Maharashtra MLA Salary: आखाती देशात सुरू असलले युद्ध, अमेरिका, इराण, इस्त्राईलमध्ये न निघणारा तोडगा याच फटका आता भारतासह जगभरातील अनेक देशांना बसत आहे. डाॅलच्या तुलनेत रुपयाने निचांकी पातळी गाठली आहे, देशात इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आपल्या एका भाषणात देशवासियांना काटकसर करण्याचे आवाहन केले.
सोने खरेदी टाळा, विदेश यात्रा करू नका, इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, विवाह समारंभ देशातच करा आदी सूचनांचा यात समावेश आहे. या आवाहनानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार हे इलेक्ट्रीक वाहने, ई-बाईक, बुलेटवरून फिरताना दिसत आहेत. यावर कुठे कौतुक तर कुठे टीका होताना दिसते. परंतु जे मंत्री, आमदार-खासदार आज दुचाकीवर फिरतांना दिसत आहेत, प्रत्यक्षात सरकार त्यांच्यावर किती खर्च करते हे पाहून सगळ्यांना धक्का बसेल.
निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला पाच वर्ष दरमहा मानधन, प्रवास भत्ता, मोबाईल, टेलीफोन, स्वयंपाकी, पीए, बंगला, कर्मचारी, सरकारी सुरक्षा, विमान, हेलिकाॅप्टर वापराची मुभा आणि बऱ्याच गोष्टी या सरकारी खर्चाने पुरवल्या जातात. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि खासदार यांना दिले जाणारे दरमहा वेतन व अन्य सुविधा या कायद्यानुसार ठरवल्या जातात.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री, मंत्री व आमदारांना दरमहा मानधन दिले जाते. यात मुख्यमंत्र्यांना अडीच ते तीन लाख रुपये दरमहा इतके वेतन दिले जाते. यात मूलभूत वेतन, विविध भत्ते यांचा समावेश असतो. या शिवाय अधिकृत सरकारी बंगला, वाहनांचा ताफा, झेड प्लस किंवा वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा तसेच अधिकृत कर्मचारी व कार्यालय दिले जाते.
यामध्ये दूरध्वनी, वीज, प्रवास भत्ते, हवाई प्रवासासाठी सरकारी विमान, हेलिकाॅप्टर वापरण्याची सुविधा असते. निवृत्तीनंतरही काही मंत्र्यांना सरकारी सुविधांचा लाभ दिला जातो. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दरमहा दोन लाख रुपये वेतन दिले जाते. यात मतदारसंघ भत्ता, सचिवीय भत्ता आणि वाहन सुविधांचा समावेश असतो. याशिवाय सरकारी बंगला, चालकासह वाहन, सुरक्षा कार्यालयीन कर्मचारी, प्रवास भत्ता फोन व इंटरनेट सुविधा, वैद्यकीय खर्च दिला जातो.
तर आमदारांना महाराष्ट्र विधानसभा सदस्य वेतन व भत्ते कायदा 1956 अंतर्गत मानधन व सुविधा दिल्या जातात. महाराष्ट्रातील आमदारांना मिळणारे एकूण मासिक पॅकेज सुमारे 2.25 लाख ते 2.50 लाखांदरम्यान मानले जाते. यात मूलभूत वेतन, मतदारसंघ भत्ता, सचिवीय भत्ता, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता, वीज भत्ता व अधिवेशना दरम्यान दैनिक भत्ता दिला जातो.
आमदारांना या शिवाय मुंबईत आमदार निवासात फ्लॅट/रूम, रेल्वे व विमान प्रवास सवलती, वाहन भत्ता कार्यालयीन सुविधेसाठी पीए ठेवण्यासाठी भत्ता तसेच माजी आमदारांना पेन्शनही दिली जाते. जितका कार्यकाळ जास्त तितकी पेन्शन वाढत जाते. या शिवाय मतदारसंघात विकासकाम करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीही दिला जातो. मोबाईल आणि टेलीफोन भत्ता म्हणून दरमहा 12 हजार रुपये दिले जातात.
मतदारसंघासाठी दरवर्षी पाच कोटी :
राज्यातील प्रत्येक आमदाराला दर वर्षी पाच कोटी इतका विकास निधी सरकारकडून दिला जातो. 2011-12 मध्ये हा निधी एक कोटी रुपये प्रतिवर्षी असा होता. कालांतराने त्यात तीन ते पाच कोटी अशी वाढ करण्यात आली आहे.
एकदा आमदार अन् आयुष्यभरासाठी पेन्शन
महाराष्ट्रात एखादा व्यक्ती एकदा आमदार म्हणून निवडून आला तर त्याला आयुष्यभरासाठी दर महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन दिली जाते. Maharashtra Legislature Members' Pension Act, 1976 या कायद्यानुसार पेन्शन दिली जाते. जर एखादा आमदार पुन्हा निवडून आला, तर प्रत्येक अतिरिक्त वर्ष/कार्यकाळासाठी पेन्शनमध्ये वाढ होते.
पहिला कार्यकाळ असलेल्या आमदाराला 50 हजार रुपये दरमहा पेन्शन दिली जाते. त्यानंतर तो आमदार पुन्हा निवडून आला तर प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी 2 हजार रुपयांनी यात वाढ केली जाते. सरकारी नोकरीप्रमाणे 58 किंवा 60 वर्षांची निवृत्ती वयोमर्यादा या आमदारांना नसते. माजी आमदारांना पेन्शनसोबत वैद्यकीय सुविधा, प्रवास सवलती, कुटुंबीय पेन्शन (निधनानंतर) यांचाही लाभ नियमांनुसार मिळू शकतो. जर एखादा आमदार कालांतराने खासदार झाला तर त्याला दुहेरी पेन्शन मिळते.
पद अंदाजे मासिक वेतन व भत्ते
मुख्यमंत्री : ₹3 लाख ते ₹5 लाख+
कॅबिनेट मंत्री : ₹2.5 लाख ते ₹4 लाख
राज्यमंत्री : ₹2 लाख ते ₹3 लाख
आमदार : ₹2.4 लाख ते ₹2.7 लाख
मूळ वेतन (Basic Salary) : 1,82,200
महागाई भत्ता (DA) : 30,000 ते 50,000
टेलिफोन भत्ता : 8,000
स्टेशनरी व पोस्टेज भत्ता : 10,000
संगणक ऑपरेटर भत्ता : 10,000
वाहन/ड्रायव्हर सुविधा : 15,000 ते 20,000
मतदारसंघ भत्ता : 50,000 ते 1,00,000
प्रवास भत्ता : 50,000 पर्यंत
दैनिक भत्ता (सभागृह अधिवेशनावेळी): ₹2,000 प्रतिदिन
एकूण मासिक लाभ : ₹2.4 लाख ते ₹2.7 लाख
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.