Ravi Rana-Bachu Kadu
Ravi Rana-Bachu Kadu Sarkarnama
विशेष

मी फडणवीसांचा सच्चा शिपाई, त्यामुळे मी त्याला भीक घालत नाही : रवी राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : माझा कोणाशीही वाद नाही. माझ्यावर आरोप करणारे आणि खालच्या पातळीवरून टीका करणाऱ्यांचा हिशेब जनता नक्की करणार आहे. रवि राणा (Ravi Rana) हा सत्यावर चालणारा असून सत्यासाठी लढणारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मी सच्चा शिपाई आहे, त्यामुळे कोणी कितीही माझा रिपोर्ट दिला अथवा माझ्याविरोधात आंदोलन, उपोषण केले तर मी त्याला भीक घालत नाही, असा इशारा आमदार रवि राणा यांनी नाव न घेता आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना दिला. (MLA Ravi Rana criticizes MLA Bachu Kadu)

आमदार रवी राणा यांना ‘बच्चू कडू आणि तुमच्यात वाद सुरू आहे. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय बोलणे झाले आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना आमदार राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल केला.

राणा म्हणाले की, माझा कोणाशीही वाद नाही. आज दिवाळी आहे. दिवाळीसारख्या सणात संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजं. माझ्यावर जे आरोप होत आहेत. माझ्यावर खालच्या पातळीवरून जे बोलंलं जात आहे. मी जे काय चांगलं कामं करतोय, त्याच्यावर टीका केली जाते. पण त्यांचा हिशेब जनता नक्की करेल. मी कोणावरही टीका केलेली नाही. माझ्याविरोधात जे कोणी पोलिस स्टेशनमध्ये गेले असतील किंवा उपोषण केलं असेल, त्यांना माझा सल्ला आहे की, उपोषण करायचं असेल तर राज्यातील उपेक्षित लोकांसाठी करावं.

रवी राणांवर एक नाही तर पन्नास जरी गुन्हे दाखल झाले तरी राणा हा सत्यावर चालणारा व्यक्ती आहे. सत्यासाठी लढणारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सच्चा शिपाई आहे. फडणवीसांचे संस्कार, गोरगरीबांसाठी लढण्याची त्यांची जी दिशा आहे, त्याच दिशेने मी चाललो आहे. त्यामुळे कोणी कितीही माझा रिपोर्ट दिला, अथवा माझ्याविरोधात आंदोलन, उपोषण केले. त्याला मी भीक घालत नाही, असे आव्हान राणा यांनी कडू यांना दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या दोघांमध्ये मध्यस्थी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर राणा म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही आमचेच आहेत. त्यांचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे, त्यामुळे त्यांच्या आदेशाचे, निर्देशाचे मी पालन करेनच. पण, कोणी म्हणत असेल की माझंच खरं. कोणावरही काही टीका करणे. खालच्या स्तरावरील भाषा वापरणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही राणा यांनी बजावले.

खालच्या पातळीवर शिवीगाळ करून स्वतःला सत्यवादी मानणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, तुम्ही जेव्हा बोलता, तेव्हा हजारो लोकं ऐकत असतात. त्यामुळे हे लोकच त्यांना धडा शिकवतील. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले. काहीजण खोटं बोलायंचं पण रेटून बोलायंचं, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर लोकांचं लक्ष आहे, ते त्यांना धडा शिकवतील, असा विश्वासही आमदार राणा यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT