NCP Sharad Pawar Sarkarnama
विशेष

NCP SP : शरद पवार हेच प्रचाराचे प्रमुख ‘अस्त्र’, सोशल मीडियाचा केला जातोय 'असा' वापर

Assembly Election NCP SP : शेकडो कोटी रुपये खर्च करून प्रचारासाठी एजन्सी न नेमता कार्यकर्ते आणि सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपला प्रचार करत आहे.

सरकारनामा ब्यूरो

सदानंद पाटील

NCP SP News : राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञान, मोठमोठ्या पीआर एजन्सी, संशोधन संस्था, अत्याधुनिक डिजिटल वाहने वापरली जात आहेत. दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हेच प्रचाराचे प्रमुख ‘अस्त्र’ बनले आहेत. प्रचारानिमित्त होणाऱ्या भेटीगाठींमधून ते विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ लावत आहेत. तर जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे ही प्रमुख मंडळी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत विरोधकांच्या ‘मर्मा’वर बोट ठेवत आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. दिवाळीनंतर सर्वच पक्ष प्रचारात दंग झाले आहेत. पूर्वीची खळ, पोस्टर, भिंती रंगवणे ही प्रचाराची पद्धत आता मागे पडली आहे. मोबाईल हे प्रचाराचे प्रमुख साधन बनले आहे. काही मिनिटांत प्रचाराचा मुद्दा राज्याच्या कानाकोपऱ्यांत लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या तंत्राने सोपे केले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचे प्रमुख शस्त्र म्हणून सोशल मीडियाच्या वापरास प्राधान्य दिले आहे.

शेकडो कोटी रुपये खर्च करून प्रचारासाठी एजन्सी न नेमता कार्यकर्ते आणि सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपला प्रचार करत आहे. एकूणच प्रचारात राज्यातील प्रादेशिक अस्मिता केंद्रस्थानी ठेवून 'राष्ट्रवादी'ची सोशल मीडिया टीम प्रचार यंत्रणा राबवत आहे.

चोवीस तास कार्यालय सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय मुंबई येथे आहे. असे असले तरी, प्रचाराची सूत्रे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसारच हलत आहेत. पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांना राज्यातील घडणाऱ्या घडामोडींची माहिती मुंबई येथील सोशल मीडियाच्या टीम कडून सातत्याने पुरविली जाते. हे कार्यालय 24 तास सुरू असते. राज्यभर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचे होणारे प्रचार दौरे, सभा, तसेच बैठकातून उपस्थित होणारे मुद्दे, प्रमुख नेत्यांची भाषणे आणि त्यातील महत्त्वाचे विषय या सर्वांतून प्रचारासाठी आवश्यक मुद्दे काढण्याचे काम सोशल मीडियाची ही टीम अविश्रांत करत असते. एखादा मुद्दा ठरला की त्याला पूरक असणारी माहिती, कायदेशीर बाबी, पुरावे याची तपासणी करण्यात येते. हे सोपस्कार पार पडल्यानंतर आणि खात्री पटल्यानंतरच संबंधित मुद्द्याच्या आधारे प्रचारासाठीचा, प्रसिद्धीसाठीचा व्हिडिओ किंवा सोशल मीडियावरील मजकूर तयार करण्यात येतो. प्रचारासाठी वापरला जाणारा मुद्दा कोणत्या भागासाठी, कोणत्या वयोगटासाठी, कोणत्या मतदारांसाठी तयार करण्यात आला आहे, त्यानुसार तो व्हायरल केला जातो. यासाठी फेसबुक आणि ट्विटर यांचा सर्वाधिक वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले.

सोशल मीडियावर लक्ष

राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाची ही टीम वेगवेगळ्या चार टप्प्यावर काम करते. मुख्य टीमच्या वतीने मुद्द्याची खात्री करून सोशल मीडियावर पाठवण्यात येणारा व्हिडिओ किंवा पोस्टचा कन्टेन्ट तयार केला जातो. त्यानंतर दुसरी टीम याबाबतची पोस्ट, व्हिडिओ तयार करते. तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ किंवा पोस्ट तिसऱ्या टप्प्यात राज्याच्या सर्व जिल्ह्यात असणाऱ्या सोशल मीडियाच्या मुख्य टीमकडे पाठवली जाते. तर चौथ्या टप्प्यात ही पोस्ट शहरातील विविध वॉर्डचे प्रमुख आणि गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर पाठवली जाते. साधारणपणे एक ते दोन तासात संपूर्ण राज्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे एखादा मेसेज पोहोचवला जातो. नुकतीच सांगली येथे भाजपचे नेते गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. या सभेत अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्याबाबत वक्तव्य केले. हे वक्तव्य चुकीचे असल्याचे दाखले देत, त्याबाबतची माहिती सोशल मीडियावरून सर्वत्र प्रसारित करण्यात आली. याबाबत तयार करण्यात आलेल्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. अलीकडे तर महायुतीचे नेतेच अनेक मुद्दे प्रचारासाठी देत असल्याने सोशल मीडियाच्या टीमचे काम सोपे झाले असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सभांचे प्रसारण

राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेत विविध टप्पे ठरविण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांचे प्रसारण राज्याच्या कानाकोपऱ्यात करण्यावर भर दिला जात आहे. त्यानंतर पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्या सभा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील अशा दृष्टीने नियोजन केले जाते. त्यानंतर पक्षाचे जे ‘स्टार कॅम्पेनर’ आहेत त्यांच्या सभा आणि कोपरा सभा , या सभेतील लोकांचा सहभाग याचे प्रसारण करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले जाते.

स्थानिक मुद्दे

प्रचार यंत्रणा राबवत असताना प्रादेशिक अस्मिता अत्यंत महत्त्वाचे असल्याचे लक्षात येत आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसीमधील अस्वस्थता. पश्चिम महाराष्ट्रात सहकारी संस्था, उसाची एफआरपी, गाई- म्हैशीच्या दुधाला भाव या मुद्द्यांवर फोकस करण्यात येत आहे. शेतकरी कर्जमाफी तर प्रचाराच्या केंद्रस्थानी कायम राहिलेला मुद्दा आहे. मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भामधील धानाचा प्रश्न सतत चर्चेत ठेवण्यात आले आहेत. सोयाबीनला मिळत नसलेला हमीभाव, कापूस खरेदी योजनेचा बोजवारा या मुद्द्यांना फोकस करण्यात येत आहे. तर कोकणमध्ये खराब रस्ते आणि त्यामुळे लोकांना करावी लागणारी कसरत याचबरोबर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे निकृष्ट बांधकाम हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. स्थानिक प्रश्न आणि मुद्दे खूप प्रभावी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीची पंचसूत्री प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जातीय जनगणना, शेतकरी कर्जमाफी, आरक्षण मर्यादित वाढ करण्याचा मुद्दा लोकप्रिय ठरत असल्याचे सोशल मीडिया टीमला आढळून येत आहे.

विरोधी पक्ष देत आहेत मुद्दे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कोणते मुद्दे चालवायचे याचा दररोज अभ्यास करावा लागतो. कोणत्या भागात कोणता मुद्दा चालू शकतो, कोणता मुद्दा अडचणीचा ठरू शकतो याची चाचपणी करूनच तो सोशल मीडियात आणला जातो. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून असे लक्षात येत आहे की प्रचारातील बहुतांश मुद्दे हे सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यातूनच घेतले जात आहेत. त्यांनी केलेली वक्तव्ये ही प्रचाराच्या केंद्रस्थानी राहत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT