Raosaheb Patil : वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले रावसाहेब जरांगे कणखर बाण्याचा अस्सल मराठी माणूस. खरेतर या वयात कोणाही व्यक्तीची अशीच अपेक्षा असते की, मुलाने घराची जबाबदारी सांभाळावी व आपण भगवंताचे नामस्मरण करत आराम करावा. मात्र, रावसाहेब यांच्या मुलाचा पिंडच वेगळा. सामाजिक कामाचा वसा घेतलेला आपला मुलगा संसारात रमत नाही. सामाजिक कार्यासाठी सतत घराबाहेर असतो. त्याने घरी वेळ द्यावा. मात्र, आपला मुलगा संसारात रमणारा नाही हे लक्षात आल्यावर एखादा बाप त्याच्यावर चिडला असता, रागावला असता, पण आपला मुलगा समाजाच्या भल्याचे काम करतोय हे लक्षात आल्यावर रावसाहेब जरांगे चिडले तर नाहीच उलट घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मनोज जरांगे यांना सामाजिक कार्यासाठी पूर्ण मोकळीक दिली. स्वतःच्या मुलाबद्दल सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून येत होता. मनोज हे त्यांचे सर्वात लहान अपत्य. बालपणापासूनच हट्टी स्वभाव असल्याने फारसे कोणाचे ऐकत नाही. घरी असतानासुद्धा केवळ सामाजिक प्रश्नावर चर्चा व्हायची.
सर्वात कठीण प्रसंग होता शेती विकण्याचा. गेवराई तालुक्यातील मोतारी गावाहून ते अंकुशनगर येथे स्थायिक झाले. उदरनिर्वाहासाठी दोन एकर शेती घेतली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सामाजिक कार्य हाती घेतल्याने खर्चासाठी हाताशी असलेली शेती विकण्याची पाळी आली. अशावेळी रावसाहेब जरांगे यांचा पाठिंबा अतिशय आवश्यक होता. अशाप्रसंगी मोठ्या प्रमाणावर वाद होण्याचे प्रसंग अनुभवास येतात. मात्र, रावसाहेब जरांगे यांनी मुलाच्या सामाजिक कार्याला साथ द्यायची ठरवली असल्याने त्यांनी शेती विकण्याच्या निर्णयाला कुठलाही अडथळा निर्माण केला नाही.
मनोज जरांगे यांचा मुलगा शिवराज हा जालना येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मुलगी पल्लवी शाळेत शिक्षण घेते. रावसाहेब जरांगे यांचे दोन्ही पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष असते. उतरत्या वयात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारताना रावसाहेब जरांगे यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही तक्रारीचे भाव नव्हते. याउलट मुलाच्या संघर्षाला संपूर्ण राज्यातील समाजबांधव पूर्ण क्षमतेने साथ देत असल्याचे बघून ते समाधान व्यक्त करत होते. अंतरवाली सराटी येथून बेमुदत उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांची एकजूट घडवून आणली. 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा' या संत वचनाप्रमाणे रावसाहेब जरांगे यांच्या पुत्राने तिन्ही लोकी झेंडा फडकवला आहे. त्यांची किर्ती सर्वत्र पसरत आहे.