NCP Manifesto : समाजातील सर्व घटकांवर आश्वासनांची खैरात! अजितदादांचा जाहीरनामा ठरणार 'गेम चेंजर'?

Maharashtra Assembly Election NCP Manifesto Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वतीने निवडणुकीसाठी घोषणापत्र (जाहीरनामा) प्रकाशित करण्यात आला आहे. या घोषणापत्राचे वैशिष्टय म्हणजे पक्षाच्या मुख्य जाहीरनाम्यात 11 नव्या घोषणा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
NCP (AP)
NCP (AP)sarkarnama
Published on
Updated on

पांडुरंग म्हस्के

NCP Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणापत्रात (जाहीरनामा) महिला, विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, आशा सेविका अशा सर्वच घटकांना समोर ठेवून विविध योजना जाहीर केल्या आहेत. तर महाराष्ट्रासाठी दिशादर्शक योजना सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत. या जाहीरनाम्यात आश्वासनाची खैरात करताना केवळ आर्थिक लाभ राज्यातील जनतेला कसे मिळतील, याचा उल्लेख करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपयांपर्यंत करण्याचे आश्वासनही देण्यात आले असून, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात येणार आहे.

कोणत्याही निवडणुकांत पक्षाचा जाहीरनामा हा महत्त्वाचा घटक असतो. त्यातूनच पक्षाची ध्येय-धोरणे, आगामी दिशा, राज्य कशा प्रकारे चालविले जाणार याची झलक त्यातून दिसते. तर सामान्य माणसाला कोणाला मत द्यायचे हे बऱ्याचदा या जाहीरनाम्यावरून ठरविता येणे सोपे होते. आताच्या विधानसभा निवडणुकीतही प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या जाहीरनाम्यांचे स्वरूप बदलले नसले तरी त्याचे नाव आता ‘जाहीरनामा’ राहिलेले नाही. याला कोणी ‘वचननामा’, ‘शपथनामा’ तर काहींनी घोषणापत्र असे नाव दिले आहे.

NCP (AP)
BJP On Hindutva: 'हिंदुत्वाचे कार्ड' कुणाचे पत्ते ओपन करणार; 'व्होट जिद्दाद' भाजपला तारणार का?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) वतीने निवडणुकीसाठी घोषणापत्र (जाहीरनामा) प्रकाशित करण्यात आला आहे. या घोषणापत्राचे वैशिष्टय म्हणजे पक्षाच्या मुख्य जाहीरनाम्यात 11 नव्या घोषणा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचबरोबर पक्ष लढवीत असलेल्या सर्व उमेदवारांच्या मतदारसंघासाठीच्या जाहीरनाम्याचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून, तर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईतून, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया येथून हे घोषणापत्र एकाचवेळी प्रकाशित केले.

सर्वसमावेशकतेवर भर

या घोषणापत्रात महिला, विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, अशा सेविका अशा सर्वच घटकांना समोर ठेवून विविध योजना जाहीर केल्या आहेत. तर महाराष्ट्राला दिशा देण्याबाबतच्या योजना सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत. घोषणापत्रात आश्वासनाची खैरात करताना केवळ आर्थिक लाभ राज्यातील जनतेला कसे मिळतील, याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजनांचीच सरबत्ती दिसत आहे. या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपयांपर्यंत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात येणार आहे.

भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी 25 हजार प्रति हेक्टरी बोनस दिला जाणार आहे. शिवाय तरुणांना 25 लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात 45 हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय प्रशिक्षणाद्वारे एक लाख विद्यार्थ्यांना दहा हजार मासिक विद्यावेतन देणार आहे. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना १५ हजार मासिक वेतन, सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीजबिल ३० टक्के कमी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर आळा, निवृत्तिवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 2100 रुपये अशी आश्वासनेही देण्यात आली आहेत.

