To Iron Lady
Raju Patil News: ठाण्याची 'रिक्षा’ भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात! मनसे माजी आमदारानं व्हिडिओ शेअर करीत एकनाथ शिंदेंचं लक्ष वेधलं!

जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी मेलूरकोट गावात झाला. हे गाव म्हैसूर राज्यातील मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यात होतं. म्हैसूर हे आता कर्नाटकमध्ये आहे. त्यांचे आजोबा म्हैसूरचे महाराजा कृष्णराज वाडियार चौथे यांच्या दरबारी शल्यचिकित्सक होते. त्या दोन वर्षांच्या असतानाच त्यांचे वडील जयराम यांचं निधन झालं. त्यांच्या मातुश्री वेदावल्ली या नंतर बेंगळुरुला आपल्या माहेरी आल्या. त्यांना जयलिलता आणि जयकुमार अशी दोन अपत्यं. जयललिता यांच्या मातुश्रींनी नंतर तमिळ चित्रपटांत काम सुरू केलं. यासाठी त्यांनी संध्या हे नाव धारण केलं. जयललिता यांचं प्राथमिक शिक्षण बेंगळुरू आणि नंतर चेन्नई येथे झालं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी शिष्यवृत्तीच्या रकमेवर पूर्ण केलं.

जयललिता यांच्या मद्रासमध्ये राहत होत्या. यादरम्यान जयललिता या आजी-आजोबा आणि मावशीसोबत बेंगळुरू येथे राहिल्या. त्या 11 वर्षांच्या असताना त्यांच्या मावशींचं लग्न झालं. त्यामुळं जयललिलता यांना आई संध्या यांच्याकडे मद्रासला यावं लागलं. जयललिता यांनी शिक्षणासह शास्त्रीय नृत्यही शिकावं, असं त्यांच्या आईंना वाटत असे. एक घटना अशी घडली की ती जयललिता यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. कर्नाटकमधील एका हॉटेलात कर्नन चित्रपटाच्या यशाबद्दल पार्टी होती. या चित्रपटात संध्या यांची भूमिका होती.

Jayalalithaa Journey From Actress To Iron Lady
Tahawwur Rana: तहव्वुर राणाला फाशी होऊ शकते का? कायदा काय सांगतो

संध्या या जयललिता यांना घेऊन या पार्टीत आल्या होत्या. पार्टी संपल्यानंतर त्या दोघी तेथून निघत होत्या तितक्यात निर्माता बी. आर. पंथुलू यांनी त्यांना हाक मारली. कल्याणकुमार यांच्यासोबत एक कन्नड चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटात जयललिता यांनी हीरोईन म्हणून काम करावं, अशी अपेक्षा पंथुलू यांनी व्यक्त केली. संध्या यांनी थोडा विचार करून त्यासाठी होकार कळवला. उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जयललिता याला विरोध करतील, असं त्यांना वाटलं होतं, मात्र तसं काही झालं नाही. जयललिता यांनीही होकार दिला. हा आपला पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल, असं जयललिता यांना वाटलं होतं, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं.

पंथुलू यांच्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीधर हे जयललिता यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी इच्छुक होते. आता मात्र जयललिता यांनी विरोध करायला सुरुवात केली. नुसता विरोधच नव्हे, तर त्यांनी घर डोक्यावर घेतलं. श्रीधर यांनी ऑफर दिली त्याचवेळी जयललिता यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. शिक्षण पूर्ण करणं हा त्यांचा प्राधान्यक्रम होता. मात्र चित्रपटात काम करावं, यासाठी त्यांच्या आईंचा दबाव होता. श्रीधर यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, असं संध्या यांना वाटत होतं आणि झालंही तसंच.

Jayalalithaa Journey From Actress To Iron Lady
Chhagan Bhujbal: मी फक्त आमदार, उपोषणाला बसायला मोकळा! अजितदादांनी डावलल्याची सल भुजबळांनी पुन्हा बोलून दाखवली...

दोन-तीन तमिळ चित्रपट प्रदर्शित झाले आणि जयललिता यांची चलती सुरू झाली. त्यांच्या या यशात एमजीआर अर्थात एम. जी. रामचंद्रन यांचाही वाटा होता. या दोघांची जोडी सुपरहिट ठरली. आपल्या सर्व चित्रपटांत जयललिता याच अभिनेत्री असाव्यात, असे एमजीआर यांनी त्यांचे निर्माता मित्र ए. व्ही. मैयप्पन यांना सांगितलं. मैयप्पन यांना हे मान्य नव्हतं. त्यामुळं एमजीआर यांनी मैयप्पन यांच्या चित्रपटांना विलंब लावायला सुरुवात केली. त्यामुळं मैयप्पन यांचं नुकसान होऊ लागलं. परिणामी, मैयप्पन यांनी एमजीआर यांची अट मान्य केली. त्यांच्या सर्व चित्रपटांत जयललिता यांना भूमिका मिळू लागल्या.

जयललिता यांच्या जीवनात एमजीआर यांचा हस्तक्षेप वाढला होता, त्यामुळं त्या त्रस्तही व्हायच्या, असं सांगितलं जातं. दरम्यान, 1969 च्या विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूत पुन्हा द्रविड मुनेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षाचं सरकार आलं. करुणानिधी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. करुणानिधी यांच्या या यशात एमजीआर यांचा मोठा वाटा होता, हे जगजाहीर होतं. एमजीआर यांनी करुणानिधी यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. त्यांचं भाषण झालं की बहुतांश लोक उठून जायचे. एमजीआर यांच्या बोलण्याचा लोकांवर परिणाम होतोय, याची जाणीव करुणानिधी यांनाही झाली होती. त्यामुळं त्यांनी एमजीआर यांना बाजूला सारायला सुरुवात केली होती.

पक्षाच्या बैठकांत एमजीआर यांना टाळलं जाऊ लागलं. राजकारण सोडून चित्रपटाच्या क्षेत्रात लक्ष केंद्रीत करा, असे सल्ले त्यांना दिले जाऊ लागले. करुणानिधी यांच्यात झालेला हा बदल एमजीआर यांच्यासाठी धक्कादायक होता. एके दिवशी त्यांनी सरळ डीएमकेचं कार्यालय गाठलं आणि मंत्रिपद देण्याची मागणी केली. करुणानिधी यांनी तातडीनं त्यांचा हा प्रस्ताव नाकारला. त्यांचा हा नकार तमिळनाडूच्या राजकारणातील 'गेमचेंजर' ठरला. एमजीआर यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर एमजीआर यांनी एआएयडीएमके पक्षाची स्थापना केली. तमिळनाडूच्या राजकारणात त्यांनी स्वतःला झोकून दिलं.

या सर्व घडामोडींत जयललिता या एमजीआर यांच्यासोबत होत्या. 1977 मध्ये एमजीआर मुख्यमंत्री बनले. 1987 पर्यंत ते या पदावर राहिले. चित्रपट क्षेत्रासह राजकारणातही जम बसवण्याची कला त्यांना साध्य झाली होती. पक्षाची धोरणं तयार करण्याची जबाबदारी जयललिता यांच्यावर सोपवण्यात आली होती. जयललिता यांची पक्षात वाढत असलेली उंची त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना खुपत होती. 1984 मध्ये एमजीआर आजारी पडले. त्यांना उपचारांसाठी अमेरिकेला जावं लागलं. या काळात जयलिलता यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न झाला. खुद्द एमजीआर हेही जयललिता यांच्या विरोधात गेले.

त्यावेळी जयललिता राज्यसभच्या सदस्य होत्या. पक्षानं त्यांचं उपनेतेपद काढून घेतलं. पक्षाच्या कार्यालयात त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. एमजीआर यांची मानसिक चांगली नसल्याचा काही लोक गैरफायदा उचलत आहेत. त्यातूनच माझ्यावर वैयक्तिक हल्ले केले जात आहेत. मी आणि एमजीआर मिळून उभ्या केलेल्या पक्षाला कमकुवत केलं जात आहे, असे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर त्यांनी लागलीच दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधून राजकीय संरक्षणाची मागणी केली आणि येथेच घोळ झाला. एमजीआर परदेशात असल्याची संधी साधून काँग्रेसशी जवळीक साधत मुख्यमंत्रिपद बळकावण्याचा प्रयत्न जयललिता करत आहेत, असा संदेश पसरवण्यात आला. त्यामुळं त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला.

पुढील निवडणुकांत पक्षानं जयललिता यांना प्रचारापासून दूर ठेवलं. काँग्रेससोबत त्यांच्या पक्षाची युती होती, त्यामुळं राजीव गांधी यांनी हस्तक्षेप करून त्यांना प्रचारात सहभागी करून घेतलं. अमेरिकेत असतानाही एमजीआर पुन्हा मुख्यमंत्री बनले आणि त्यामुळं पक्षात जयललिता यांचा दबदबा वाढला. दोन महिन्यांनंतर एमजीआर परत आल्यानंतर जयललिता यांच्या विरोधकांनी त्यांचे कान भरले. एमजीआर यांनी जयललिता यांना दूर सारलं. त्यांच्या एकाही निकटवर्तीयाला मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. अखेर एके दिवशी जयललिता आणि एमजीआर यांची भेट झाली. या भेटीत त्यांच्यातील मतभेद दूर झाले आणि त्यांना पक्षात पुन्हा मानाचं स्थान मिळालं. एमजीआर यांचं 1987 मध्ये निधन झालं. त्यानंतर पक्षात दोन गट पडले. एक जयललिता यांचा आणि दुसरा एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांचा.

