Delhi News: काँग्रेसच्या हायकमांडच्या टीममधील अत्यंत विश्वासू नेते म्हणून रमेश चेन्निथला यांचं नाव घेतलं जातं. नुकत्याच पार पडलेल्या केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात त्यांचाही मोठा वाटा राहिला आहे. त्याचमुळे काँग्रेसकडून जी काही तीन प्रमुख नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होती, त्यात चेन्निथला यांच्याही नावाचा समावेश होता. मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं पारडं जड होतं. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला आणि व्ही. डी. सतीशन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ येऊन पडली.
काँग्रेसनं केरळमध्ये धक्कातंत्र वापरत अचानकपणे व्ही.डी.सतीशन यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणलं. यामुळे साहजिकच रमेश चेन्निथला यांची नाराजी पुढे आली होती. पण आता सतीशन यांच्या नेतृत्वातील केरळ सरकारच्या मंत्रिमंडळात चेन्निथला यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
रमेश चेन्निथला यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी पदाचा 'चार्ज' आहे. त्यांनी 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीत काँग्रेसची बाजू चांगलीच लावून धरली होती. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना हाताशी धरून त्यांनी राज्यात अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी वेळोवेळी कठोर पावले उचलण्यातही कोणतीही कसूर सोडली नसल्याचं दिसून आलं होतं.
पण आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची आता केरळ सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि दक्षता मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला आहे.
काँग्रेसच्या अनुभवी नेत्यांमध्ये रमेश चेन्निथला यांचा समावेश होतो. याचमुळे काँग्रेसच्या नेतृत्वानं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली होती. पण आता केरळ सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस हायकमांड महाराष्ट्रात काँग्रेसला नवे प्रभारी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पक्षबांधणीसाठी पूर्णपणे झोकून देत काम सुरू ठेवले आहे.त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मोठ्या अपयशानंतर हळूहळू कात टाकते आहे.यात चेन्निथला हेही महाराष्ट्रात काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकीय घडामोडींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते.
रमेश चेन्निथला यांनी केरळमध्ये काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले आहे.त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. केंद्र सरकारमध्ये रमेश चेन्निथला यांनी कृषी आणि परराष्ट्र व्यवहार यांसारख्या खात्यांचे मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी रमेश चेन्निथला यांच्यासारखा मुत्सद्दी आणि अनुभवी नेता महाराष्ट्रात प्रभारी म्हणून पाठवण्यामागं फार मोठा विचार होता. कारण महाविकास आघाडीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन प्रमुख मित्रपक्षांशी समन्वय ठेवतानाच समोर सत्तेतील महायुतीचं आव्हानाला तोंड देण्यासाठी काँग्रेसला मजबूज करण्याची पूर्णत: जबाबदारी चेन्निथला यांच्यावर होती.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्त केले होते.काँग्रेसच्या पडतीच्या काळात संघटनात्मक बांधणीसाठी मोठं योगदान दिलं. पण केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर आणि राजकीय घडामोडींमध्ये ते काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक राहिले होते. पण आता त्यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे.याच सगळ्या घडामोडीनंतर आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसला नवा बॉस मिळणार का या तर्कवितर्क सुरू झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.