शेतमालाला किमान भावाबाबत मौन

महायुतीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांत बऱ्याच योजना जाहीर करण्यात आल्या. त्या योजना निव्वळ घोषित न करता त्या योजनांची अंमलबजावणी कसोशीने करण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारने उत्तम पद्धतीने केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. शेतकऱ्याचे कर्ज माफ करतानाच शेतीपिकांच्या किमान आधारभूत किमतीवर 20 टक्के अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, शेतमालाला किमान भाव मिळण्यासाठी काय करणार? याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

‘लाडकी बहीण’-महिला सुरक्षेवर भर

या घोषणापत्रात लाडकी बहीण योजना, 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, 52 लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षणाचा समावेश, गरीब, मध्यमवर्गीय, युवक, महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांना फार मोठा प्रतिसाद राज्यातील कानाकोपऱ्यातून मिळाला आहे. विशेष म्हणजे या सर्व योजनांच्या माध्यमातून कुटुंबाला किंवा युवक, महिला-भगिनींना आधार देण्याचा प्रयत्न केला असल्याचा पक्षाचा दावा आहे. लाडकी बहीण योजनेच्या सध्याच्या प्रचारावरून योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात हे सरकार यशस्वी झाल्याचे दिसत आहे. तर पक्षाच्या विविध ‘सेल’ आणि अहवाल बनविणाऱ्या खासगी कंपन्यांकडून या योजनेचा फायदा सरकारला मतदानात होणार असल्याचा अभिप्राय मिळत असल्याने याचा योजनेचे आमिष पुन्हा दाखविताना रक्कम 1500 वरून 2100 करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला सुरक्षेबाबत भाष्य करताना 25 हजार महिलांना पोलिस दलात संधी देण्यात येणार आहे.

शेतकरी सन्मान, निवृत्तिवेतन

केंद्र सरकारची सध्या सुरू असलेली पंतप्रधान किसान योजना पुन्हा राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, या योजनेतून पंतप्रधान किसान योजना हे नाव वगळून केवळ ‘शेतकरी सन्मान’ असे नाव ठेवताना याची रक्कम वार्षिक 12 हजार रुपयांवरून 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ‘निवृत्तिवेतन’ म्हणून लाडक्या बहिणीच्या धर्तीवर 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहेत. 25 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवताना दहा लाख विद्यार्थ्यांना महिना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. मात्र, ही घोषणा करताना रोजगारनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेली का पावले सरकार उचलणार आहे याबाबत स्पष्टीकरण नाही. ग्रामीण भागात 45 हजार पाणंद रस्ते निर्माण करण्यात येणार असल्याच्या शासनाच्या सध्याच्या योजनेचा पुन्हा एकदा उल्लेख करण्याची गरज काय, हे मात्र समजलेले नाही.

मूलभूत समस्या, विकासाचे मुद्दे हद्दपार

पक्षाचा जाहीरनामा हे प्रचारासाठीचे सर्वांत मोठे हत्यार असते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच पक्षांच्या प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार झाले आहेत. केवळ जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत असते. सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल देताना विकासाचे मुद्दे आणि जनतेच्या मूलभूत समस्या प्रचार मोहिमेतून हद्दपार झाल्या आहेत. विजयाचे गणित जुळवून आणण्यासाठी उमेदवारांकडून जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनच कायम चर्चेत ठेवले जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो. सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण आहेत. शेती कोरडवाहू असल्याने आर्थिक अडचणीत बळीराजा अडकला. शेतमालाला हमी भाव मिळत नाही. उत्पादन खर्च वाढत चालला आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था नाही. कायम नैसर्गिक संकट कोसळणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई, पीक विम्यासह अनेक अडचणी कायम आहेत. दुर्दैवाने त्यांना प्रचारात स्थान नाही.

ठळक वैशिष्ट्ये

लाडकी बहीण योजनेत 1500 वरून 2100 रुपयांपर्यंत वाढ

शेतकरी कर्जमाफी

भातउत्पादक शेतकऱ्यांसाठी 25 हजार प्रति हेक्टर बोनस

25 लाख नोकऱ्यांची निर्मिती आणि 10 हजार रुपये विद्यावेतन

ग्रामीण भागात 45 हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम

अशा सेविकांना दर महिना 15 हजार वेतन

शेतकऱ्यांच्या वीज बिलात 30 टक्के कपात आणि सौर उर्जेला प्राधान्य

शेतकऱ्यांना वर्षाला 15 हजार रुपये

वृद्धांना 2100 रुपये दरमहा निवृत्तिवेतन

ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्ते

NCP (AP)
MNS Political Journey : तीन परीक्षा, 'मनसे' एकाच गुणावर; 'या' विधानसभेत किती मार्क पाडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com