जयललिता यांनी स्वतःला एमजीआर यांच्या राजकीय वारस म्हणून घोषित केलं. 1989 मध्ये त्या विरोधी पक्षनेत्या बनल्या. त्याच वर्षी 25 मार्च रोजी विधानसभेत सुरुवातीला सांगितलेला प्रसंग घडला होता. धक्काबुक्कीत जयललिता यांची साडी फाटली होती. त्यांना फरफटत नेण्यात आलं होतं. द्रौपदीच्या वस्त्रहरणासारखा हा प्रकार असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं आणि मुख्यमंत्री बनल्याशिवाय सभागृहात पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ घेतली. सभागृहात घडलेल्या दुर्दैवी प्रकारामुळं जयललिता यांना प्रचंड सहानुभूती मिळाली.

राजीव गांधी यांची 1991 मध्ये हत्या झाली. त्यानंतर झालेली विधानसभेची निवडणूक त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करून लढवली आणि बहुमत मिळवले. 24 जून 1991... जयललिता यांची शपथ पूर्ण झाली होती. त्या मुख्यमंत्री बनल्या होता. तमिळनाडूच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. अनाथ मुलांसाठी पाळणाघर, केवळ महिला कर्मचाऱ्यांचे पोलिस ठाणे त्यांनी सुरू केले. या दरम्यान जयललिता आणि त्यांच्या काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अविवाहित राहिलेल्या जयललितांनी दत्तक पुत्र व्ही. एन. सुधाकरन यांच्या लग्नावर 1995 मध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला. या सर्व बाबींचा परिणाम झाला आणि 1996 च्या निवडणुकीत पक्षाची सत्ता गेली, त्यांचाही पराभव झाला.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली, मात्र 2001 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा पक्षाला सत्ता मिळवून दिली आणि त्या मुख्यमंत्री बनल्या. लॉटरीवर बंदी, संपावर गेलेल्या 2 लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणे, शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा बंद, शासकीय वितरणाच्या तांदळाची दरवाढ आदी कठोर निर्णय त्यांनी घेतले. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर त्यांनी मोफत वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला. अम्मा कँटीन सुरू करून अल्पदरात भोजन उपलब्ध केलं. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांची आमदारकी रद्द केली. त्यामुळं ओ. पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री बनले. मद्रास उच्च न्यायालयाने आमदारकी बहाल केल्यानंतर मार्च 2002 मध्ये त्या पुन्हा मुख्यमंत्री बनल्या.

डीएमकेचे नेते एम. करुणानिधी यांना नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती. फ्लायओव्हर घोटाळ्याचा आरोप करत पहाटे दोन वाजता पोलिसांनी त्यांना त्यांच्या बेडरूममधून अक्षरशः फरफटत नेलं होतं. त्यांना कपडे बदलण्याचीही संधी देण्यात आली नव्हती. असं सांगितलं जात की, यामागे जयललिता यांचं सूडाचं राजकारण होतं. करुणानिधी यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत. 2007 मध्ये डीएमकेची सत्ता आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण बंद करून टाकलं. कलर टीव्ही घोटाळ्यात 1996 मध्ये जयललिता यांनाही अटक झाली. पुराव्यांअभावी त्यांची मुक्तता झाली.

ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक उत्पन्नाच्या प्रकरणात बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने 27 सप्टेंबर 2014 रोजी जयललिता यांना चार वर्षांचा कारावास आणि 100 कोटी रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. 11 मे 2015 रोजी कर्नाटक उच्च न्यायालायने त्यांची शिक्षा रद्द केली. त्यानंतर 23 मे 2015 रोजी त्या पुन्हा मुख्यमंत्री बनल्या. सप्टेंबर 2016 मध्ये त्या आजारी पडल्या. 5 डिसेंबर 2016 रोजी हृदयक्रिया बंद पडल्यामुळे त्यांचं निधन झालं. जयललिता यांची खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या मैत्रीण व्ही. के. शशिकला या 1998 पासून जयललिता यांच्यासोबत त्यांच्या पोएस गार्डन या निवासस्थानी राहू लागल्या होत्या. 1996 मध्ये शशिकला यांनाही कारागृहात जावं लागलं होतं.

पडद्यामागून सर्व सूत्रे शशिकलाच हलवू लागल्या. त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली. एक वेळ अशी आली की जयललिता यांनी शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांना पक्षातून आणि पोएस गार्डनमधूनही बाहेर काढलं. शशिकला यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नसल्याचं, केवळ जयललिता यांची बहीण बनून राहण्याची इच्छा असल्याच जाहीर केलं. त्यानंतर शशिकला यांची पुन्हा पोएस गार्डनमध्ये एन्ट्री झाली होती. जयललिता यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत शशिकला त्यांच्या सोबत राहिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com