5 big changes from march 1 india : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला आर्थिक नियमांमध्ये काही ना काही बदल होत असतात. आणि त्याचा थेट परिणाम सामान्य माणसावर होतो. तसेच १ मार्च २०२६ पासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ज्यामध्ये घरगुती गॅस, रेल्वे तिकिट बुकिंग, सिम वापराचे नियम, यूपीआय व्यवहार आणि बँक खात्यातील किमान शिल्लक यांचा समावेश आहे. त्यामुळे तुमचं या महिन्याचा बजेट वाढणर की दिलासा मिळणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दर महिन्याला एलपीजी गॅसच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता कायम असते. महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या त्यांच्या किंमतींचा आढावा घेतात. मागील काही महिन्यांपासून व्यवसायिक सिलेंडरच्या दरात चढ-उतार दिसून आला आहे. गेल्या महिन्यात सुमारे ४९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मार्च महिन्यातही दर बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र घरगुती सिलेंडरचे दर सध्या स्थिर आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी यूपीआय प्रणालीतही बदल अपेक्षित आहेत. मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी केवळ यूपीआय पिन पुरेसा राहणार नाही. त्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी किंवा मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू केले जाऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित होईल, मात्र व्यवहार करताना अतिरिक्त प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
बँक खात्यांबाबतही नियमांमध्ये बदल होणार आहेत. काही सरकारी बँका किमान शिल्लक नियमात सुधारणा करणार आहेत. पूर्वी एका दिवशी शिल्लक कमी असल्यास दंड आकारला जात असे; आता सरासरी मासिक शिल्लक या निकषावर शुल्क आकारले जाईल. त्यामुळे ग्राहकांनी संपूर्ण महिन्यातील व्यवहारांचे नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरेल.
रेल्वे प्रवाशांसाठीही महत्त्वाचा बदल होणार आहे. १ मार्चपासून जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग प्रक्रियेत सुधारणा केली जाणार आहे. भारतीय रेल्वे जुन्या यूटीएस अॅपऐवजी ‘RailOne’ नावाचे नवे अॅप पूर्ण क्षमतेने सुरू करणार आहे. या नव्या अॅपद्वारे जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि स्थानिक प्रवासाशी संबंधित सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने सिम बाइंडिंगचा नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार मेसेजिंग अॅप्स थेट मोबाईल सिमशी जोडल्या जातील. WhatsApp, Telegram आणि Signal सारखी अॅप्स सिमशिवाय वापरता येणार नाहीत. जर मोबाईलमधून सिम काढले, तर संबंधित अॅप्स त्वरित बंद होतील. यामुळे ऑनलाईन फसवणूक कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
याशिवाय सीएनजी, पीएनजी आणि विमान इंधनाच्या दरांचाही आढावा महिन्याच्या सुरुवातीला घेतला जातो. त्यामुळे १ मार्चपासून या इंधनांच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, या सर्व बदलांचा थेट परिणाम घरगुती आणि प्रवास खर्चावर होणार असून नागरिकांनी आर्थिक नियोजन करताना या घडामोडी लक्षात घेणे गरजेचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.