देशासाठी लढणारे सैनिक, पोलिस आणि सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या व्यक्तीच्या पाल्यांना नेहमीच पालकांचा कमी वेळ मिळतो. यासाठी लहानपणापासूनच त्यांना स्वतःच्या मनाची समजूत घालावी लागते. यामुळे ही पाल्ये अत्यंत कमी वयात समजूतदार होतात. मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणारे मनोज जरांगे यांचा मुलगा शिवराज व मुलगी पल्लवी यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही हा समजूतदारपणा विकसित झाल्याचे दिसून आले. सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू आहे. त्यामुळे शिवराज आणि पल्लवीचे डोळेही वडील मनोज जरांगे यांच्या वाटेकडे लागले आहेत,
मुलगा शिवराज हा जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. जगातील जवळपास सर्वच मुला-मुलींचे वडील स्वतः पाल्याच्या भवितव्यासाठी परिश्रम घेतात, मात्र, शिवराजचे वडील राज्यातील समस्त मराठा बांधवांच्या मुलांच्या भवितव्यासाठी लढत आहेत. स्वतःचा जीव त्यांनी पणाला लावला आहे. याबद्दल विचारले असता शिवराज बोलता झाला. 62 पेक्षा जास्त दिवस झाले, माझे वडील घरी आले नाहीत. त्यांची आम्हाला काळजी वाटते. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा. राज्यात मराठा समाजबांधव आत्महत्या करत आहेत. त्यांचा विचार करून आरक्षणाचा निर्णय झाला तर माझे वडील घरी येतील, असे शिवराज म्हणाला.
मुलगी पल्लवी ही शाळेत शिक्षण घेत आहे. शिवराजच्या तुलनेत पल्लवीने बेधडकपणे विचार व्यक्त केले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यापूर्वी केलेले बेमुदत उपोषण पल्लवीच्या हातून पाणी घेऊन सोडवले आहे. पल्लवीने तेथे भाषणही केले होते. पल्लवी म्हणाली, मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या माझ्या वडिलांचा मला अभिमान आहे. मात्र, बेमुदत उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यांची आम्हाला काळजी वाटते. त्यामुळे राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. मराठा समाजबांधवांनी आत्महत्या करू नये. आत्महत्या केल्या तर आरक्षण द्यायचे कोणाला ?
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवराज व पल्लवी हे दोन्ही भावंडे वडील मनोज जरांगे यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. सर्वत्र दिवाळीची तयारी चालू असताना वडील घरी असावेत अशी भावना शिवराज व पल्लवी यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती. मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण करत असताना पाणी पिण्यास नकार दिला आहे, वैद्यकीय पथकालाही परत पाठवले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. यामुळे जरांगे यांच्या कुटुंबीयांच्या घशाखाली घास उतरत नसल्याचे दिसून आले.